मध्यंतरी ऑफिसच्या कामासाठी बरीच फिरती सुरू होती. कधी मुंबईतच वेगवेगळ्या ठिकाणी, तर कधी पुण्याला. मजा येते फिरायला, कामं तर असतातच, पण त्यासोबतच वेगवेगळे अनुभव पण येत असतात, जगणं समृद्ध करणारे. कधी सुखावणारे, तर कधी सावध करणारे.
एका कामासाठी हैदराबादला जाण्याचा योग आला. धावती भेट, सकाळी जाऊन संध्याकाळी परत. आमचा चार जणांचा संच. रविवारी सकाळी 7.45 चं उड्डाण. साडेचारला घरून निघावं लागतं, तरच सगळे सोपस्कार पार पाडून, धावपळ न होता प्रवास होतो. जाताना Indigo चं विमान. जिथे जावं तिथे हेच असतं.
जेमतेम एक तासाचा प्रवास, पण त्यासाठीचं सव्यापसव्य वात आणणारं. स्थानापन्न झाल्यावर, ‘कुर्सी की पेटी‘ बांधून झाल्यावर, हवाई सुंदरीचे आपात्कालीन सोपस्कार पार पडल्यावर, विमान हलतं आणि विमानतळाच्या आसपासच्या बहुमजली झोपड्यांची विहंगम दृश्य बघत आपण मार्गस्थ होतो.
‘खानपान‘ सेवेची घोषणा होते आणि एक गारढोण, ‘जंगली सॅण्डविच‘ समोर येतं. त्याला असं नाव का, हे त्या कचकड्याच्या बाहुलीला विचारावंसं खूप मनात असतं, पण विचारायचा धीर नाही होत.
सकाळी लवकर उठल्यामुळे, खरंतर, एका कडक चहाची नितांत गरज असते, पण तिच्याकडे तोच नसतो. ‘Only cold beverages sir‘ असं सांगून, भयंकर साखर असलेल्या फळाच्या रसाचा कागदी पेला दिला जातो. हा रस नको असेल तर कोकाकोला असतो. दगडापेक्षा वीट मऊ, या न्यायाने मग मी फळाचा रस prefer करतो, you know!!
हैदराबादला उतरून, टॅक्सी करून ऑफिसला प्रस्थान. काम आटोक्यात येईस्तोवर, काटा दीडच्या पुढे झुकलेला… पोटात कावळ्यांचं नर्तन सुरू झालेलं… जाऊ तिथे, स्थानिक खाणं मी नेहमीच पसंत करतो.
तिथल्या लोकांनी विचारलं, “सर.. क्या खाओगे?” मी म्हणालो, “जो खिलाओगे वो खाएंगे”
“There is an authentic eatery nearby. shall we go there?” सगळेच म्हणाले, नेकी और पूछ-पूछ? चला जाऊया.
आम्ही तडक त्या साध्याशा, पण स्वच्छ खानावळीकडे मोर्चा वळवला… जेवायला बसलो. स्टीलचं ताट आणि त्यात केळीचं हिरवंगार पान. ताटांमध्ये भाताचे डोंगर रिते झाले. तीन मोठ्या वाट्यांमध्ये, सांबार आणि दोन अगम्य भाज्या. तळलेले पापड आणि लोणचं सोबतीला…
हेही वाचा – आजीचा मूलमंत्र… निपटून घ्या!
पुरी, पोळी असं काही येतंय का, याची वाट बघितली, पण चिन्ह काही दिसेनात. वाढलेल्या भाताच्या निम्मा भात वेगळा काढून ठेवला. चार दिवस पुरेल एवढा ऐवज होता तो… चमचे दिसतायत का आजूबाजूला याचाही शोध घेतला, पण दिसेनात. शास्त्रोक्त जेवायचं असेल तर, चमचे कुचकामी ठरतात म्हणे तिथे.
इकडे तिकडे नजर फिरवत, तिकडचे स्थानिक काय करतायत, याचा अदमास घेतला. डोंगर पोखरला त्यांनी. मध्यभागी आळं केलं आणि त्यात, त्या वाट्यांमधल्या रसायनांपैकी एक ओतलं. पुढे काय याचा साधारण अंदाज होता, पण अनुभवायची अनिवार उत्सुकता होती… हाताचा पंजा, सांबार आणि भात यांची गाठ पडली. भात, सांबार आणि वाट्यांमधल्या अगम्य भाज्या एकत्र कालवल्या गेल्या, भाताचा एकसंध असा जिन्नस तयार झाला आणि बघता बघता, त्याचा गोळा वळून तो मुखात पडला. माझे हात तसं काही करायला धजावेतना!
मी आपला घरी जेवतो तसा थोडासा भात, त्यात सांबार ओतून, लहानपणापासूनच्या संस्कारांप्रमाणे बोटांनी कालवू लागलो. भात कालवताना आणि जेवताना हाताचा तळवा कोरडा राहिला पाहिजे, अशी लहानपणापासूनची शिकवण आणि त्याच्या विरुद्ध परिस्थिती इथे. आता चमत्कारिक नजरेने बघायची त्यांची पाळी होती!
त्यांच्या भाताच्या गोळ्यांपुढे माझा घास म्हणजे अगदी चिऊ-काऊचा… बाळाला भरवतात तसा.
माझी ती स्थिती पाहून एकजण पुढे सरसावला. मी नको नको म्हणत असताना, माझ्या पानात भाताचा डोंगर रचला गेला आणि तो भात कसा कालवायचा, याचं मौलिक प्रशिक्षण देणं सुरू झालं. पूर्ण तळहात बरबटून, भाताचा गोळा करून, एक गोळा पोटात गेल्यावरच ते प्रशिक्षण सार्थकी लागलं. एकदा ती पद्धत कळली आणि मग सांबार भाताचा दुसरा हप्ता पण मी रिचवला आणि त्यानंतरच, त्या आनंद निधानाचा समारोप झाला.
हेही वाचा – 45 वर्षांनंतरही ताजा असणारा मास्टरपीस….. एक दुजे के लिये!
बायकोला फोन केला, तर ती हसायलाच लागली. का, विचारलं तर म्हणे, लुंगी नेसलेला, मांडी घालून, उघडाबंब बसलेला, भस्माचे पट्टे ओढलेला, कोपरापर्यंत वाहत असलेले सांबाराचे ओघळ चाटणारा, गोजिरवाणा तू, माझ्या नजरेसमोर आलास.
माझंच हे असं आगळंवेगळं रूप नजरेसमोर आणून, मीही मनसोक्त हसलो, तिच्या कल्पना चित्राला दाद देत. तिला म्हणालो, तू हस, पण जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे!!
जिथे जातो तिथे, हा भात काही माझा पिच्छा सोडेना झालाय. थाई करी आणि जास्मिन भात झाला पुण्याला, आता सांबार भात ओरपला हैदराबादला…


