दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 29 नोव्हेंबर 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 08 मार्गशीर्ष शके 1948; तिथि : षष्ठी 25:46; नक्षत्र : पुष्य 10:59;
- योग : ब्रह्मा 17:08; करण : गरज 14:47;
- सूर्य : वृश्चिक; चंद्र : कर्क; सूर्योदय : 06:52; सूर्यास्त : 17:59;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2083; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
कादंबरीकार भाऊ पाध्ये
टीम अवांतर
वास्तववादी लेखन करत सामान्य माणसाच्या जगण्याला शब्दबद्ध करणारे प्रभाकर नारायण अर्थात भाऊ पाध्ये यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1926 रोजी दादर येथे झाला. मुंबई विद्यापीठातून 1948 साली त्यांनी अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवली. पुढे 1949 ते 1951 या काळात ते कामगार संघटनेचे पूर्ण वेळ कार्यकर्ते होते.
नंतर किंग जॉर्ज हायस्कूल, एल कदूरी हायस्कूल आणि बी. एस. इझिकेल हायस्कूल येथे त्यांनी प्रत्येकी एकेक वर्ष शिक्षकाची नोकरी केली. स्प्रिंग मिल येथे 4 वर्षं आणि आयुर्विमा महामंडळ येथे 4 महिने कारकुनी केली. याशिवाय हिंद मजदूर, नवा काळ आणि नवशक्ती या दैनिकांसाठी पत्रकार म्हणून देखील त्यांनी काम केले. 11 वर्षे नवशक्तीत काम केल्यानंतर त्यांनी काही काळ ‘झूम’ या सिने-साप्ताहिकाचे संपादन देखील केले. याशिवाय ‘रहस्यरंजन’, ‘अभिरुची’, ‘माणूस’, ‘सोबत’, ‘दिनांक’, ‘क्रीडांगण’, ‘चंद्रयुग’ या नियतकालिकांतून स्तंभलेखन केले. ‘सोबत’ या नियतकालिकात ते पिचकारी नावाचे सदर लिहित असत.
हेही वाचा – साडी अन् तीन पिढ्या…
मराठी साहित्यात लघुकथा हा प्रकार स्थिरावत असतानाच पाध्ये यांचा लेखन प्रवास सुरू झाला. कामगार चळवळीशी असणारा संबंध आणि पत्रकार म्हणून अनेक वर्षे केलेले काम यामुळे 1970 च्या दशकात मुंबईत होत असणारे संक्रमण, शिवसेनेचा झालेला उदय आणि कापड गिरण्यांमुळे निर्माण झालेली कामगार संस्कृती हे सगळं त्यांनी जवळून पाहिले, अनुभवले होते. याचेच प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात पडलेले आपल्याला बघायला मिळते.
वासूनाका, वैतागवाडी, बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर, होमसिक ब्रिगेड, राडा, वणवा, वॉर्ड नंबर 7-सर्जिकल, जेल बर्ड्स सारख्या कादंबऱ्या, मुरगी, थालीपीठ, थोडीसी जो पी ली सारखे कथासंग्रह आणि ऑपरेशन छक्कासारखे नाटक असे साहित्य भाऊ पाध्ये यांच्या लेखणीतून उतरले.
हेही वाचा – तुळशी विवाह : ऐक्याचा मंगल सोहळा…
पाध्ये यांनी मुंबईतील बदलांमुळे होणाऱ्या परिणामांचे मानसिक विश्लेषण न करता आपल्या कादंबऱ्यांमध्ये संवादात्मक, पटकथात्मक, सरळ मांडणी करून विश्लेषण आणि निर्णयाचे स्वातंत्र्य वाचकांवर सोपविले. त्या काळात त्यांची ‘राडा’ ही कादंबरी प्रचंड वादग्रस्तही ठरली होती. मुंबईचे उघडे नागडे विश्व जसे आहे तसे त्यांनी मांडले. कुठलेही निष्कर्ष काढण्याच्या भानगडीत ते पडले नाही. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात मुंबईत आणि एकंदरीत शहराच्या आरशात पाहिलेले, अनुभवलेले, मनावर कोरले गेलेले प्रसंग, घटना आपल्या साहित्यात अभिव्यक्त केल्या.
एकूणच मराठी कादंबरी आणि त्यातील नायकाची संकल्पना बदलण्याचे महत्त्वपूर्ण काम पाध्ये यांनी केले.
त्यांच्या ‘वैतागवाडी’ कादंबरीसाठी 1965 साली महाराष्ट्र राज्य पुरस्कार, तर 1968 साली ‘बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर’ कादंबरीसाठी ‘ललित’ पुरस्कार मिळाले. दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी ’भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा – कथा/लेख/भाषणं’ या नावाने तर राजन गवस यांनी ’भाऊ पाध्ये यांची कथा’ या नावाने पाध्ये यांच्या कथांचा संग्रह संपादित केला. गवस यांनी पाध्ये यांच्या साहित्यावर पीएच. डी. देखील केलेली आहे. 30 ऑक्टोबर 1996 रोजी त्यांचे निधन झाले.


