Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » ताडोबा आणि वाघोबा…
    अवांतर

    ताडोबा आणि वाघोबा…

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 26, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, ताडोबा, जंगलसफारी, व्याघ्रदर्शन, गवादर्शन, हरणांचा कळप, निसर्ग, Tadoba, jungle safari, tiger sighting, deer herd, nature, Gaur
    फोटो सौजन्य - Meowild
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माधवी जोशी माहुलकर

    भाग – 1

    चंद्रपुरला असतांना 1995 साली आम्ही पहिल्यांदा ताडोबा या जंगलात गेलो होतो. तो माझा पहिला जंगल सफारीचा अनुभव असल्यामुळे त्याबद्दल खूप उत्सुकता होती. त्यावेळेस आजच्यासारखे जंगल सफारीचे खूप कडक नियम नव्हते. गेट पास काढला की, आपण आपल्या वाहनाने जंगल फिरू शकत होतो. जेव्हा मी पहिल्यांदा हे जंगल बघितले त्याच क्षणी ते माझ्या मनात ठसले. पुढे अनेकवेळा मग ताडोबाला जाण्याचा योग येत गेला. जितक्या वेळेस मी तिथे गेले, तितक्या वेळेस या जंगलाचे एकेक नवीन रूप दृष्टीस पडतं गेलं. पहिल्यांदा ताडोबाला जाण्याचा प्लॅन झाला तेव्हा, मनामधे खूप संमिश्र विचार होते. वाघ दिसेल, न दिसेल हा प्रश्न मनामध्ये होताच, पण ही माझी पहिलीच जंगल सफारी असल्यामुळे वाघांचं जंगल कसं असेल? ही उत्सुकता जास्त होती.

    चंद्रपूर सोडल्यावर मोहर्ली गेटवरून आम्ही ताडोबामधे प्रवेश करणार होतो. जाताना महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे महाऔष्णिक केंद्र दुर्गापूर लागले, त्याच्या मोठमोठ्या आणि उंच चिमण्या सारख्या धूर ओकत होत्या… त्या धुराची चादर वातावरणात पसरली होती. कोळसा वाहून नेणाऱ्या केबल ट्रॉली सारख्या आमच्या डोक्यावरून ये-जा करत होत्या. ते पाहून गंमत वाटत होती. दुर्गापूरला जी राख उरते, ती गावाबाहेरच्या वेस्टर्न कोल फिल्ड्सच्या मोकळ्या जागेत जमा केली जाते, त्यांचे ते पांढरे ढिगारे पाहून अमिताभ बच्चनच्या ‘खुदा गवाह’ या सिनेमाची आठवण झाली. कारण, त्या सिनेमाचे शूटिंग अफगाणिस्तानात झाले होते आणि असेच पांढऱ्या मातीचे रस्ते आणि डोंगर त्या शूटिंगमध्ये दिसत होते… का कोण जाणे, पण त्या जागेचा उपयोग फिल्मवाल्यांना करता येऊ शकतो, असं मला त्या वेळेस वाटून गेलं. ते पाहायला जरी छान वाटत असलं तरी, पर्यावरणपुरक नक्कीच नाही, हे मात्र समजलं. आता गेल्या तीसएक वर्षांत तिथली अवस्था किती बिकट असेल, त्याची कल्पना न केलेली बरी! असो, कालाय तस्मै नमः…

    दुर्गापूर आता जरी चंद्रपूर शहराच्या आत आले आहे तरी 1995 साली ते चंद्रपूरपासून बरंच लांब होतं. आमच्या गाडीने आता दुर्गापूरची हद्द ओलांडली आणि मोहर्ली गेटच्या दिशेने गाडी धावायला लागली. गेटपास घेतल्यावर आम्ही जंगलात प्रवेश करते झालो. जंगलाच्या हवेचा तो मातकट ओलसर गंध नाकात शिरायला सुरुवात झाली. हवेतला फरक जाणवायला लागला. रस्त्याच्या बाजूला गोंड राजांच्या साम्राज्याची चिन्हे दिसत होती… दुतर्फा मशाली पेटवण्यासाठी लागणारे मोठे मोठे खांब दिसत होते… त्यावरून कल्पना येत होती की, ते साम्राज्य किती मोठे असेल! बांबूच्या जाळ्या आपला फाफटपसारा सांभाळत उभ्या होत्या. एक प्रकारची नीरव शांतता तिथे पसरली होती. आमच्या गाडीचाच आवाज काय तो त्या शांततेचा भंग करत होता.

    गाडीने वेग पकडला होता, परंतु अजूनपर्यंत तरी दृष्टीस काही पडलं नव्हतं. जवळपास अर्ध्या तासानंतर आम्ही मुख्य जंगलात प्रवेश केला. मार्च महिना असल्याने उन्हाची तीव्रता जाणवत होती. तसेही विदर्भात नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्यात तापमान वाढीची चढाओढ चाललेली असतेच. आम्ही आमच्या गाडीत एक गाईड सोबत घेतला होता, तो आम्हाला जंगलाची माहिती पुरवत होता.

    जंगलात थोडं आत गेल्यावर चितळांचा एक मोठा कळप दिसला. जंगलातील ती मुक्त फिरणारी हरणं पाहून मन हरखून गेलं… मोठे मोठे टपोरे डोळे आणि त्या डोळ्यातील कुतूहलमिश्रित निरागस भाव… मनाचा ठाव घेत होते. परंतु मुळातच ही भित्री जात आसपास असलेल्या माकडांनी थोडा आवाज केला आणि आमच्याही गाडीच्या आवाजामुळे पटकन झुडपात गेली, पण जाताना खूप छान फोटो देऊन गेले…

    हेही वाचा – तोडली बंधने अन् सुटले भोग…

    थोडं अजून पुढे गेल्यावर रानगव्यांचा एक भला मोठा कळप समोर आला, त्यांचे पाय खालून गुडघ्यापर्यंत पांढरे असतात आणि वरचा रंग करडा काळा… मोठे गरगरीत डोळे आणि बळकट शरीरावर चंद्राकार गोल शिंगे… असे ते गवे पाहिले. त्यांचे गुडघ्यापर्यंतचे पाय पांढरे असल्याने त्यांनी पायात सॉक्स घातल्यासारखे वाटतं होते. रानगव्यांकडे पाहिल्यावर त्याच्या ताकदीची कल्पना येते. वाघाने त्याच्या पाठीमागून, तो बेसावध असताना हल्ला केला तरच त्याची शिकार होऊ शकते… पण वाघाला ते काम सहज शक्य होत नाही. कारण, दोघेही तुल्यबळ असतात. त्यामुळे रानगव्याची शिकार करायची झाल्यास वाघ कधीच एकट्याने त्याच्यावर हल्ला करत नाही. उलट, वाघ जर त्याच्या तावडीत सापडला तर मग मात्र त्याचं काही खरं नाही! हा रानगवा त्याला पुरून उरतो… आपल्या शिंगावर वाघाला उचलून असा काही खाली आपटतो की, वाघाची सगळी हाडंच खिळखिळी होतात… रानगव्यांचा एक भलामोठ्या आकाराचा ग्रुप लीडर असतो…

    अशा त्या दमदार रानगव्यांना डोळ्यांत साठवून आम्ही पुढे निघालो. परंतु अजूनपर्यंत ज्याच्या दर्शनाची उत्सुकता होती, त्याची काहीच चिन्हं दिसत नव्हती. आणखी थोडं पुढे गेल्यावर जंगली कुत्र्यांचा एक समूह दिसला.  त्यांनी आमच्याकडे असं काही रोखून पाहिलं की, क्षणभर अंगावर सर्रकन काटा उभा राहीला. तो कळप पाहिल्यावर तर वाघ त्यांच्या आजूबाजूला असण्याची सुतराम शक्यता नव्हती; कारण जंगली कुत्रेच फक्त वाघाची शिकार करू शकतात, असं ऐकीवात होतं. त्यामुळे मन थोड खट्टू झालं. पण वाघ दिसेल या आशेवर आमची गाडी पुढे सरकली.

    जंगलातील वेड्यावाकड्या वळणांवर आमचे हेलकावणे सुरू होते आणि त्याबरोबरच वाघाची हुलकावणी पण बेचैन करत होती. मोर, लांडोर, स्वर्गीय नर्तक, टकाचोर, हळद्या यासारख्या सुंदर पक्ष्यांच्या दर्शनाने तर डोळ्यांचे पारणे फिटले. मधेच आम्हाला माणसांसारखा हसण्याचा आवाज आला! एवढ्या जंगलात कोण हसत आहे, म्हणून आश्चर्य वाटलं. पण त्यावर हसून गाईडने माहिती पुरवली की, हा तरसांचा आवाज आहे. त्यांचाही झुंड थोडं समोर गेल्यावर दृष्टीसं पडला. तरस खरचं माणसांच्या हसण्यासारखे आवाज काढत होते. पण त्या प्राण्याची हिंस्रता त्याच्या नजरेतून दिसत होती. तसेच, हा वाघाचे लांगुलचालन करणारा प्राणी म्हणूनही प्रसिद्ध आहे. वाघाने केलेल्या शिकारीवर जगणारा हा प्राणी आहे.

    संध्याकाळ होत आली… आमचा जंगल सफारीची वेळ संपत आली, पण वाघ काही दिसला नाही. परत जाताना तरी एखादी वाघाची झलक दिसेल, असं वाटत होतं. पण या खेपेस तरी पदरी निराशाच पडली. परंतु एकंदरीत पहिल्या सफारीचा आनंद अवर्णनीय होता. अगदी पहिल्याच फेरीत खूप सारे प्राणी नजरेस पडले होते. शिवाय, जंगलाच्या त्या फ्रेश हवेने मन एकदम ताजेतवाने झाले होते. तिथल्या हवेमुळे जंगलाला वारंवार भेट देण्याची तीव्र इच्छा आतमध्ये कुठेतरी उजागर होत होती… वाघ न दिसल्यामुळे पुढच्या ट्रिपचे आयोजनही मनोमन केव्हाच पक्के केले होते.

    हेही वाचा – …अन् सुलोचना ताईला मोक्ष मिळाला!

    वाघ सहजपणे दिसणं हेदेखील नशिबात असायला पाहिजे, असं तो गाईड सांगत होता. पण आम्ही मात्र वाघ दिसला नाही तरी, ताडोबा जंगलाच्या अगदी प्रेमात पडलो होतो. त्यामुळेच वर्षभरातून जेव्हा केव्हा शक्य होईल, तेव्हा तेव्हा ताडोबाला जायचंच हा निर्णय घेतला होता! एकंदरीत काय तर, त्या पहिल्याच भेटीत ताडोबाने निश्चितच आपल्या सौंदर्याने आमच्या मनावर गारुड घातलं होत.

    क्रमशः

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026 अवांतर

    आनंदी जगायला काय लागतं?

    March 23, 2026 अवांतर

    Harish Rana : अगतिक पितृत्व, असहाय्य मातृत्व…

    March 20, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    By Team AvaantarMarch 24, 2026

    संगीता भिडे ‘संस्कार’ ही संकल्पना प्रथम स्पष्ट होणे आवश्यक आहे. ‘सम्यक करोति इति संस्कारः।’ कोणतीही…

    आनंदी जगायला काय लागतं?

    March 23, 2026

    Harish Rana : अगतिक पितृत्व, असहाय्य मातृत्व…

    March 20, 2026

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    March 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn