“औषधाची गोळी नुसती ठेवली आहेस. कशी घ्यायची? पाणी कोण देणार?”
आजोबा नेहमीसारखे बायकोच्या अंगावर खेकसले.
“हो देते हं! मीनलशी बोलत होते…”
“लेक आणि नात आल्यापासून दोन दिवस तुझं कशात लक्ष नाही.”
“अहो तसं नाही. हे घ्या पाणी…”
आजोबांचा आवाज ऐकून मीनल खोलीतून बाहेर आली. म्हणाली, “आजोबा तिथे टेबलावर जग आहे, तुम्ही उठून पाणी घ्यायचं ना! आजीची खूप मोठी चूक झाल्यासारखे ओरडताय काय तिच्यावर? आम्ही दोघी बोलत बसलो होतो.”
अनपेक्षितपणे नातीचे हे बोलणे ऐकून आजींनी सारवासारव केली… “तसं नाही गं… खरंच, मी पाणी द्यायला विसरले.”
“आजी, तू कशाला त्यांची बाजू घेते आहेस? तू असं मिळमिळीत वागतेस म्हणून तुला ते वाटेल तसं बोलतात.”
मीनलचं बोलणं ऐकून आई रागाने म्हणाली,
“मीनल काय बोलते आहेस? तुझे आजोबा आहेत ते, याचं भान आहे ना?”
“आई गेली अनेक वर्षे मी आजोबांना बघते आहे. ते नेहमी आजीशी असंच बोलतात. तिचे बॉस असल्यासारखे वागतात. आज मात्र माझं डोकं सटकलं… साधं पाणी त्यांना हाताने घेता येत नाही का?”
हेही वाचा – आठवणींची पेटी… निसर्ग अनुभवणं!
आई हळू आवाजात म्हणाली, “अगं तुला माहीत आहे ना, त्यांचा स्वभाव जरा रागीट आहे.”
“जरा रागीट? आजोबांच्या असल्या वागण्याचं जस्टिफिकेशन काय देते आहेस? चूक ती चूकच आहे.”
आजी म्हणाली, “असू दे… जाऊ दे… मला काही वाटत नाही. स्वभावाला औषध नसतं.”
“हेच, हेच चुकतं तुमचं. स्वभावाला औषध आहे… तुम्ही त्यांना खूप आधीच एखाद्या सायकॅट्रिस्टकडे न्यायला हवं होतं.”
“म्हणजे, मला काय वेड लागलं आहे का काय?”
आजोबा तिच्यावरही ओरडले.
“थांबा आजोबा. इतके दिवस मी बोलले नाही, पण आज विषय निघाला आहे तर मी जरा स्पष्ट बोलणार आहे.”
“अगं मीनल…”
“थांब आई, अडवू नकोस, मला बोलू दे… आजोबा इतके का चिडतात? त्यांना सारखा राग का येतो? हे एखाद्या स्पेशालिस्टला विचारलं असतं, तर त्यांनी त्यांचं कौन्सलिंग केलं असतं… मेडिसिन दिलं असतं… ट्रीटमेंट केली असती.”
आई घाईत म्हणाली, “जाऊ दे, वय झालंय त्यांचं.”
“जाऊच देते आहे. पण आई ते आजीला कसं वागवतात, तू बघतेस ना? कधीतरी मला त्यांना याची जाणीव करून द्यायची होती. सगळ्यांसमोर तिचा अपमान करतात… तिला काय वाटत असेल, याचा त्यांनी कधी विचार केला नाही. आजी कसली ब्रिलियंट आहे. स्वयंपाक मस्त करते. तिने पापड, लोणची करून जरी विकली असती, तरी तिचा बिझनेस जोरात चालला असता. तिच्यातलं टॅलेंट कोणाला कळलंच नाही. आय लव यू आजी!” असं म्हणून मीनल आजीला बिलगली.
विषय बदलायला हवा म्हणून आई घाईत म्हणाली,
“जेवायला मुगाची खिचडी, कढी करते… मीनल तू आणि आजी गणपतीचे दर्शन घेऊन या.”
हेही वाचा – आठवणींची पेटी… वाट शाळेची!
बाबा आत गेले होते.
0000
खिचडी करताना आईच्या मनात आलं… ही पुढची पिढी आतताई… शॉर्ट टेम्पर आहे असं वाटतं, पण ते मनातले विचार न घाबरता बोलू शकतात. त्यांची विचार करायची पद्धत पारंपरिक नाही. तसंच, प्रसंगानुरूप त्यावर ते सोल्युशन पण देतात. निदान आजच्या प्रसंगापुरतं तरी मीनलच बोलणं आईला आवडलं होतं.
आपण इतकी वर्षं कळत असूनही जे बोलू शकलो, नाही ते ती बोलली. पण, आपण उद्या निघून गेल्यानंतर बाबा आईला काय बोलतील… किती रागवतील, याचीही तिला चिंता वाटायला लागली.
0000
आजोबा आरामखुर्चीत बसले होते. आज प्रथमच त्यांना कोणीतरी असं सुनावलं होतं. प्रचंड संताप आला होता… आपण बोललो तर, शब्दाने शब्द वाढेल म्हणून ते गप्प बसले होते. पण खोलवर आत कुठेतरी काहीतरी आज हललं होतं…
तरी पण ते मनाशी कबूल करायलासुद्धा त्यांना नको वाटत होतं… नातीच सडेतोड, रोखठोक बोलणं त्यांना विचार करायला लावत होतं, एवढं मात्र खरं!
0000
देवळाच्या पायरीवर नातीचा हात हातात घेऊन आजी म्हणत होती, “कामाचं काही वाटत नाही गं… त्यांना राग येऊ नये, याची मी काळजी घेत असते. पण कधीतरी होते चूक. त्यासाठी चारचौघात असं त्यांचं ओरडणं मला अपमानास्पद वाटतं. कोणीतरी त्यांना हे समजून सांगावं, असं मला वाटत होतं. इतक्या वर्षांत प्रथमच माझं मन तू जाणून घेतलंस…”
मीनलनी आजीचा हात हातात घेतला.म्हणाली,
“खूप आधीच मला त्यांना हे सांगायचं होतं. पण माझी हिंमत होत नव्हती. आज मात्र मी कंट्रोल करू शकले नाही. पण त्यांच्यावर रागावून त्यांना हे मला सांगायचं नव्हतं…. नीट समजावून सांगायचं होतं…. माझं जरा चुकलंच.”
रात्री न बोलता जेवण झाली.
आजोबांना काही केल्या झोप येईना. अनेक गोष्टी त्यांना आठवायला लागल्या. खूप वेळानंतर त्यांच्या मनातला संताप कमी कमी होत गेला. नातीच्या बोलण्यावर ते विचार करायला लागले… हळूहळू त्यांचे मन थाऱ्यावर आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी निघताना मीनलनी आजोबांना वाकून नमस्कार केला. त्यांच्याजवळ जाऊन म्हणाली,
“सॉरी आजोबा, मी तुम्हाला इतकं बोलायला नको होतं…” असं म्हणून ती रडायला लागली. आजोबांनी तिला जवळ घेतले. आजीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. लेकही बाबांच्याजवळ जाऊन उभी राहिली.
आजोबांनी नातीचा हात हातात घेऊन हळूच दाबला… आश्वासन दिल्यासारखा… त्यातून त्यांनी प्रत्यक्ष न बोललेले, पण तिच्या मनापर्यंत पोहोचले शब्द होते…
रडता रडता मीनल त्यांच्याकडे बघून मनापासून हसली… समजल्यासारखी…
मायेच्या धाग्यांनी ते चौघंही आज अजून जवळ आले होते….


