रश्मी परांजपे
मागील लेखात आपण पूर्व-प्राथमिक शाळेची आवश्यकता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जाणवायला लागली, हे लक्षात घेतले. तसेच प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी पूर्व-प्राथमिक शिक्षण गरजेचे असल्याचे आपल्याला समजले.
बाळाच्या जन्मानंतर वर्षभरातच पालकांची शाळा-शोध मोहीम सुरू होते. मुलाच्या शालेय शिक्षणाचा आरंभ यशस्वी होण्यासाठी खालील निवडक मुद्द्यांचा आवर्जून विचार करणे नक्कीच यथार्थ ठरेल.
शाळा घराजवळ असावी
घर आणि शाळा यातील अंतर फार असेल तर, शाळेत पोहोचायला साहजिकच जास्त वेळ लागतो, त्यामुळे मुलं कंटाळण्याची शक्यता असते. म्हणून शाळा शक्यतो घराजवळ असावी.
शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे
मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा आईवडील आणि घरातील कुटुंबीय यांच्यापासून दूर राहण्याची त्यांची पहिलीच वेळ असते. साहजिकच मुलं बावरतात आणि स्वभावानुसार या बदलाला प्रतिक्रिया देतात. शांत स्वभावाची मुलं रडतात किंवा अधिकच शांत होतात. आक्रमक स्वभावाची मुलं अधिक आक्रमक होतात आणि चिडतात तसेच जोरजोरात ओरडतात तसेच रडतात. मुलं मातृभाषेतून शिकणार असतील तर, घरातील भाषा शाळेत ताईंकडून (पूर्व- प्राथमिक शाळेत शिक्षिकेला ताई असे संबोधतात) ऐकायला मिळाली की, मुलांना ओळखीच्या वातावरणाचा अनुभव येतो आणि मुलं लवकरच बदल स्वीकारून स्थिरावतात. हल्ली इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच प्रवेश घेण्याकडे अधिक कल असतो, याची मला कल्पना आहे. तरी देखील शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असणे, हे सर्वार्थाने श्रेयस्कर आहे, असे मला मनोमन वाटते आणि शिक्षणतज्ज्ञांचेही असेच मत आहे.
शाळेत जाण्यासाठी मुलांची मानसिक तयारी करणे
शाळेतील प्रवेश निश्चित झाल्यावर मुलाच्या मनाची तयारी करण्यासाठी योग्य पावले उचलावीत. मुलाला सांगायला हवे की, “तू आता शाळेत जाणार आहेस, तिथं नवीन खेळ खेळणार, चित्रं रंगवणार, तुला मित्र-मैत्रिणी मिळतील, शाळेतील ताई तुम्हा सर्वांना छान-छान गोष्टी सांगणार आणि गाणी शिकवणार.” अशा पद्धतीने मुलांशी बोलल्यास, त्यांच्या मनात शाळेविषयी उत्सुकता निर्माण होईल. मुलं स्वतःहूनच म्हणतील, “दाखवा ना मला शाळा.”
मुलांना लवकर उठण्याची सवय लावणे
शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलाला “लवकर उठ, आता शाळेत जायचयं”, असं म्हटलं तर मुलं कुरबूर करून उठतील आणि नाखुशीनंच शाळेत जातील. याऐवजी शाळेच्या वेळेनुसार मुलांना लवकर उठायची तसेच रात्री लवकर झोपण्याची सवय शाळा सुरू होण्यापूर्वीच लावण्यास सुरुवात करावी.
शाळेतील गणवेषाविषयी पूर्वकल्पना देणे
मुलांना नेहमीच स्वतःच्या आवडीचे कपडे घालायला आवडतं. त्यामुळे रोज-रोज तेच कपडे घालायला मुलांना कसं आवडेल ? म्हणूनच मुलांना अगोदरच गोड शब्दांत सांगावे की, शाळेत मात्र गणवेष घालावा लागेल, तू गणवेषात छानच दिसशील. यामुळे मुलं गणवेष घालायला खुशीने तयार होतील.
शाळेत डबा खाण्याबद्दल पूर्वकल्पना देणे
मुलांना आवडीचंच खायला आवडतं. म्हणून पोळी-भाजीचा डबा तयार करून मुलांना गोडीगुलाबीत सांगावं की, “आपण एकत्र जेऊ. तू तुझ्या हातानं खा.” आईनं मुलाबरोबर जेवावं. मुलाने सांडलवंड केल्यास न रागावता गोड शब्दांत समजावून सांगावे. यामुळे मुलांना पोळी-भाजी स्वतःच्या हाताने व्यवस्थित खायची सवय लागेल.
मुलाला शाळा दाखवणे
शाळा सुरू होण्यापूर्वी शाळाप्रमुखांच्या संमतीने मुलाला एकदोनदा शाळा दाखवून आणावी. तसेच, शाळेतील विविध उपक्रमांची माहिती घेऊन त्यापैकी काही गोष्टी मुलाला शिकवाव्यात आणि करून घ्यावात. यामुळे मुलाला शाळेत रूळायला सोपं जाईल.
शाळा प्रवेशानंतर आणि शाळा सुरू होण्यापूर्वीच्या मध्यंतरीच्या काळात आईवडिलांनी वरील मुद्द्यांवर मुलांची पूर्व-तयारी करून घेतल्यास मुलांच्या शालेय शिक्षणाचा श्रीगणेशा खचितच सुलभ आणि आनंददायी होइल.
॥ बालमानसशास्त्र लेखमाला : लेख 2 इति ॥
क्रमशः
(लेखिका पूर्व-प्राथमिक शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून 32 वर्षे कार्यरत राहून निवृत्त झाल्या. या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनमोल योगदान केले.)
मोबाइल – 9881943593