चंद्रकांत पाटील
आमचं घर म्हणजे बाबांच्या घामाचं आणि आईच्या ममतेचं कोंदण होतं. मी उषा आणि माझी धाकटी बहीण निशा, आम्ही दोघीही आई-वडिलांच्या लाडक्या लेकी. आमचं बालपण पलूसजवळच्या एका चिमुकल्या खेडेगावात गेलं. बाबा, किर्लोस्करवाडीच्या कारखान्यात एक निष्ठावान कामगार म्हणून राबायचे. सकाळी सात वाजता कामावर जाणारे बाबा, संध्याकाळी सातला थकून, भागून परत यायचे. कधी कधी तर रात्रपाळी असायची आणि रात्रीच्या दोन-दोन वाजता त्यांची चाहूल लागायची. त्यांच्या मेहनतीवरच आमच्या घराचा डोलारा उभा होता.
आम्ही दोघीही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होतो. मी दिसायला खूप सुंदर आणि देखणी होते, पण मी शापित होते. माझ्या पायावर एक डिस्टॉर्शन होतं. माझा उजवा चंपा पूर्ण पांढरा दिसत होता आणि गुडघ्यावरही एक डाग होता. शाळेत स्कर्ट-ब्लाऊज घालून जायला लागायचं, तेव्हा सगळी मुलं-मुली माझ्याकडे विचित्र नजरेने बघायची. शिक्षक-शिक्षिकाही आपापसात कुजबुजायचे, “बाई, एवढी चांगली, देखणी मुलगी आहे, पण परमेश्वराने असं कसं काय केलं असेल?”
तर, काहीजण “अरेरे” करत. हे सगळं ऐकून मला खूप वाईट वाटायचं. घरी आल्यावर मी रडत बसायचे. त्यावेळी माझे बाबा मला धीर द्यायचे. “आपण त्यावर नक्की उपचार करू उषा, तू निश्चित बरी होशील,” असं ते म्हणायचे.
त्यांनी मला दर मंगळवारी सांगलीला डॉ. शहा यांच्याकडे घेऊन जायला सुरुवात केली, पण त्यांच्या उपचारांचा फारसा उपयोग झाला नाही. त्यानंतर एका डॉक्टरांनी ऑपरेशन करून गुडघ्यावरचा पांढरा डाग घालवला. पायावरही प्रयत्न केला, पण यश आलं नाही. अशा प्रकारे फक्त गुडघ्यावरचा डाग बरा झाला आणि पायावरचा डाग मोठ्या क्षेत्रात असल्यामुळे काही करता येईना, म्हणून उपचार थांबविले.
मी हायस्कूलमध्ये जायला लागले, तेव्हा फुल ड्रेस घालायची परवानगी मिळाली. पायात बूट आणि फुल ड्रेस असल्यामुळे कोणालाही डाग दिसत नसे. असेच करत करत मी दहावी-बारावीपर्यंत शिक्षण घेतले. पुढे मी बी.कॉम. झाले आणि निशाही बी.ए. झाली.
बी.कॉम. झाल्यावर मी नोकरी शोधायला सुरुवात केली. माझ्या मनात एक मोठी भीती होती, ती म्हणजे माझ्या पायावरच्या कोडाची. मला वाटायचे, यामुळे मला कोणी नोकरी देणार नाही. पण माझ्या वडिलांनी मला नेहमीप्रमाणेच धीर दिला. “उषा, तुझं शिक्षण झालंय, तुझ्या अंगी हुशारी आहे. हा डाग तुझ्या कामात कधीच आड येणार नाही,” ते म्हणायचे. त्यांच्या या शब्दांनी मला खूप बळ मिळायचं. त्यांच्या डोळ्यांत माझ्याबद्दलचा विश्वास पाहून मी अधिक जिद्दीने कामाला लागायचे.
अखेरीस, मला पलूसमधे एका छोट्या कंपनीत अकाऊंट्स विभागात नोकरी मिळाली. सुरुवातीला थोडी भीती होती, पण ऑफिसमधले लोक खूप चांगले होते. त्यांनी कधीच माझ्या डागाकडे वेगळ्या नजरेने पाहिले नाही. मी माझ्या कामात लक्ष केंद्रित केले आणि लवकरच मी माझ्या कामात पारंगत झाले. माझ्या कामामुळे मला खूप आत्मविश्वास आला. बाबांच्या बोलण्यावरचा माझा विश्वास खरा ठरला होता.
घरी आता माझ्या लग्नाची चर्चा चालू होती. स्थळे येत होती, पण माझ्या पायावर डाग असल्यामुळे निराश होऊन माघारी जात होती. असे करत करत दोन-तीन वर्षे निघून गेली. माझ्या पाठोपाठ निशाही लग्नाला आली होती. पण, “जोपर्यंत उषाचं लग्न होत नाही, तोपर्यंत निशाचं करायचं नाही,” असे आई-बाबा म्हणत होते. एक दिवस मीच निर्धार केला आणि बाबांना सांगितले, “माझं लग्न नाही झाले तरी चालेल, पण माझ्यासाठी तिचे थांबवू नका. वेळ होतोय.” शेवटी त्यांनी ना-ना करत निशासाठी स्थळे बघायला सुरुवात केली. निशा देखील तिच्या आवडीनुसार शिक्षिका झाली होती.
माझ्या आई-वडिलांना माझा खूप अभिमान होता, विशेषतः बाबा खूप खूश होते. त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले होते आणि त्यांचे ते कष्ट फळाला आले होते. आता मी त्यांना आरामात ठेवू शकत होते.
एक दिवस ठरल्याप्रमाणे दिनकरराव निशाला बघायला आले. त्यांनी निशाला पाहिले, पण जाता जाता त्यांची नजर माझ्यावर पडली. मी नाकी-डोळी स्मार्ट तर होतेच, पण माझा चेहरा अगदी वहिदा रेहमानसारखा होता; तो कोणालाही पसंत पडावा असाच होता. त्यामुळे दिनकररावांना निशाऐवजी मी पसंत पडले, त्याचबरोबर त्यांच्या घरच्या सर्वांनी मला पसंती दिली होती.
पण माझे वडील म्हणाले की, “जरी मुलगी त्यांना पसंत पडली असली तरी, खरा प्रॉब्लेम आपण त्यांना लग्नापूर्वी सांगायला हवा आणि त्यानंतरही त्यांना ती पसंत पडली तरच पुढे जाऊ.” त्यानुसार एका दिवशी त्यांनी सर्व प्रकार दिनकररावांच्या कुटुंबीयांना सांगितला. त्यांनी माझ्या पायावर पांढरे डाग आहेत, हे सांगितले. मग दिनकररावांच्या घरात हल्लकल्लोळ माजला. त्यांच्याकडे दोन मते तयार झाली – एका बाजूला आई, तर दुसऱ्या बाजूला वडील आणि मुलगा. वडील आणि मुलगा ‘चालेल’ म्हणत होते, परंतु आई ‘अशी डागाळलेली मुलगी नको, दुसऱ्या हजार मिळतील’ असं म्हणत होती.
अशा परिस्थितीत माझे लग्न थांबले होते आणि माझ्या जागी त्यांनी निशाला पसंत करून संसार थाटला होता. आता त्यांच्या घरात नवीन पाहुण्याची चाहूल लागली होती. निशाला दिवस गेले होते आणि ती माहेरी येणार होती.
हेही वाचा – Mental Health : आबालवृद्धांचे मानसिक ताणतणाव
दरम्यानच्या काळात मी ऑफिसमधल्या एका मुलाच्या प्रेमात पडले होते, परंतु तो वेगळ्या जातीचा असल्याने ‘घरचे काय म्हणतील’ या भीतीने मी थांबले होते. बाबा इकडे माझ्या लग्नासाठी खूप स्थळे पाहत होते, परंतु जुळून येत नव्हते. एक दिवस बाबांना माझे प्रेम प्रकरण समजले. त्यांना खूप वाईट वाटले, त्यामुळे त्यांची तब्येतही खालावत चालली होती. अशाही परिस्थितीत आम्ही पळून जाऊन लग्न करायची तयारी चालवली होती आणि उद्या पळून जाणार, तेवढ्यात मला एका हितचिंतकाने चिठ्ठी पाठवली, त्यातली माहिती वाचून माझे डोळे उघडले. त्यात लिहिले होते, “सदर इसमाचे पहिले लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत!” या माहितीच्या आधारे मी त्याला विचारले, तर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी मी तो विचार डोक्यातून काढायचे ठरवले आणि त्याचे परत तोंड बघायला नको म्हणून नोकरीही सोडून दिली.
तेवढ्यात निशा बाळंतपणासाठी माहेरी आली. तिला पहिला मुलगा झाला… एका सुंदर आणि गुटगुटीत बाळाने घर आनंदी झाले. निशा आणि दिनकररावांच्या संसारवेलीवर छान फूल उमललेले. मला मनोमन वाटायचे, ‘आपले लग्न दिनकररावांबरोबर झाले असते तर… असेच बाळ मलाही झाले असते.’ अशी दिवास्वप्ने रंगवीत मी बाळाला खेळवत असायची. आई म्हणायची, “सदानकदा त्या पोराला कवटाळून बसलेली असते, तिला दुसरं काही सुचतच नाही.” खरोखरच बाळ मला खूप आवडत असे, जणू काही ते आपलेच आहे, असे समजून मी त्याला अंगाखांद्यावर खेळवत असायची, त्याची शी-शू, अंघोळपाणी, अंगडं-टोपडं पहायची. थोडक्यात मी त्याच्यातच स्वतःला गुंतवून घेतले होते.
निशा बाळंतपणासाठी आली आणि बाळंतपणापासूनच तिची तब्येत ठीक नसल्यामुळे बाळ कायम माझ्याकडेच असे, त्यामुळे त्याचे संगोपन मीच करत होते. बाळ अगदी दाजींसारखे झाले होते – बाळाचे नाक, डोळे, केस सेम टू सेम दाजींसारखे होते. शिवाय, बाळ माझ्याशिवाय राहत नसे, अर्थात मी या गोष्टीचा बाऊ केला नाही. निशा आणि दिनकररावांनी आपल्या आयुष्यात पुढे जावे हेच मला हवे होते. मी निशाच्या बाळाची, म्हणजे आपल्या भाच्याची, अगदी मनापासून काळजी घेत होते. माझ्या मनात कुठलीही कटुता नव्हती. उलट, निशाची तब्येत सुधारत नव्हती हे पाहून मला वाईट वाटत असे. निशा आता बऱ्यापैकी अशक्त झाली होती आणि बाळाची पूर्ण जबाबदारी माझ्यावर येऊन पडली होती.
एक दिवस निशाची तब्येत जास्तच बिघडली. डॉक्टरांनी सांगितले की, तिला विश्रांतीची नितांत गरज आहे आणि बाळापासून काही दिवस दूर राहणे तिच्यासाठी चांगले राहील. दिनकरराव चिंतेत पडले. त्यांना कळत नव्हते की, काय करावे. तेव्हा मी पुढे झाले आणि दाजींना विश्वास दिला की… “तुम्ही बाळाची काळजी करू नका. मी जबाबदारी घेते. तुम्ही निर्धास्त रहा. निशाकडे पूर्ण वेळ लक्ष द्या आणि तिला लवकर बरे करा, काळजी घ्या!”
हेही वाचा – Mental Health : मानसिक ताणतणाव निवारणाची आवश्यकता
मी बाळाची जबाबदारी पूर्वीपेक्षा अधिक चांगल्याप्रकारे सांभाळू लागले, जणू मी बाळाची आईच बनून राहिले. निशाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. तिला न्यूमोनिया झाला होता. चार दिवसांच्या उपचारानंतर डॉक्टरांनी आता तिच्याकडे फार कमी वेळ आहे असे सांगितले. सगळ्यांना भेटायला परवानगी दिली, मग आम्ही सगळे तिच्या कॉटजवळ गेलो. तिने मुलाला डोळे भरून पाहिले. ती काहीतरी सांगत होती, पण आवाज फुटत नव्हता. शेवटी तिने माझा हात दिनकररावांच्या हातात दिला आणि मुलाला आमच्या स्वाधीन सोडून ती परलोकी गेली.
निशाच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घराच्या भिंतींनाही जणू शोककळा पसरली होती. निशा गेली, पण ती तिच्या मागे एक अनमोल वारसा सोडून गेली होती… तिचा निरागस बाळ. तिच्या स्मृतीसाठी मी दाखवलेले निस्वार्थ प्रेम, हे आमच्या जीवनातील अविस्मरणीय अध्याय बनले.
एक मुलगी गेली त्या गोष्टीचे बाबांना दुःख होतेच, पण दुःखातही सुख म्हणतात ना, तसे माझे सूत जुळले हे पाहून ते समाधानी दिसत होते.
आता माझ्या आयुष्याला एक नवा अर्थ प्राप्त झाला होता, एक नवा उद्देश. नव्याने सुरुवात… माझ्या डागांची चिंता आता गौण झाली होती. मी एका नव्या नात्यात, एका वेगळ्या भूमिकेत पूर्णपणे रमून गेले होते – एका पत्नीच्या, त्याचबरोबर एका आईच्या भूमिकेत आले होते. माझ्या मनात आता कोणतीही खंत नव्हती, केवळ त्या बाळाचे उज्ज्वल भविष्य घडवण्याची जिद्द होती.
मोबाइल – 9881307856