वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय दुसरा
सांगे सूर्याचां घरीं । प्रकाशु काय वातीवेरी । की न लविजे तरी अंधारीं । कोंडेल तो ॥361॥ देखें ऋद्धिसिद्धि तयापरी । आली गेली से न करी । तो विगुंतला असे अंतरीं । महासुखीं ॥362॥ जो आपुलेनि नागरपणें । इंद्रभुवनातें पाबळें म्हणे । तो केवि रंजे पालविणें । भिल्लांचेनि ॥363॥ जो अमृतासि ठी ठेवी । तो जैसा कांजी न सेवी । तैसा स्वसुखानुभवी । न भोगी ऋद्धि ॥364॥ पार्था नवल हें पाहीं । जेथ स्वर्गसुख लेखनीय नाही । तेथ ऋद्धिसिद्धि कायी । प्राकृता होती ॥365॥
विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निस्पृहः । निर्ममो निरहंकरः स शान्तिमधिगच्छति ॥71॥
ऐसा आत्मबोधें तोषला । जो परमानंदें पोखला । तोचि स्थिरप्रज्ञु भला । वोळख तूं ॥366॥ तो अहंकाराते दंडुनी । सकळ कामु सांडोनि । विचरे विश्व होऊनि । विश्वाचि माजीं ॥367॥
एषा ब्राह्मो स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति । स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥72॥
हे ब्रह्मस्थिती निःसीम । जे अनुभवितां निष्काम । पातले परब्रह्म । अनायासें ॥368॥ जे चिद्रूपीं मिळतां । देहांतीची व्याकुळता । आड ठाकों न शके चित्ता । प्राज्ञा जया ॥369॥ तेचि हे स्थिति । स्वमुखें श्रीपति । सांगत अर्जुनाप्रति । संजयो म्हणे ॥370॥ ऐसें कृष्णवाक्य ऐकिलें । तेथ अर्जुने मनीं म्हणितलें । आतां आमुचियाचि काजा आलें । उपपत्ति इया ॥371॥ जे कर्मजात आघवें । एथ निराकारिलें देवें । तरी पारुषलें म्यां झुंजावें । म्हणूनियां ॥372॥ ऐसा श्रीअच्युताचिया बोला । चित्तीं धनुर्धरु उवायिला । आतां प्रश्नु करील भला । आशंकोनियां ॥373॥ तो प्रसंगु असे नागरु । जो सकळ धर्मासि आगरु । कीं विवेकामृतसागरु । प्रांतहीनु ॥374॥ जो आपण सर्वज्ञनाथु । निरुपिता होईल श्रीअनंतु । ते ज्ञानदेवो सांगेल मातु । निवृत्तीदासु ॥375॥
|| दुसरा अध्याय समाप्त ||
हेही वाचा – Dnyaneshwari : जैसा सूर्य आकाशगतु, रश्मिकरीं जगातें स्पर्शतु…
अर्थ
सांग बरे, सूर्याच्या घरी प्रकाशाला दिवा लागतो का? आणि दिवा लावला नाही तर, तो सूर्य अंधाराने कोंडून जाईल का? ॥361॥ पाहा, त्याप्रमाणे ऋद्धिसिद्धि आल्या की गेल्या, याचे त्याला भानही नसते. तो अंत:करणाने महासुखात निमग्न असतो. ॥362॥ जो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्रभुवनालाही तुच्छ समजतो, तो भिल्लाच्या पालांच्या खोपटात कसा रमेल? ॥363॥ जो अमृताला नावे ठेवतो, तो ज्याप्रमाणे कांजीला हात लावत नाही, त्याप्रमाणे ज्याला आत्मसुखाचा अनुभव आला तो ऋद्धीचा भोग घेत नाही. ॥364॥ अर्जुना, काय आश्चर्य आहे पाहा! जेथे स्वर्गसुखाची खिजगणती नाही, तेथे बापड्या ऋद्धिसिद्धीचा काय पाड? ॥365॥
जो पुरुष सर्व इच्छांचा त्याग करून निरिच्छ, ममत्वरहित आणि अहंकाररहित होऊन संचार करतो, तो (च) शांतीला प्राप्त होतो. ॥71॥
असा जो आत्मज्ञानाने तुष्ट झालेला आणि परमानंदाने पुष्ट झालेला आहे, तोच खरा स्थिरबुद्धी आहे, असे तू जाण. ॥366॥ तो अहंकाराला घालवून सर्व कामना सोडून आणि (अनुभवाच्या अंगाने) जगद्रूप बनून जगात वावरतो. ॥367॥
अर्जुना! ही ब्राम्हविषयक अवस्था आहे. ही प्राप्त झाल्यावर मोह होत नाही. अंतकाळी देखील या अवस्थेत स्थिर होऊन तो ब्रह्मांनदाप्रत पोहोचतो. ॥72॥
ही ब्रह्मस्थिती अमर्याद आहे. जे निष्काम पुरुष हिचा अनुभव घेतात, ते अनायासे परब्रह्माला पोहोचतात. ॥368॥ कारण की चिद्रूपी (ज्ञानरूपी) मिळाल्यावर प्राण जाते वेळी होणारी व्याकुळता (चित्ताची तळमळ) ज्या ब्रह्मस्थितीमुळे ज्ञानाच्या चित्तात लुडबूड करीत नाही ॥369॥ तीच ही स्थिती, श्रीकृष्णाने स्वमुखाने अर्जुनास सांगितली, असे संजय म्हणाला. ॥370॥ असे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुनाने असे मनात म्हटले की, आता (देवाच्या) या विचारसरणीने आमचेच (आयते) कार्य झाले. ॥371॥ कारण की, जेवढे कर्म म्हणून आहे, तेवढे सर्व देवाने निषधले (त्याज्य ठरवले). तर मग माझे युद्ध करणे आयतेच थांबले. ॥372॥ श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुन आपल्या चित्तात असा प्रसन्न झाला. यापुढे त्याच्या मनात शंका येऊन तो (श्रीकृष्णाला) चांगला प्रश्न करील ॥373॥ तो प्रसंग मोठा बहारीचा आहे. (जणू काय तो) सर्व धर्मांचे आगरच किंवा विचाररूपी अमृताचा अमर्याद सागरच आहे. ॥374॥ सर्व ज्ञानांचा जो श्रीकृष्ण तोच स्वत: जे निरूपण करील, ती हकीकत निवृत्तिनाथांचा शिष्य ज्ञानदेव सांगेल. ॥375॥
|| दुसरा अध्याय समाप्त ||
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : …परी न्यून नव्हे पार्था, समुद्रु जैसा