वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय तिसरा
देवान् भावयतानेन ते देवाः भावयन्तु वः । परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यय ॥11॥
जें येणेंकरूनि समस्तां । परितोषु होईल देवतां । मग ते तुम्हां ईप्सिता । अर्थांतें देती ॥95॥ या स्वधर्मपूजा पूजितां । देवतागणां समस्तां । योगक्षेमु निश्चिता । करिती तुमचा ॥96॥ तुम्हीं देवतांतें भजाल । देव तुम्हां तुष्टतील । ऐसी परस्परें घडेल । प्रीति जेथ ॥97॥ तेथ तुम्हीं जें करूं म्हणाल । तें आपैसें सिद्धी जाईल । वांछितही पुरेल । मानसींचें ॥98॥ वाचासिद्धी पावाल । आज्ञापक होआल । म्हणिये तुमतें मागतील । महाऋद्धि ॥99॥ जैसें ऋतुपतीचें द्वार । वनश्री निरंतर । वोळगे फळभार । लावण्येंसी ॥100॥
इष्टान भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः । तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः ॥12॥
तैसें सर्व सुखेंसहित । दैवचि मूर्तिमंत । येईल देखा काढत । तुम्हापांठी ॥101॥ ऐसे समस्त भोगभरित । होआल तुम्ही अनार्त । जरी स्वधर्मैकनिरत । वर्ताल बापा ॥102॥ कां जालिया सकल संपदा । जो अनुसरेल इंद्रियमदा । लुब्ध होऊनियां स्वादां । विषयांचिया ॥103॥ तिहीं यज्ञभाविकीं सुरीं । जे हे संपत्ति दिधली पुरी । तयां स्वमार्गीं सर्वेश्वरीं । न भजेल जो ॥104॥ अग्निमुखीं हवन । न करील देवतापूजन । प्राप्त वेळे भोजन । ब्राह्मणांचें ॥105॥ विमुखु होईल गुरुभक्ती । आदरु न करील अतिथी । संतोषु नेदील ज्ञाती । आपुलिये ॥106॥ ऐसा स्वधर्मक्रियारहितु । आथिलेपणें प्रमत्तु । केवळ भोगासक्तु । होईल जो ॥107॥ तया मग अपावो थोरु आहे । जेणें तें हातीचें सकळ जाये । देखा प्राप्तही न लाहे । भोग भोगूं ॥108॥ जैसें गतायुषी शरीरीं । चैतन्य वासु न करी । कां निदैवाचां घरीं । न राहे लक्ष्मी ॥109॥ तैसा स्वधर्मु जरी लोपला । तरी सर्व सुखांचा थारा मोडला। जैसा दीपासवें हरपला । प्रकाशु जाय ॥110॥ तैसी निजवृत्ति जेथ सांडे । तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे । आइका प्रजाहो हे फुडें । विरंचि म्हणे ॥111॥ म्हणऊनि स्वधर्मु जो सांडील । तयातें काळु दंडील । चोरु म्हणूनि हरील । सर्वस्व तयांचें ॥112॥
हेही वाचा – Dnyaneshwari : …स्वधर्मानुष्ठान, ते अखंड यज्ञयाजन
अर्थ
याच्या (यज्ञाच्या) योगाने तुम्ही देवांना संतुष्ट करा; (म्हणजे) ते देव तुमची समृद्धी करतील. परस्परांची अभिवृद्धी करणारे तुम्ही उत्कृष्ट प्रकारचे कल्याण प्राप्त करून घ्याल. ॥11॥
कारण या धर्माच्या आचरणामुळे सर्व देवतांना आनंद होईल आणि मग त्या देवता तुम्हाला इच्छिलेले विषय देतील. ॥95॥ या स्वधर्मरूप पूजेने सर्व देवतांना आराधिले असता, त्या तुमचा खात्रीने योगक्षेम चालवतील. ॥96॥ तुम्ही देवांची आराधना कराल आणि देव तुमच्यावर प्रसन्न होतील, अशी एकमेकांवर जेव्हा प्रीती जडेल ॥97॥ तेव्हा तुम्ही जे करू म्हणाल, ते सहजच सिद्धीस जाईल आणि मनातील इच्छित गोष्टीही पूर्ण होतील. ॥98॥ तुम्ही बोलाल ते खरे होईल आणि तुम्ही आज्ञा करणारे व्हाल. तुम्हाला ‘आपली काय आज्ञा आहे’ म्हणून महाऋद्धी विचारतील. ॥99॥ ऋतुपती वसंताच्या द्वारात वनशोभा ज्याप्रमाणे फलभार व सौंदर्यासह निरंतर सेवा करते ॥100॥
यज्ञाने संतुष्ट केलेले देव तुम्हाला इष्ट भोग देतील, त्यांनी दिलेल्या वस्तूंचा त्यांना न देता जो उपभोग घेतो, तो चोर होय. ॥12॥
पाहा, त्याप्रमाणे सर्व सुखांसह मूर्तिमंत दैवच तुमच्यामागे शोध काढीत येईल. ॥101॥ अशारीतीने बाबांनो, जर तुम्ही एकनिष्ठपणे स्वधर्माचे आचरण कराल तर सर्व भोगांनी संपन्न होऊन तुम्ही निरीच्छ व्हाल. ॥102॥ उलटपक्षी सर्व संपदा प्राप्त झाली असता जो विषयांच्या गोडीला लुब्ध होऊन, उन्मत्त इंद्रिये जसे सांगतील तसे वागतो; ॥103॥ यज्ञाने संतुष्ट होणार्या त्या देवांनी जी ही पूर्ण संपत्ती दिली आहे, त्या संपत्तीच्या योगाने (स्वधर्मरूप) मार्गाने जो परमेश्वरास भजणार नाही, ॥104॥ जो अग्नीचे मुखात हवन करणार नाही अथवा देवतांची आराधना करणार नाही किंवा योग्य वेळी ब्राह्मणांना भोजन देणार नाही ॥105॥ जो गुरुभक्तीला पाठमोरा होईल, अतिथीचा मान करणार नाही आणि आपल्या जातीला संतोष देणार नाही ॥106॥ अशा रीतीने जो आपल्या धर्माचे आचरण टाकून आणि संपन्नतेने उन्मत्त होऊन केवळ भोगामधे गढून जाईल, ॥107॥ मग त्याला धोका आहे. तो असा की, त्याच्या जवळ असलेले सर्व ऐश्वर्य नाहीसे होईल. हे पाहा, मिळवलेले भोग सुद्धा त्याला भोगावयास मिळणार नाहीत. ॥108॥ जसे आयुष्य संपलेल्या शरीरात प्राण रहात नाहीत किंवा दैवहीनाच्या घरात लक्ष्मी राहात नाही ॥109॥ जसा दिवा मालवल्याबरोबर त्याचा प्रकाश नाहीसा होतो, तसा धर्म जर लुप्त झाला, तर सर्व सुखाचे आश्रयस्थान नाहीसे होते. ॥110॥ याप्रमाणे आपला आचार जेथे सुटतो, त्या ठिकाणी आत्मस्वातंत्र्य राहात नाही. प्रजाहो, हे नीट ऐका असे ब्रह्मदेव म्हणाला. ॥111॥ म्हणून आपला धर्म जो टाकील त्याला यमधर्म शिक्षा करील आणि तो केवळ चोर आहे, असे समजून त्याचे सर्वस्व हिरावून घेईल. ॥112॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : अर्जुना तोचि योगी, विशेषिजे जो जगीं…