रविंद्र परांजपे
मागील लेखात आपण मानसिक ताणतणाव निवारणार्थ आरोग्यदायी संतुलित जीवनशैली अमलात आणणे नितांत आवश्यक आहे, हे वास्तव लक्षात घेतले. या लेखात आपण आबालवृद्धांचे मानसिक ताणतणाव याबाबत जाणून घेणार आहोत.
पूर्वी फक्त वयस्कर लोकांना मनोविकार समस्या असायच्या. आता मात्र किशोरवयीन तसेच तरुण-प्रौढ या सर्वांनादेखील मानसिक ताणतणावांनी ग्रासलेले असल्याचे कटू वास्तव निदर्शनास येते. मानसिक ताणतणाव कोणालाच चुकलेला नाही. प्रत्येकालाच ताणतणावमुक्त जीवन जगावेसे वाटते.
वयोमानानुसार वर्गीकरण
आयुर्वेदात मनुष्याचे आयुर्मान 100 वर्षे धरून वयाच्या तीन अवस्था सांगितल्या आहेत.
- बाल अवस्था : जन्मापासून 16 वर्षांचा कालावधी
- मध्य अवस्था : 17 ते 70 वर्षांचा कालावधी
- वृद्ध अवस्था : 70 वर्षांनंतर सुरुवात
आपल्या जीवनशैलीत कालानुरूप बदल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन आयुर्वेदातील अवस्थांमधे वयोमानानुसार कालसुसंगत बदल करून पुढीलप्रमाणे वर्गीकरण करणे यथार्थ होईल :
- किशोरवयीन मुले आणि मुली – 16 वर्षांपर्यंत
- तरुण-प्रौढ पुरुष आणि महिला – 17 ते 60 वर्षे
- ज्येष्ठ पुरुष आणि महिला – 60 वर्षे पुढील.
हेही वाचा – Mental Health : मानसिक ताणतणाव निवारणाची आवश्यकता
वयोमानानुसार मानसिक ताणतणाव
- किशोरवयीन मुले आणि मुली – साधारणतः तीन वर्षांपासून यांच्या शिक्षणास आरंभ होतो. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात वयोमानानुसार टप्प्याटप्प्याने वाढ होत असते. या कालावधीत विद्यार्थी पुढील प्रकारचे ताणतणाव अनुभवत असतात.
- मनातील भीती आणि असुरक्षितता
- अभ्यास आणि परीक्षेचा ताण
- घरातील विपरीत वातावरणातून येणारी अस्वस्थता
- मोबाइलच्या घातकी व्यसनातून उद्भवणारे दुष्परिणाम आणि ताण
- वयोमानानुसार होणाऱ्या मनोकायिक बदलांतून येणारे ताण
- तरुण-प्रौढ पुरुष आणि महिला – वय वर्षे 17 ते 60 यामधील पुरुष व महिला यांना सर्वसाधारणपणे पुढील मानसिक ताणतणावांना सामोरे जावे लागते :
- नोकरी, व्यवसायातील ताणतणाव
- वयपरत्वे उद्भवणाऱ्या शारीरिक तक्रारी तथा मानसिक समस्या
- नातेसंबंधातील समस्या आणि उद्भवणारे ताणतणाव
- आर्थिक अडचणींमुळे येणारे ताणतणाव
- व्यसनाधीनतेच्या विपरीत परिणामांमुळे आलेले ताणतणाव (एकंदरीतच अवाजवी स्क्रीनटाइम हे देखील एक व्यसनच म्हणता येईल)
हेही वाचा – Mental Health : मानसिक ताणतणाव निवारणार्थ…
- ज्येष्ठ पुरुष आणि महिला – वयाच्या साठीनंतर ज्येष्ठ पुरुष आणि महिला यांना विशेष करून पुढील ताणतणावांचा सामना करावा लागतो :
- शारीरिक व्याधी-विकारांमुळे उद्भवणारे ताणतणाव
- निद्रानाशातून येणारे ताणतणाव
- एकाकी जीवनातील ताणतणाव
- कौटुंबिक वातावरणातून उद्भवणारे ताणतणाव
- आर्थिक समस्यांमुळे आलेले ताणतणाव
वयोमानानुसार येणाऱ्या निवडक ताणतणावांचा उल्लेख अगदी वानगीदाखल केला आहे. आजच्या धकाधकीत ताणतणावांचे स्वरूप आणि त्यातून उद्भवणाऱ्या मनोकायिक समस्या ही खरोखरच चिंताजनक बाब झाली आहे.
ताणतणावांवर यशस्वीरीत्या मात करून ताणतणावमुक्त जीवन जगणे अवघड असेल, पण अशक्य मात्र अजिबात नाही. ताणतणावमुक्त जीवन जगण्यासाठी विचारपूर्वक प्रयत्न हवेत आणि प्रयत्न प्रत्यक्षात आणण्यासाठी श्रद्धा, संयम आणि सातत्य असणे आवश्यक आहे.
क्रमशः
(लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून त्यांच्या ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकात त्यांनी मानसिक ताणतणाव निवारणार्थ निवडक उपयुक्त उपाययोजनांबद्दल सर्वांगीण सर्वसमावेशक सविस्तर सखोल मार्गदर्शन केले आहे; तसेच मानसिक आरोग्य संवर्धनासाठी वयोमानानुसार किशोरवयीन, तरुण-प्रौढ आणि ज्येष्ठ यांना विशेष मार्गदर्शन केले आहे. पुस्तकासाठी त्यांना वैयक्तिक संपर्क करावा.)
मोबाइल – 9850856774