भाग – 53
शर्वाय पुढे आला, आणि हलकेच तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला —
“माफ करशील ना…?”
“खरं सांगू, मला राग आलाच नव्हता आणि वाईटही नव्हतं वाटलं… मग तुम्ही माफी मागायचा प्रश्नच येत नाही…” आराध्या डोळे मिटून मान हलवली.
मग दोघंही वाड्याच्या मागच्या बागेकडे वळले… दोघांत आता पुन्हा एक शांत, नाजूक नवा बंध तयार होत होता.
शर्वाय आणि आराध्या वाड्याच्या मागच्या बागेत आले. संध्याकाळची वेळ… झाडांमधून उतरलेला मृदू प्रकाश, पक्ष्यांचे घरट्यांकडे परत फिरणे… आणि हवेत मंदसा चंदनाचा सुगंध… तिथल्या एका जुन्या बाकावर दोघं बसले….शर्वाय शांत वाटत असला तरी, कसल्याशा विचारात असल्यासारखा जाणवत होता…
आराध्या मात्र गालातल्या गालात हसत होती… शर्वायसारख्या व्यक्तीने तिची माफी मागणं, तिच्याकरिता आवर्जून गिफ्ट आणणं खरंच खूप मोठ होतं… कदाचित तिच्या आयुष्यात असं काही पहिल्यांदा घडत होतं…
शर्वाय तिच्याकडे पाहात म्हणाला, “माझं काम खरंच महत्त्वाचं होतं, पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची तू आहेस आरु! तुझी काकू आणि बहीण येणार असले तरी, त्यांच्या येण्यामागचं कारण काही वेगळच होतं…”
आराध्या त्याच्याकडे डोळे बारीक करून पाहते…
“…आणि मग, मला वाट पाहायला लावून स्वतः येऊन एक गिफ्ट देणं म्हणजे शिक्षा मिळणार नाही, असं समजता का?”
“नाही गं, ती फक्त सुरुवात आहे.”
“म्हणजे?”
“अगं आपण सोबत काम करतो, त्यामुळे अशी वेळ कितीदा येईल…”
“पण खरं सांग खरी मजा जंगलात आली होती ना? अगदी एन्जॉय करत होतीस तेव्हा… जी काही भीती होती, ती पळून गेली होती…”
“हो खरंय, किती छान समजावलं आणि समजून घेतलं होतं तुम्ही मला… जगण्याचं बळ दिलंत… लढायला शिकवलंत… पण शिवा हे ‘शर्वाय’ म्हणून आयुष्यात येतील, असं कधी वाटलंच नव्हतं… शिवाने नवा जन्म दिला जणू आणि म्हणून आभारही मानत होते रोज…”
“मग आता…?”
हेही वाचा – शह-काटशहचा खेळ सुरू…..
“आता शर्वाय माझं आयुष्य आहेत आणि त्यांच्याकरिता जे जमेल, जसं जमेल ते सगळं करेन…” असं म्हणत आराध्याने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं…
त्या शांत संध्याकाळी, जणू झाडांची पानं या क्षणांची साक्षीदार होती… प्रेमाची. आठवणींची… आणि एका नव्याने सुरू झालेल्या विश्वासाची!
आराध्या शर्वायच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत बसली होती… हवा मंद झाली होती, आणि गवतावर प्रकाशाचे कोवळे ठिपके पडले होते. त्या क्षणी दोघांनाही वाटलं — काहीच बोलायची गरज नाही.
तेवढ्यात…
पायऱ्यांवर हलकासा आवाज झाला. दोनच क्षणांत वाऱ्याबरोबर एक आवाज स्पष्ट ऐकू आला…
“खूप सुंदर क्षण आहे… फार नाजूक…”
आराध्या चटकन मागे वळली… शर्वायही सावध झाला…
गुरुजी!
त्यांच्या अंगावर पांढरं धोतर, झब्बा आणि खांद्यावर उपरण… आणि नेहमीप्रमाणे कोरडी, पण खोल नजर. त्या आल्याची चाहूल अजिबात लागली नव्हती.
“आराध्या, शर्वाय तुम्ही अजूनही शांत कसे आहात?”
गुरुजींचा आवाज कडवट नव्हता, पण कठोर अन् गिळून टाकणारा होता.
शर्वाय त्यांच्याकडे पाहतो.
“गुरुजी, इथे आम्ही बराच काळानंतर खासगीत बोलत होतो… आणि तुम्ही आलात ते कळलं नाही… सॉरी —”
“म्हणूनच आलो आहे…” गुरुजी पुढे येत म्हणाले.
“तुम्हा दोघांसाठी हे दिवस महत्त्वाचे आहेत, जे खासगी आहे, तेच कधी धोकादायक ठरतं, शर्वाय… काही वेळा भावना हे जाळं असू शकतं — त्यात शत्रू स्वतःला सहजपणे लपवतो.”
आराध्या हळूच म्हणाली….
“गुरुजी, आम्ही इथे आहोत, हे तुम्हाला कसं कळलं?”
“आराध्या, तुम्ही ज्या रस्त्यावर चालला आहात त्याकरिता प्रकाश दाखवण्यासाठी मला इथे यावंच लागणार होतं.”
शर्वाय मधेच बोलला —
“तुम्ही हे नेहमीच करत आलाय. प्रत्येक गोष्टीत सावलीसारखे मागे राहता आणि योग्य क्षणी समोर येता.”
गुरुजी फक्त हसले… “सावली मागे नसते शर्वाय. ती थांबते, बघते… आणि योग्य वेळी पुढे जाते.”
आराध्या आतून थोडी अस्वस्थ झाली… तिला वाटतं — ‘गुरुजी काहीतरी सांगायला आले आहेत, पण ते शब्दांत नाही तर, दृष्टिकोनात आहे.’
“तुम्ही सध्या ज्या लोकांच्या संपर्कात आहात, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही — हा निर्णय तुम्हाला घ्यायचाय…” गुरुजी त्यांच्याकडे रोखून बघतात.
शर्वाय जरासा पाठीमागे झाला…
“पण सावध राहा. कारण यावेळी, पुन्हा धोका चेहरा बदलून येतोय.”
गुरुजी मागे वळले आणि तसंच न बोलता चालत निघून गेले…
त्या एका क्षणात… आराध्या आणि शर्वाय दोघंही गोंधळलेले, एकमेकांकडे पाहात राहिले… त्यांचा प्रेमाचा कोवळा क्षण काहीशा गूढ सावलीत झाकोळून गेला होता!
गुरुजी निघून गेले होते, पण तरी त्यांची सावली तिथेच उरली होती… आराध्याच्या मनात, शर्वायच्या चेहऱ्यावर आणि त्या क्षणाच्या हवेत…
आराध्या काही क्षण शांत राहिली… शर्वाय तिच्याकडे पाहात असताना तिच्या मनात सुरू असलेल्या विचारांचा अंदाज त्यालाही आला.
“शर्वाय, गुरुजी काही सुचवू पाहत आहेत…”
“ते सतत असंच बोलतात, गूढ शब्दांत… तुला का वाटलं, ते काही सुचवू पाहत आहेत?”
आराध्या थोड दूर बघत म्हणाली — “त्यांनी आज ‘धोका चेहरा बदलून येतोय’ असं का म्हटलं? आणि का वाटतं की, ते कुणाबाबत तरी बोलत आहेत?”
शर्वाय विचारात पडला.
“आपल्याकडे थेट काही नाही, पण…”
काहीतरी आठवतंय असं वाटून गप्प झाला.
आराध्या ताडकन म्हणाली —
“माधव.”
शर्वायने चमकून तिच्याकडे पाहिलं…
“माधव नेहमी गुरुजींचा उल्लेख फार आदराने करतो… जणू दाखवतो तो किती मानतो त्यांना! पण मागच्या वेळी मी पहिल्यांदा इथे आले होते, तेव्हा ती चांदीची डबी इथे कोणालाही दाखवायला त्यांनी मना केलं होतं…”
“असं काहीतरी आहे जे गुरुजी आपल्याला स्वतःहून सांगू शकत नाहीत… पण आपण जर त्यांना प्रश्न केले तर?”
शर्वाय हलकेच डोळे मिचकावतो.
“म्हणजे, तुला वाटतं, माधवबाबत गुरुजींना काही गुप्त गोष्टी माहीत असाव्यात?”
आराध्या थोडीशी घाबरली…
“म्हणजे … गुरुजींना माधवच्या खऱ्या ओळखीबद्दल माहिती आहे.”
“आराध्या, चल पटकन… बघू काय म्हणतात गुरुजी…” त्याने तिचा हात धरून तिला जणू खेचलंच वाड्यात जाण्याकरिता….
आराध्या आणि शर्वाय विचारांच्या गुंत्यात होते… माधवचं अस्तित्व आणि गुरुजींचं काही सुचवणं…
दोघेही वाड्यात हॉलमध्ये जातात… तिथे काहीतरी बोलणं सुरू असल्याचे आवाज ऐकू येतात…
शर्वाय आणि आराध्याला हॉलमध्ये आलेलं पाहून गुरुजी म्हणाले,
“दोघांनीही लगेच तयार व्हा. मुंबईला जायचं आहे. वेळ फार कमी आहे.”
शर्वाय त्यांच्याकडे पाहात असतानाच त्याचा फोन वाजतो. दत्ताचा कॉल होता…
“सर, माधव ऑफिसला गेला होता… तुमच्याबद्दल विचारत होता… तुमचं केबिन उघडून हवं होतं त्याला… भडसावळेशी हुज्जत घातली त्याने… सर अजून एक, प्रकाशने त्याचा सर्च डेटा पाठवलाय… फोनवर सांगण्यासारखं नाही…”
“डोन्ट वरी… मी मुंबईलाच येतोय…” म्हणून शर्वायने कॉल कट केला.
गुरुजींचा थंड, स्थिर आवाज आला – “ज्यावर आपल्याला काम करायचं आहे, ते मुंबईला गेल्याशिवाय मार्गी लागणार नाही… शंका न करता पावलं उचलायची ही वेळ आहे.”
आराध्याने त्यांचं ऐकलं आणि सेकंदभरासाठी तिचं शरीर थरथरलं…
“आराध्या सामान घे, निघायला हव… शर्वाय गाडी काढ…”
इतकं सगळं अचानक घडत होतं आणि काही बोलताही येत नव्हतं, आनंदीला… गुरुजींना अडवता येणं शक्यच नव्हतं… मात्र दिवाकर आणि सुमित्रा आजी शांत होत्या… तसंच काहीसं असल्याशिवाय गुरुजी असं बोलणार नाहीत, हे त्यांना माहीत होतं. गुरुजीही त्या दोघांच्या सोबत असल्याने टेन्शन घेण्याचं काही कारणच नव्हतं.
हेही वाचा – …अन् शर्वायने माफी मागितली
दिवाकरना गुरुजी जवळ बोलावून घेतात आणि त्यांच्या कानात सांगतात…
“आम्ही दोन दिवसांत परत येतोय, मात्र हे कोणासही कळू देऊ नकोस… तू इथं असायला हवंस म्हणून तुला आत्ता सोबत घेत नाही इतकंच.”
गुरुजींच बोलणं ऐकून दिवाकरांच्या मनात प्रश्न निर्माण झाला… आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह पाहून आनंदीने बोलायचा धीटपणा दाखवला…
“गुरुजी इतक्या घाईने आत्ताच मुंबईला जायला हवं का?”
“हो, कारण धोका चेहरा बदलून येतोय… आनंदी कर्तव्य आणि नात्यांचा ताळमेळ नीट राख… नेहमीच नात्यांकरिता स्वतःला संकटात घालायची काही आवश्यकता नाही!”
गुरुजींचे शब्द तिला तेव्हा कळले नाहीत… पण लवकरच त्याचं उत्तर तिला मिळणार होतं…
गुरुजींनी खूण केली, तसं शर्वाय आणि आराध्या कारमध्ये मागच्या सीटवर बसले, अन् गुरुजी पुढे…. ड्रायव्हरने गाडी सुरू केली… आणि आराध्या हळू आवाजात म्हणाली —
“शहरं बदलतात, पण सावल्या का मागे येतात?”
शर्वाय तिचा हात हातात घेतो…
“कारण, आपल्यापैकी कुणीतरी अजून त्या सावलीच्या भागात अडकलेलं असतं.”


