अध्याय पंधरावा
पुढती जे तेथ गेले । ते न घेतीचि माघौतीं पाउलें । महोदधीं कां मिनले । स्रोत जैसे ॥317॥ कां लवणाची कुंजरी । सूदलिया लवणसागरीं । होयचि ना माघारी । परती जैसी ॥318॥ नाना गेलिया अंतराळा । न येतीचि वन्हिज्वाळा । नाहीं तप्तलोहौनि जळा । निघणें जेवीं ॥319॥ तेवीं मजसीं एकवट । जे जाले ज्ञानें चोखट । तयां पुनरावृत्तीची वाट । मोडली गा ॥320॥ तेथ प्रज्ञापृथ्वीचा रावो । पार्थु म्हणे जी जी महापसावो । परी विनंती एकी देवो । चित्त देतु ॥321॥ तरी देवेंसि स्वयें एक होती । मग माघौते जे न येती । ते देवेंसि भिन्न आथी । कीं अभिन्न जी ॥322॥ जरी भिन्नचि अनादिसिद्ध । तरी न येती हें असंबद्ध । जे फुलां गेलें षट्पद । ते फुलेंचि होतु पां ॥323॥ पैं लक्ष्याहूनि अनारिसे । बाण लक्ष्यीं शिवोनि जैसें । मागुते पडती तैसे । येतीचि ते ॥324॥ नातरी तूंचि ते स्वभावें । तरी कोणें कोणासि मिळावें । आपणयासी आपण रुपावें । शस्त्रें केवीं ॥325॥ म्हणोनि तुजसी अभिन्नां जीवां । तुझा संयोगवियोगु देवा । नये बोलों अवयवां । शरीरेंसीं ॥326॥ आणि जे सदां वेगळें तुजसीं । तया मिळणीं नाहीं कोणे दिवशीं । मा येती न येती हे कायसी । वायबुद्धि ॥327॥ तरी कोण गा तूंतें । पावोनि न येती माघौते । हें विश्वतोमुखा मातें । बुझावीं जी ॥328॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जैसा अग्नीचा डोंगरु, नेघे कोणी बीजअंकुरु
अर्थ
तेथे (निजधामाच्या ठिकाणी) जे लोक गेले, ते पुन्हा मागे पाऊल घेत नाहीत. (म्हणजे पुन्हा जन्मला येत नाहीत). (ते कसे तर) जसे महासागरास मिळालेले नद्यांचे ओघ (जसे माघारी येत नाहीत तसे). ॥317॥ अथवा मिठाची हत्तीण ज्याप्रमाणे खार्या समुद्रात घातली असता ती जशी परत माघारी येतच नाही. ॥318॥ अथवा आकाशात गेलेल्या अग्नीच्या ज्वाळा जशा परत येत नाहीत (अथवा) ज्याप्रमाणे तापलेल्या लोखंडापासून पाण्याला परत येणे नाही ॥319॥ त्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाने जे माझ्या स्वरूपी मिळाले, त्यांना पुनर्जन्माचा मार्ग मोडला. ॥320॥ यावर बुद्धिरूपी पृथ्वीचा राजा जो अर्जुन, तो म्हणतो, महाराज (हे आपले आत्मबोध सांगणे) हा मोठा प्रसाद आहे. परंतु माझ्या एका विनंतीकडे देवांनी लक्ष द्यावे. ॥321॥ तर महाराज, जे पुरुष देवाशी स्वत: एक होतात, (तुमच्या स्वरुपाशी ऐक्याला पावतात) व मग माघारी येत नाहीत, ते पुरुष (मूळचे) आपल्याशी (देवाशी) भिन्न असतात अथवा अभिन्न असतात? ॥322॥ जर ते पुरुष स्वरूपेकरून मूळचे भिन्नच असले, तर ते माघारी येत नाहीत, हे आपले म्हणणे विसंगत आहे. कारण की, हे आपले म्हणणे खरे असेल तर मग फुलात गुंग झालेले भ्रमर खरोखर फुलेच व्हावयास पाहिजेत. ॥323॥ स्वरूपाने लक्ष्याहून वेगळे असलेले बाण, लक्ष्याला शिवून (लक्ष्यरूप न होता) जसे पुन्हा वेगळे पडतात, तसे ते पुरुष देवाच्या स्वरूपाला स्पर्श करून, देवाशी ऐक्याला न पावता पुन्हा माघारी येतीलच. ॥324॥ अथवा ते पुरुष जर स्वभावत: तूच असले म्हणजे त्यांचे व तुझे स्वरूप मूळचे एकच असले) तर मग कोणी कोणाला मिळावयचे ? शस्त्राने आपण आपल्याला कसे रुपावयाचे? ॥325॥ म्हणून देवा, ज्याप्रमाणे तुझ्याशी अभिन्न जे जीव, त्यांचा तुझ्याशी संयोग अथवा वियोग (होतो), हे म्हणता येत नाही ॥326॥ आणि तुझ्याशी जे सदा भिन्न भिन्न आहेत, त्यांना कोणत्याही काळी तुझ्यात मिळता यावयाचे नाही. मग ते तुझ्या स्वरूपाहून माघारी येतात अथवा येत नाहीत, ही कसली व्यर्थ समजूत! ॥327॥ तरी तुझ्या स्वरूपाला पावून माघारी येत नाहीत ते कोण? हे सर्व बाजूंना मुख असलेल्या देवा, हे मला समजावून सांगा. ॥328॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : म्हणौनि चंद्रसूर्य कडवसां, पडती वस्तूच्या प्रकाशा


