Saturday, August 30, 2025

banner 468x60

HomeअवांतरUnethical values of journalism : व्यवसायाची लाज घालविणारे वर्तन!

Unethical values of journalism : व्यवसायाची लाज घालविणारे वर्तन!

अजित गोगटे

बातमीदारीसाठी बाहेरगावच्या अनेक दिवसांच्या प्रायोजित दौऱ्यावर नेण्यात येते तेव्हा, आपल्या कामाच्या स्वरूपाबद्दल डोक्यात हवा गेलेले पत्रकार, त्यांच्या वर्तनाने स्वतःसोबतच त्यांच्या व्यवसायाचीही कशी लाज घालवतात, याविषयीच्या एका घटनेसंबंधी लिहून आज मी या ‘आत्मनिंदे’च्या मालिकेला पूर्णविराम देणार आहे. दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये नोकरीस असताना 1990च्या दशकाच्या सुरुवातीस मी अनुभवलेला हा प्रसंग आहे.

भारत सरकारच्या ‘पत्र सूचना कार्यालया’तर्फे (PIB) मुंबईतील पत्रकारांचा नाशिक जिल्ह्याचा चार दिवसांचा दौरा आयोजित केला गेला होता. विविध उद्योग-व्यवसायांना अर्थसाह्य करून नाशिक जिल्ह्याच्या विकासात कसे भरीव योगदान दिले आहे, हे दाखविण्यासाठी हा दौरा होता. नाशिक जिल्ह्याची त्यावेळी ‘लीड बँक’ असलेली ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ समन्वयक होती. एका विशेष बसने 20-22 पत्रकारांना नेण्यात आले. संपूर्ण दौऱ्यात ‘PIB’चा एक अधिकारी ‘संपर्क अधिकारी’ म्हणून सोबत होता. मुक्कामाची सोय नाशिकमधील गोल्फ क्लबशेजारच्या शासकीय अतिथीगृहात होती. रोज सकाळी नाष्टा झाल्यावर एका बँकेच्या अधिकाऱ्यांचा चमू त्यांच्या कर्जदार / खातेदारांचे उद्योग-व्यवसाय दाखविण्यासाठी घेऊन जायचे. दुपारचे जेवण बाहेरच कुठेतरी व्हायचे.

रात्रीच्या जेवणासाठी रोज गोदावरी हॉटेलमध्ये नेण्याचे त्यांनी ठरविले होते. परंतु त्या हॉटेलात दारू पिण्याची सोय नाही, हे पहिल्या दिवशीच समजले. त्यावरून पत्रकारांनी राडा केला आणि दुसऱ्या दिवसापासून जेथे जेवणाच्या आधी मद्यपान करता येईल, अशा हॉटेलमध्ये नेण्याचा किंवा आधी गेस्टहाऊसमध्ये दारू पिऊन नंतर बाहेर जेवायला न्यावे, असा हट्ट धरला. आमच्यासोबत असलेल्या अधिकाऱ्यांना त्यासाठीचा जास्तीचा खर्च करण्याचे अधिकार नव्हते. रीजनल मॅनेजरपर्यंत बोलून परवानगी घेण्यात आली. फुकट मिळते म्हणून पत्रकारांनी संपणार नाही एवढी दारू आणि चकणा आणायला लावला.

नंतरचे तीन दिवस गेस्ट हाऊसवर मध्यरात्रीपर्यंत दारू पिणे झाले. मग गावातील हॉटेले बंद झाली म्हणून गावाबाहेरच्या धाब्यावर जावे लागले. रोज रात्री झोपायला खूप उशीर झाल्याने दुसऱ्या दिवशी सकाळचे ठरलेले वेळापत्रकही पाळणे शक्य झाले नाही. आपल्या या मनमानी वागण्याने इतरांना सकाळपासून रात्री दोन-अडीचपर्यंत नोकरासारखे राबावे लागत आहे, याचे भान ठेवण्याची माणुसकीही दाखविली गेली नाही. कळस म्हणजे शेवटच्या दिवशी मुंबईला परत जाताना बसमध्ये पिण्यासाठीही बियरच्या बाटल्या आणायला लावल्या. उरलेल्या घरी नेता याव्यात यासाठी त्या संपणार नाहीत, एवढ्या आणायला लावल्या गेल्या.

हेही वाचा – Unethical values of journalism : सरकारी घरे, पत्रकारांपुढील मोहक मायाजाल

तीन दिवसांत नाशिकमधील सातपूर आणि अंबड या दोन्ही औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखान्यांमध्ये नेण्यात आले. ‘व्हीआयपी’ लगेज बनविणाऱ्या पहिल्याच कारखान्यात गेल्यावर, तेथील अधिकाऱ्यांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात, भेटवस्तू देण्याविषयी मुद्दाम वाच्यता केली गेली. त्यांनी बिचाऱ्यांनी घाईघाईने व्यवस्था केली आणि बाहेर पडताना प्रत्येक पत्रकाराच्या हातात ऑफिसला नेण्याची ब्रीफकेस सोपविली. यावरून सावध होऊन बँकेच्या आणि ‘PIB’च्या अधिकाऱ्यांनी पुढे भेट द्यायच्या शक्य तेवढ्या ठिकाणी, न मागता भेटवस्तू दिली जाईल, याची व्यवस्था केली.

खोसला कॉम्प्रेसर्स आणि गरवारे फिल्म्स हे दोन कारखाने याला अपवाद ठरले. कारण त्यांची उत्पादने भेटवस्तू म्हणून देण्यायोग्य नव्हती. अमेरिकेतून भारतात परत येऊन एका तरुणाने सुरू केलेला बटणसेल बनविण्याचा कारखाना आवर्जून दाखविला गेला. तेथेही लाज खुंटीवर टांगून ठेवलेल्या काही पत्रकारांनी त्या तरुणाकडून बटणसेलची काही पाकिटे मागून घेतली. मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकविणाऱ्या एका सहकारी सोसायटीच्या फार्मवर गेलो, तेव्हा येणाऱ्या पत्रकारांची कीर्ती तेथे आधीच पोहोचली होती. परत येण्याच्या दिवशी त्या फार्मवाल्यांनी प्रत्येक पत्रकारांसाठी 20 किलो भाज्या भरलेली करंडी आणून दिली. त्या सर्व करंड्या बसच्या डिक्कीमध्ये भरून या निर्लज्ज लाचारीचा कळस गाठला गेला!

हेही वाचा – Unethical values of journalism : बँक अधिकारी अन् ‘वजनदार दलाल’ पत्रकार!

या सर्व दौऱ्यात बाहेरच्या सर्वांनी चेहऱ्यावर वरकरणी हसू ठेवून आदरातिथ्य केले खरे, पण नंतर पाठीमागे त्यांनी पत्रकारांची काय किंमत केली असेल, याची कल्पना तुम्हाला आलीच असेल.

(समाप्त)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!