अजित गोगटे
व्यावसायिक पदाचा व्यक्तिगत लाभासाठी उपयोग (दुरुपयोग) न करणे, हेही पत्रकारितेच्या नीतिमूल्यांपैकी एक मूल्य आहे. इतर मूल्यांप्रमाणे या मूल्याचे पालन न करणारेही बरेच असतात. मात्र,, काही ‘वजनदार’ पत्रकारांनी या मूल्याचे अगदी कमालीचे अवमूल्यन करून स्वतःचे एक वेगळेच स्थान निर्माण केल्याचीही उदाहरणे आहेत. पत्रकारितेतील कौशल्याऐवजी सरकार दरबारी असलेल्या ‘वजना’मुळे असे पत्रकार नावलौकिक मिळवितात. असे पत्रकार आपल्या पदाचा वापर सरकार दरबारी अडकलेली कामे करून देणारे ‘दलाल`‘ म्हणून करतात. अनेक वर्षांच्या अनुभवाने त्यांची पत्रकार ही ओळख ‘दलाल’ या ओळखीत मिसळून गेलेली असते. यापैकी काही बहाद्दर ज्यांच्याकडून काम करून घ्यायचे आणि ज्याचे काम करायचे अशा दोघांकडून ‘दलाली’ घेतात. काही गडबड झाली तर अडचणीत येऊ नये म्हणून त्यांनी रोखीऐवजी अन्य मार्गाने दलाली घेण्याचे मार्गही शोधलेले असतात.
आजचे माझे लिखाण जुन्या जमान्यातील अशाच एका मातब्बर ‘पत्रकार दलाला’विषयी आहे. हा पत्रकार नागपूर येथील एका इंग्रजी वृत्तपत्राचा मुंबईतील प्रतिनिधी होता. त्याची मातब्बरी एवढी होती की, त्या काळात, म्हणजे 1970-80च्या दशकांत मंत्रालयातील पत्रकार दालनात ज्या फक्त दोनच पत्रकारांचे फोटो लावलेले असायचे, त्यापैकी एक हा होता. याची शरद पवार यांच्याशी एकेरी नावाने संबोधण्याएवढी घसीट होती. वसंतदादा पाटील यांच्या पाठीत बंडखोरीचा खंजीर खुपसून शरद पवार पाहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तो काळ या ‘दलाल पत्रकारा’चा सद्दीचा काळ होता. मी सांगणार असलेली घटनाही त्याच काळातील आहे. ज्येष्ठ समव्यावसायिक म्हणून ही व्यक्ती माझ्या चांगली परिचयाची होती. घटनेचा मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसलो तरी, तिची माहिती मला त्या व्यक्तीनेच दिली होती. आज ती व्यक्ती हयात नसल्याने मी तिचा नावानिशी उल्लेख करणार नाही. सोयीसाठी या लिखाणापुरते आपण त्यांना ‘पत्रकार साहेब’, असे म्हणू.
हेही वाचा – पत्रकारितेची नीतिमूल्ये आणि प्रसार माध्यमांची विश्वासार्हता
नंतर राष्ट्रीयिकरण झालेल्या अनेक बँकांच्या त्या काळात मुंबईत अधिकाऱ्यांसाठी मोजक्या ‘स्टाफ क्वार्टर्स’ होत्या. बँकांचा झपाट्याने विस्तार झाला आणि त्याचबरोबर त्यांचे कर्मचारी आणि अधिकारीही वाढले. अपुऱ्या क्वार्टर्स आणि मुंबईतील घरांच्या न परवडणाऱ्या किमती यामुळे बहुसंख्य बँक अधिकारी दूरवरच्या उपनगरांतून मुंबईत कामावर यायचे. या पार्श्वभूमीवर एका राष्ट्रीयिकृत बँकेतील अधिकाऱ्यांनी आपल्याला मुंबईत स्वतःचे घर बांधण्याच्यादृष्टीने विचार सुरू केला. चौकशी करता त्यांना कळले की, नोकरदारांच्या सहकारी गृहनिर्माण सोसायटीला निवासी घरे बांधण्यासाठी मुंबईत सरकारी भूखंड भाडेपट्ट्यावर देण्याची राज्य सरकारची योजना आहे. बरीच मेहनत आणि धावपळ करून त्या बँकेतील 70-75 अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन नियोजित सहकारी गृहनिर्माण सोसायटी स्थापन केली आणि तिच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात भूखंडासाठी अर्ज केला.
बराच काळ लोटला, पण अर्ज पुढे सरकेना. तेव्हा त्यांना ‘जादुई’ चावीने खास करून मंत्रालयात चक्रे फिरविल्याशिवाय काम होणार नाही, या वास्तवाची संबंधितांनीच कल्पना दिली. ही चक्रे नेमकी कुठे फिरवायची आणि ती कोण फिरवू शकेल? याचे कोडे पडलेल्या या बँक अधिकाऱ्यांना कोणीतरी आपल्या या ‘पत्रकार साहेबां’चा संदर्भ दिला. “साहेब काम नक्की करतील. पण हात ‘ओले’ केल्याशिवाय काम होणार नाही”, असे आवर्जून सांगण्यात आले.
‘पत्रकार साहेबां’ची मदत घेतल्यावर रुसून, रुतून बसलेल्या भूखंडाच्या फाईलला पाय फुटले आणि ती धावू लागली. पुढील काही महिन्यांतच भूखंडाचे ‘Allotment Letter’ घेण्यासाठी येण्याची आनंदवार्ता देणारे पत्र अधिकाऱ्यांच्या सोसायटीच्या नावे आले. ‘पत्रकार साहेब’ सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना स्वतः सोबत घेऊन गेले आणि ‘Allotment Letter’ त्यांच्या सुपूर्द केले. एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला गेला. पण या आनंदातही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना ‘हात ओले न करता काम कसे झाले?’, हा प्रश्न सतावत होता.
हेही वाचा – पत्रकारितेमधील अनीतिमूल्ये : `व्होडका` भेट देऊन लाज काढली!
मनाचा धीर करून, मोठ्या संकोचाने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी हा विषय काढला. तेव्हा ‘लोक मला बदनाम करण्यासाठी काहीही सांगतात’, असे म्हणून ‘पत्रकार साहेबां’नी उलट त्यांनाच दटावले! आपले काम आता झाले आहे, तेव्हा ‘साहेबां’ना काही तरी द्यायायला हवे, असं सज्जनतेचा विचार करून सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी तसा आग्रह धरला आणि ‘साहेब सांगतील ती रक्कम आम्ही वर्गणी काढून देऊ’, अशी तयारी दर्शविली. मोठा नाईलाज झाल्याचा आव आणत ‘पत्रकार साहेबां’नी यावर मार्ग काढला. त्यानुसार सोसायटी सदस्यांच्या यादीत ‘साहेबां’चे नाव घालून ‘सदिच्छा भेट’ म्हणून त्यांना सोसायटीच्या नियोजित इमारतीमध्ये त्यांना विनामूल्य फ्लॅट देण्याचे ठरले. अशा प्रकारे या ‘दलाल पत्रकारा’ने पश्चिम उपनगरात उभ्या राहिलेल्या बँक अधिकाऱ्यांच्या इमारतीत ‘विनामूल्य फ्लॅट’च्या रूपाने साळसूदपणे दलाली घेतली.
(क्रमशः)