Sunday, October 26, 2025

banner 468x60

Homeशैक्षणिकसर्वच विद्यार्थिनी अन् विद्यार्थी बुद्धीमान असतात...

सर्वच विद्यार्थिनी अन् विद्यार्थी बुद्धीमान असतात…

डॉ. किशोर महाबळ

नव्या पिढीतील लक्षावधी विद्यार्थिनी आणि विद्यार्थी दरवर्षी शाळेत मोठ्या उत्साहाने तसेच उमेदीने येतात. हे सर्वचजण कोणत्याना कोणत्या असामान्य अशा निसर्गदत्त क्षमतेने संपन्न असतात. बुद्धिमत्ता, क्षमता, कला, कौशल्ये, अनुभव, आकलन, समजूतदारपणा, शहाणपण याबाबतीत सर्वचजण वेगळे आहेत. प्रतिकूल आर्थिक आणि सामाजिक वातावरणातून येणाऱ्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांमध्ये तर काही वेगळेच असामान्य गुण असतात आणि म्हणूनच तर, ते सर्व समस्यांचा सामना करीत शिकण्यासाठी शाळेत येतात. या सर्वांच्यात प्रकर्षाने कोणता ना कोणता तरी एक किंवा अनेक गुणही असतात. मुख्य म्हणजे, या साऱ्याजणांना आपल्यातील या सर्व गुणांपैकी, क्षमतांपैकी कोणत्यातरी एका गुणाचे, क्षमतेचे वर्गात आणि शक्य झाले तर, शाळेतील सर्वांसमोर वर्षांत एकदातरी कौतुक होईल, अशी सुप्त पण, अत्यंत तीव्र अशी इच्छा असते. ज्या विद्यार्थ्यांना अनुकूल वातावरण, प्रोत्साहन मिळाले त्यांचे गुण विकसित झाले; मात्र ज्यांना हे मिळाले नाही त्यांचे गुण आणि क्षमता विकसितच झाल्या नाहीत, एवढाच काय तो या विद्यार्थ्यांमध्ये फरक असेल!

हेही वाचा – Professor and student : भावना नेहमीच खऱ्या असतात

सर्वच मुलामुलींमध्ये कोणत्या ना कोणत्या असाधारण क्षमता आणि बुद्धिमत्ता असते, हे मान्य नसणारे असंख्य शिक्षक मला विविध अभ्यासशिबिरात अनेकदा भेटले आहेत. ज्या शाळेतून मेरीटमध्ये विद्यार्थी येतात, त्या शाळा वगळता बाकी सर्व शाळांत जेमतेम 10 टक्के विद्यार्थी हे बुद्धीमान असतात आणि गणित तसेच विज्ञान विषयांत उत्तम गुण मिळविणारेच विद्यार्थी बुद्धीमान असतात, असा या बहुतांश शिक्षकांचा समज असतो. त्यात तसे चूक काही नाही. म्हणजे, गणित आणि विज्ञानात चांगले गुण मिळविणे, हे एका प्रकारच्या बुद्धिमत्तेचे उदाहरण आहे. पण या विषयांत चांगले गुण नसलेले सर्वच सुमार बुद्धिमत्तेचे असतात किंवा बुद्धीमानच नसतात, हा प्रचलित समज चुकीचा आहे, हे शिक्षकांना अनेकदा माहीतच नसते. शिक्षणशास्त्र आणि मानसशास्त्रातील तज्ज्ञ आता विविध प्रकारच्या बुद्धिमत्ता या गणित तसेच विज्ञानविषयातील बुद्धिमत्तेएवढ्याच महत्त्वाच्या असतात, असे प्रतिपादन करू लागले आहेत… हे तसे बीएड आणि एमएडच्या अभ्यासक्रमात शिकवलेले असते. पण तरीही शिक्षकांचे मत काही बदलत नाही. यामुळेच असंख्य शाळांमध्ये गणित आणि विज्ञानात जास्त प्रगती न करणाऱ्या हजारो मुलामुलींच्या गुणवत्तेची अगदी क्वचितच दखल घेतली जाते.

यातील काही मुलामुलींच्या गुणांची दखल घेतली गेलीच तर, ती फक्त वार्षिक स्नेहसंमेलनात आणि तीही फक्त निवडक विद्यार्थ्यांची! सर्व मुलांच्या सर्व प्रकारच्या गुणवत्तेची दखल घेणारी व्यवस्थाच आपण अजूनही निर्माण करू शकलेलो नाही. हे शिक्षकांनी करावे, असे म्हटले तर ते म्हणतात की, आम्हाला हे शक्य नाही, आमच्याजवळ तेवढा वेळ नाही… हे आम्हाला जमणार नाही… हे आमचे काम नाही… मात्र असे काहीही न म्हणता आपल्या संपर्कात येईल त्या सर्व विद्यार्थ्याच्या शक्य तेवढ्या सर्व गुणांची दखल घेणारे असंख्य शिक्षक आज महाराष्ट्रात आहेत. अशा सकारात्मक पद्धतीने विचार करणाऱ्या शिक्षकांच्या मदतीने काही करता येऊ शकते का, याचा विचार आपण करूया.

यासाठी प्रथम सर्व विद्यार्थी गुणवान आणि कोणत्याना कोणत्या विलक्षण क्षमता असलेले असतात, हे शास्त्रीय सत्य आपण मान्य करुयात. विद्यार्थ्यांच्या सहजगत्या होणाऱ्या वर्तनातून त्यांच्या गुण आणि क्षमतांचे प्रकटीकरण होते. तेव्हा आपल्या वर्गातील तसेच आपल्या शाळेतील शक्य तेवढ्या सर्व मुला-मुलींच्या वर्तनातील चांगल्या गोष्टी शोधायला आणि त्यांची आवर्जून दखल घेण्यास सुरुवात करायला हवी.

हेही वाचा – शिक्षक आणि प्रतिभेची ओळख

कोणतेही चांगले वर्तन दिसले की, त्या विद्यार्थ्याचे त्याबद्दल कौतुक करता येईल का, याचा प्रयत्न करूया. कौतुक करण्यासाठी साधे कौतुकाचे हास्यही किंवा ‘शाब्बास’ हा शब्दही पुरेसा असतो, हे आपण लक्षात घेऊया. त्या चांगल्या वर्तनाबद्दल त्याच्या वर्गातील इतर विद्यार्थ्यांना सांगता आले तर उत्तमच. अन्य शिक्षकांनाही हे कळू द्या. दिलेला गृहपाठ रोज नियमितपणे आणि काळजीपूर्वक करणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद करणे तसेच त्यांचे कौतुक करणे आपण सुरू करू शकतो. आपण ज्या वर्गांना शिकवितो, त्या वर्गातील अशा विद्यार्थ्यांची यादी सहज तयार करता येईल. ही यादी शाळेच्या मुख्य सूचनाफलकावर सर्वाना दिसेल अशी ठळकपणे लावली तर उत्तम. नियमित गृहपाठ करणारे म्हणजेच अभ्यासू असलेल्या मुलामुलींची दखल घेण्यास सुरुवात करूया. या उपक्रमाचे खूप चांगले परिणाम होऊ शकतील.

(‘सर्वांसाठी सर्वोत्तम शिक्षण!’ पुस्तकातून साभार)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!