Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    उशिरा उजाडलेली पहाट

    November 26, 2026

    सरप्राइज!

    November 26, 2026

     स्मार्ट गूगल की आई?

    November 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, November 27
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » उशिरा उजाडलेली पहाट
    ललित

    उशिरा उजाडलेली पहाट

    ॲड. कृष्णा पाटीलBy ॲड. कृष्णा पाटीलNovember 26, 2026No Comments12 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    Avaantar, अवांतर, मराठी कथा, मराठी साहित्य, अभिजात मराठी, कृष्णा पाटील, लेखक कृष्णा पाटील, स्वार्थी भाऊ, मतलबी भाऊ, गरीब भाऊ, प्राध्यापक भाऊ, उशिरा पहाट
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    “दादा प्राध्यापक झाला!”

    बातमी घराच्या अंगणातून बाहेर पडून गावाच्या पारावर पोहोचली. गावातल्या चौकाचौकात चर्चा सुरू झाली. नानांचं भाग्य उजाडलं. आता महिन्याकाठी दीड दोन लाख कुठं गेले नाहीत. लई कष्ट केलं नानांनी. हाडाची काडं केली. बैलाबरोबर बैल झाले. औताबरोबर औत झाले. धाकला पका तर रात्रंदिवस शेतातच खपत होता. दोन दोन दिवस घराचं नावंच काढत नव्हता. ह्या कडसनं त्या कडपर्यंत ऊसाला पाणी पाजल्याशिवाय थांबत नव्हता. आता त्याच्या बायका मुलांना पण चांगले सुखाचे दिवस येतील.

    पका दोन्ही हातांनी पेढ्यांचा डबा धरून गावभर पेढे वाटत होता.

    “घ्या… दादा नोकरीला लागलाय. संभाजीनगरात!”

    कुणीतरी त्याच्या पाठीवर थाप मारली.

    “मग आता तुमचे दिवस पालटले पका‌!”

    पकाच्या चेहऱ्यावरचे हसू आणखी रुंदावले. तो प्रसन्न मनाने सांगत सुटला.

    “आता दादा शहरात घर घेईल. गावात जुन्या घराच्या ठिकाणी नवीन बिल्डिंग बांधेल. आम्हा सगळ्यांना गरीबीतून वर नेईल. आता घरची गरिबी संपणार. आमच्या पोरांना पण तो शिकवेल… पोरं सुद्धा शिकून मोठी होणार.”

    तो बोलत होता आणि पेढे वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावर भविष्य उभं राहिलं होतं.

    0000

    दादाच्या नोकरीची बातमी येण्याच्या काही दिवस आधी मात्र घरात दुसरंच गणित सुरू होतं. एके दिवशी नाना घराच्या मागच्या माळावर चार एकर जमिनीच्या फटात गेले. पावसाच्या पाण्याने बांधाच्या कडेला थोडी हिरवळ आली होती. हाच तो फट ज्यामध्ये नानांच्या अगोदरही कित्येक पिढ्या खपल्या. हाच तो फट ज्यामध्ये आयुष्यभर नाना राबले. त्यांनी तांबड्या मातीचा एक ढेकूळ हातात घेतला. बराच वेळ ते ढेकूळ चिलबिलत राहिले.

    “ही जमीन विकली तर?”

    पका गप्प झाला. तो दूरच्या उसाच्या हिरव्यागार फडाकडे एकटक पहात राहिला.

    “कॉलेजच्या चेअरमननी पन्नास लाख मागितलेत. जुळणी झाली तर दादाची नोकरी पक्की होईल.”

    पकाने नानाकडे पाहिलं. नाना दुचित झाले होते.

    “मग विकू या.”

    नानांनी मान वर केली. पकाकडे आश्चर्याने पाहिलं.

    “विचार कर.”

    “कसला विचार? दादा नोकरीला लागला की आपलं सगळं घर उभं राहील. आत्ताची गरीबी तर कुठल्या कुठं दूर पळून जाईल.”

    नाना काही बोलले नाहीत. त्यांनी पकाच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांच्या हाताचा कंप पकाला जाणवला. थोडा वेळ असाच गेला. मग दोघेही निशब्दपणेच खाली मान घालून घराच्या वाटेला लागले.

    दुसऱ्या दिवशी बबन सावकाराच्या मागोमाग नाना आणि पका चालत राहिले. दुपारची वेळ होती. नोंदणी कार्यालयात चार एकरांचा सौदा झाला. कागदावर सही करताना नानांचा हात थरथरत होता. पकाने त्यांच्या हातावर हात ठेवला.

    “सही करा नाना. आपण काय दारूच्या बाटलीसाठी जमीन विकत न्हाई. दादा नोकरीला लागल्यावर ह्याच्या दुप्पट जमीन घेऊन देईल. मनाला वाईट वाटून घेऊ नका..”

    जीव लावलेली धरणी मायची चार एकर जमीन एका कागदावरून दुसऱ्याच्या नावावर गेली. दादाची नोकरी मात्र पक्की होऊन घरात आली.

    0000

    दादा आता शांतपणे नोकरी करू लागला. रविवारी सुट्टीला फॅमिली ट्रिपला जाऊ लागला. दोन दिवस सलग सुट्टी लागली तर यात्रेला जाऊ लागला. दर सुट्टीला घरात मटण आणू लागला. येणारा दर महिन्याचा पगार बायकोच्या हिशेबात ठेवू लागला. शहरात तो व्यवस्थित ऐसपैस स्थिरावला.

    एक दिवस नाना म्हणाले,

    “पका…”

    “हं.”

    “तू आयुष्यभर शेतीच करणार ना?”

    “हो.”

    “तुझ्या तीन पोरांपैकी एखाद्याला दादाबरोबर शहरात पाठव. शिकू दे त्याला. दादासारखा नोकरीला तरी लागेल.”

    पकाने हसून मान हलवली.

    “हो नाना.”

    त्याने मनातल्या मनात तिन्ही मुलांचे चेहरे पाहिले.

    त्याला वाटलं, दादा आता पैशाने मोठा झाला आहे. दादाने आपल्याला ह्या गरीबीतनं वर काढावं. आपली पोरं त्याच्या पोरांसारखी व्हावीत.

    0000

    संक्रांतीच्या सणाला शहरातून आलेल्या दादाच्या बायकोच्या, सुनेच्या हातात आई चहा देत होती. आईच्या अंगावरच्या जुन्या लुगड्याला दोन ठिकाणी ठिगळं होती. नाक मुरडत सून म्हणाली,

    “आई, तुम्ही हे अजून वापरता?”

    आई हसली.

    “अगं, चांगलं नेसून नटून तरी कुठं जायाचं हाय. शेतात तर काम करायचं हाय.”

    नाना बाहेरून आले. त्यांच्या पायात दोऱ्याने सांधलेली चप्पल होती. अंगावर इरलेली मळकी बंडी होती. हातावर वैरणीचे ओरखडे उठले होते. विजार तर नेमकी गुढग्यावर दोन ठिकाणी फाटली होती.

    दादा त्याचवेळी आयफोनवर कोणाशी तरी बोलत होता. त्याच्या हातात सोन्याचे कडे होते. बोटात डाळिंबी खड्यांच्या अंगठ्या होत्या.

    “हो… हो… मुलांच्या स्कूलची फी भरली आहे. पण यावेळी थोडी जास्त दिली आहे. जर्मन स्पीकिंगचा कोर्सही त्यांना लावायचा आहे.”

    नाना दारातच थांबले. त्यांनी काहीतरी सांगायचा प्रयत्न केला.

    “काय नाना?”

    “काही नाही.”

    “मग?”

    “तू फोनवर तुझं बोलणं चालू ठेव.”

    नाना मागे वळले. आईने त्यांच्याकडे पाहिलं. दोघांच्या नजरा क्षणभर भेटल्या. आईने पुन्हा लुगड्याच्या ठिगळावर हात फिरवला.

    0000

    दादा वर्षातून एखाद्या वेळी गावाला यायचा. पका मात्र वर्षातून दोन-तीन वेळा शहरात जायचा. टेम्पोच्या मागच्या हौद्यात बाजरी, गहू, तूर, हरभऱ्याची पोती.

    “दादा, पोती कुठं ठेवू?”

    “अरे, इतकं कशाला आणतोस?”

    “आपल्या शेतात आलंय. तुला सोडून आम्ही कसं खाणार?”

    “पण एवढं?”

    “वर्षभर तुझ्या घराला लागेल.”

    पका एकेक पोतं खांद्यावर घेऊन घरात नेत राहायचा. दादाची बायको दारातून पाहत राहायची.

    “एवढं धान्य ठेवायचं कुठं?”

    दादा म्हणायचा,

    “ठेव ना. पकाने आणलंय. गावाकडच्या शेतातलं आहे”

    दोन दिवसांनी शेजारच्या किराणा दुकानातून आवाज यायचा.

    “वहिनी, गावाकडून गहू आला आहे का? पोतभर द्या.”

    “हो, थांबा.”

    घरात आणलेलं धान्य पुन्हा मापात जाऊ लागायचं.

    पकाच्या खांद्यावर पोत्याच्या ओझ्याने उमटलेल्या लाल खुणा मात्र कुणाच्या लक्षात येत नसायच्या.

    0000

    एका वर्षी पाऊसच झाला नाही. दुसऱ्या वर्षीही नाही. पिकं वाळून गेली. जनावरं देशोधडीला लागली. कोरडा दुष्काळ पडला. चिमण्या, पाखरंही मरू लागली. पकाने एक दिवस दादाला फोन केला.

    “दादा…”

    “बोल.”

    “गेल्या दोन वर्षांत काहीच पिकलं नाही.”

    तिकडून शांतता. एक नाही का दोन नाही. आवाजच नाही.

    “दिवाळीला तिन्ही बहिणी येणार आहेत. साड्या चोळ्या घ्याव्या लागतील. पोरास्नी कापडं घ्यावी लागतील. आई नानाला लुगडं धोतर घ्यावं लागेल. सणासुदीला पोरं कापडांसाठी हट्ट करतील.”

    पुन्हा शांतता.

    “मला दहाएक हजार रुपये दे.”

    “आत्ता?”

    “हो. कापूस गेला की परत देतो तुला.”

    दादाने मोठा श्वास घेतला. थोडा वेळ थांबला.

    “माझाही पगार तीन महिन्यांपासून झालेला नाही रे.”

    “हं…”

    पकाचा आवाज खाली गेला. त्याने गळक्या छताकडे पाहीले.‌

    “ठीक आहे.”

    फोन कट झाला.

    त्या रात्री पकाच्या घरात दिवा उशिरापर्यंत जळत होता. त्याने जुन्या लोखंडी पेटीतून कापसाच्या बियाण्याची पावती काढली. पुन्हा ठेवली. बायकोकडे पाहिलं.

    “पोरांना सांग, यंदा दिवाळीत नवीन कपडे नाहीत.”

    गौरी काही बोलली नाही.

    0000

    सुट्टीत दादा गावाला आला. चार चाकी गाडी अंगणात थांबली. दादाची बायको गाडीतून उतरली. तिच्या अंगावर झगझगीत महागडी साडी होती. गळ्यात सोन्याची जाड साखळी चमकत होती. हातात सोन्याच्या बांगड्या लकाकत होत्या. कानात हिऱ्याच्या खड्यांचे झुमके डुलत होते.

    पकाची बायको गौरी दारात उभी होती. तिच्या पायातली चप्पल एका बाजूने तुटलेली होती. पकाची पॅंट बोंदरी होऊन बऱ्याच ठिकाणी फाटली होती.

    दादाने दोघांकडे पाहिलं.

    “काय रे पका, शेती कशी चाललीय?”

    “चाललीय जेमतेमच.”

    “मुलं काय करतात?”

    “घरीच आहेत.”

    “शाळेत जात नाहीत?”

    पकाने क्षणभर खाली पाहिलं.

    “दोघांनी सोडली मधूनच.”

    “का?”

    “जमत नाही.”

    पुढे दादा काही बोलला नाही. खाली मान घालून तो घरात गुपचूप निघून गेला.

    0000

    बोटातल्या अंगठ्या फिरवत दादाची बायको म्हणाली,

    “इथं राहून पोरांना काय करणार? कुठंतरी शहरात पाठवायला हवं.”

    पकाची बायको कसनुसं हसली.

    “हो.”

    ती खाली पहात होती. तिच्या पायातली तुटकी चप्पल निर्जीव होऊन जमिनीवर पडली होती.

    0000

    दादाने शहरात घर घ्यायचं ठरवलं. पैसे कमी पडले.

    दादाचा पकाला फोन आला.

    “पका, एक घर घेतोय. पण पैसे कमी पडायला लागलेत रे.”

    “किती कमी पडतायत?”

    “बरं राहू दे. जमवतो काहीतरी करून.”

    दुसऱ्या दिवशी पकाने दोन बैल विकले. एक म्हैस विकली. घरातल्या दोन शेळ्याही दिल्या. बायकोने विचारलं,

    “सगळं विकायचं?”

    “दादाचं घर होतंय.”

    “पण आपलं?”

    पका हसला.

    “आपलं काय? कधीतरी पुढं मागं हूणारच की.”

    0000

    काही दिवसांनी पकाने दादाच्या खात्यात पैसे जमा केले. दादा फोनवर म्हणाला,

    “पका, फार मोठी मदत झाली रे.”

    “असू दे.”

    “कधी परत करू?”

    “काही नको. तुझं घर काय अन् माझं काय? एकच की.”

    “तरीही…”

    “दादा, तू घर घे. परक्या ठिकाणी स्वतःचं घर पाहिजेच.”

    फोन ठेवताना पकाने रिकाम्या गोठ्याकडे पाहिलं.

    बैलांच्या जागी रिकामा दोरखंड हलत होता. जनावरांची दावी निर्जीव होऊन पडली होती. दावण रिकामी झाली होती. सगळा गोठाच ओसाड भुंडा होऊन निपचित पडला होता.

    0000

    बराच काळ गेला. दादाच्या मुलीचं लग्न जवळ आलं. शहरात मोठा मंडप टाकला. दिवे. बँड. गावदेव. जेवणाच्या पंगती. वेगवेगळे मेनू. सोनं सोडून पंधरा लाख रुपये खर्च झाले. दादा मित्रांना सांगत होता,

    “एकुलती एक मुलगी आहे. पन्नास तोळे सोने घेतलंय. मुलीच्या लग्नात काही कमी करणार नाही.”

    हळद काढायला मुलीला गावाकडे बोलवलं. पका आणि पकाची बायको दिवसभर तिच्या स्वागताची तयारी करत होते. निशाला आवडतात म्हणून सोरोचीतून मासे आणले होते. जावयाला आवडतं म्हणून घिरडीतून मटण आणलं होतं. हरभऱ्याची दोन पोती विकावी लागली पण त्याचं वाईट नाही वाटलं.

    निशाने गावातल्या घरात पाऊल ठेवलं. तिची नजर समोर गेली. मातीच्या घराच्या भिंतीला पावसाने भेगा पडल्या होत्या. आतल्या कोपऱ्यात फाटकी गादी भिजली होती. कौलातून पाणी ठिबकत होतं. बाहेरच्या सोप्यावरचा पत्रा गंजून गेला होता. पकाची बायको गंजकी बादली सरकवत होती. कुठं कुठं चेपकी घमेली ठेवत होती.

    “इकडे ठेव…अजून टपकतंय.”

    पकाने वर छताकडे पाहिलं. “उद्या शेकरुन घेतो.”

    0000

    दादा गावात आला की मित्रांच्या गप्पा रंगायच्या.

    “माझ्या मुलांच्या शिक्षणावर वर्षाला साडेतीन लाख खर्च होतो…”

    दादा आकडा सांगायचा. मित्र कौतुकाने मान हलवायचे. कोणीतरी विचारायचं,

    “पकाची पोरं काय करतात?”

    दादा खांदे उडवायचा. आभाळाकडे बघत बोलायचा.

    “त्यांना शेतीतच रस आहे.”

    गावाच्या दुसऱ्या टोकाला त्याच वेळी पकाचा मोठा मुलगा शाळेची जुनी वही बंद करत होता. शेवटच्या पानावर त्याने पेन्सिलने लिहिलं होतं. “मलाही सर व्हायचं आहे.”

    गौरीने ते पाहिलं. ती बराच वेळ वहीकडे पाहत राहिली. अक्षरावरून हळूवारपणे बोटं फिरवली. नंतर वही बंद करून तिने कपाटात ठेवली.

    0000

    वर्षं गेली. नाना गेले. आईही गेली. पकाच्या केसांत पांढरं उतरलं. खांदे झुकले. दाढी खुरटी पांढरट झाली. दादा पण नोकरीतून निवृत्त झाला.

    एक दिवस दोघेही गावच्या तलाठी कार्यालयात बसले होते. समोर जमिनीचा नकाशा होता.

    “अर्धी-अर्धी वाटणी,” दादा म्हणाला.

    पकाने कागदाकडे पाहिलं.

    “हं.”

    “माझा हिस्सा एवढा.”

    “हं.”

    “तुझा हिस्सा एवढा.”

    पकाने पुन्हा नकाशाकडे पाहिलं. दादाने चष्मा नीट केला. पकाकडे पहात म्हणाला,

    “आणि गेल्या पस्तीस वर्षांत तू जमिनीत काय काय पिकवलंस, त्याचा हिशोब पण करुन ठेव. मोठा मोठा केलास तरी चालेल?”

    ऊनवाऱ्यात रात्रंदिवस राबून बाभळीच्या लाकडासारखा झालेला चेहरा पकाने वर केला.

    “हिशोब?”

    “हो. जमीन माझ्या वाट्याचीही होती.”

    पका काही बोलला नाही. त्याने आपल्या हातांकडे पाहिलं. नखांच्या फटीत अजूनही काळी माती होती. रापलेल्या हाताची कातडी निबार दिसत होती.

    0000

    हेही वाचा – सत्याचा विजय होतोच, पण…

    काही दिवसांनी दादाने एक जुनी वही बाहेर काढली. नीट सांभाळून ठेवलेली.

    “हे बघ.”

    पकाने वही उघडली. पहिल्या पानावर तारीख. रक्कम. पुढच्या पानावर पुन्हा तारीख. पुन्हा रक्कम.

    “तुला आठवतंय का? तुझ्या मुलाच्या फीला पाच हजार दिले होते.”

    पका शांत बसला होता.

    “आणि हे बघ… तुझ्या घरासाठी सात हजार.”

    पानं उलटत राहिली.

    “हे पैसे परत करायचे आहेत.”

    पकाने वही बंद केली. दादाकडे परत केली.

    “ठीक आहे.”

    वही काळजीपूर्वक हातात घेऊन दादा उठला.

    “होईल तेवढं लवकर दे.”

    पकाने फक्त मान हलवली. त्याने वहीकडे शेवटचं एकदा पाहिलं. त्या वहीत चार एकरांची नोंद कुठंच नव्हती.

    0000

    संध्याकाळी पका एकटाच शेताच्या बांधावर बसला होता. सूर्य मावळत होता. दूरवर नानांनी कधीकाळी नांगरलेली जमीन दिसत होती. चार एकर जमीन. ज्यावर आता दुसऱ्याचा मालकी हक्क होता. त्याने मातीची मूठ उचलली. मूठ बंद केली. थोड्या वेळाने ती पुन्हा उघडली. मुठीच्या बोटांमधून माती खाली सरकत गेली. त्याला काहीतरी आठवलं. पेढ्यांचा डबा… नानांची थरथरणारी सही… दादाची पहिली नोकरी.. शहरातलं पहिलं घर… बैल विकल्याची रात्र… पावसात गळणारं मातीचं छप्पर…आणि त्या सगळ्याच्या मध्ये, दादा.

    तो हळूच उठला. पाय ओढत घराकडे चालू लागला. दाराशी त्याचा नातू उभा होता.

    “आजोबा, शहरातले दादा पैसे मागायला आले होते ना?”

    पकाने त्याच्याकडे पाहिलं. त्याला जवळ घेतले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.

    “हो.”

    “तुम्ही दिले?”

    पका हसला. त्याच्या गालावर थोपटले.

    “देऊ नंतर.”

    “कशातून?”

    पकाने उत्तर दिलं नाही. त्याने घराच्या कोपऱ्यात माचुळीवर ठेवलेली जुनी धान्याची पोती पाहिली. एक पोतं उघडं होतं. त्यातून काही दाणे खाली पडले होते. पकाने वाकून ते दाणे हातात घेतले आणि मुठीत घट्ट धरून ठेवले. त्याची नजर समोर गेली. घरापुढचं रान ओसाड होऊन पडलं होतं.

    0000

    दुसऱ्या दिवशी दादा पुन्हा गावाकडे आला. अंगणात गाडी उभी केली. चूळ भरता भरता म्हणाला,

    “पका, पैशाचं काय झालं?”

    पकाने घराच्या आत जाऊन एक जुनं मोडकं लोखंडी कपाट उघडलं. त्यातून एक जुनी फाईल काढली. तो बाहेर आला. दादाच्या हातात ती फाईल दिली.

    “हे काय?”

    “बघ.”

    दादाने फाईल उघडली. पहिल्या पानावर दादाच्या नोकरीसाठी पैसे भरलेली शिक्षणसंस्थेची पावती होती. दुसऱ्या पानावर चार एकर जमिनीचा विक्रीखताचा दस्त होता. तिसऱ्या पानावर दादाच्या नोकरीच्या वर्षाची तारीख होती. दादा थबकला. त्याने पुढचं पान उघडलं. काहीच नव्हतं.

    पका समोरच्या खाटीवर शांत बसला होता. तो उठला. खिडकीजवळ गेला. खिडकीबाहेर पाहिलं. आभाळ भरून आलं होतं.

    “नानांनी तेव्हा सांगितलं होतं…”

    तो थोडा वेळ थांबला.

    “काहीही करून दादा शिकला पाहिजे.”

    खोलीत बराच वेळ कुणीच काही बोललं नाही. बाहेर आभाळ जास्तच कोंदटलं होतं.

    पका परत फिरला. आत जाताना म्हणाला,

    “चहा ठेवतो.”

    तो आत गेला. दादा फाईल हातात धरून बसून राहिला. पहिल्यांदाच त्याला त्या कागदावरची चार एकर जमीन दिसत नव्हती.

    त्याला दिसत होता, नानांचा थरथरता हात. पकाचा पेढ्यांचा डबा. धान्याचं पोतं खांद्यावर घेतलेला पका. फाटकी इजार. तुटकी चप्पल. रिकामा गोठा आणि मातीच्या घरात गळणाऱ्या छपराखाली झोपलेली पकाची पोरं.

    हेही वाचा – दिवाळीचा खरा अर्थ

    फाईलच्या शेवटच्या पानावर पकाची सही होती.

    दादाने ती सही बराच वेळ पाहिली. कागदावरची अक्षरं धूसर झाली होती की डोळ्यांत पाणी आलं होतं, त्याला कळेना. त्याने पुन्हा एकदा पहिलं पान उघडलं. चार एकर जमीन. त्याखाली नानांची सही. त्याच तारखेच्या खाली दादाच्या नोकरीसाठी पैसे भरलेली संस्थेची पावती. दादाने बोट त्या सहीवर ठेवलं. बराच वेळ ते तिथेच राहिलं. दादाच्या हातातली फाईल हळूहळू खाली आली. पहिल्यांदाच त्याला जाणवलं, आपल्या नोकरीसाठी चार एकर जमीन विकली गेली होती; पण त्या चार एकरांसोबत कुणीतरी आपलं आयुष्यही विकलं होतं.

    चुलीवर चहाचं पाणी उकळत होतं. पकाने आतून हाक मारली.

    “दादा… साखर किती?”

    दादाच्या डोळ्यांत पाणी आलं. तो काहीच बोलला नाही. चुलीवरचं पाणी मात्र उकळत राहिलं.

    दादा अजूनही कागदांकडेच पाहत होता. चहाचा कप त्याच्यासमोर ठेवताना पका म्हणाला,

    “पैशांचं काही तरी बघतोय मी. दोन-चार दिवसांत जोडणा करून देतो. काळजी करू नकोस.”

    दादाने चहाच्या कपाकडे पाहिलं. बराच वेळ तो नुसता बसून राहिला.

    तिसऱ्या दिवशी पुन्हा गाडी दारात उभी राहिली. दादाने गाडीतून उतरतानाच खिशातून ती जुनी वही काढली. पकाच्या हातात ठेवली.

    “ही ठेव.”

    “कशाला?”

    “तुझी आहे.”

    पकाने वही उघडली. तारीख. रक्कम. तारीख. रक्कम. सगळ्या नोंदी लाल शाईने काट मारून मिटवल्या होत्या.

    पकाने वर पाहिलं. दादा खिडकीबाहेर पाहत होता.

    “दादा…”

    “हं?”

    “हे कशाला केलंस?”

    दादा काही बोलला नाही. खिडकीतून बाहेर त्याला मातीचं जुनं घर दिसत होतं. भिंतीवर अजूनही नानांनी टेकवलेला जुना कुळव होता. पलीकडे रिकामा पडलेला जनावरांचा गोठा दिसत होता. घराच्या मागच्या त्या चार एकर रानात दुसऱ्यानं पेरलेला हिरवागार शाळू दिसत होता.

    0000

    पकाने वही अलगद बंद केली. तो आत गेला. नेहमीप्रमाणे चहाचा कप घेऊन आला.‌

    “चहा घे.”

    दादाने कप हातात घेतला. कपाच्या कडेवर त्याची बोटं थरथरत होती.

    “तिचं ऐकून मी नुकता बहिरा नाही तर आंधळा पण झालो होतो पका. आता मात्र मी ठरवूनच…”

    त्या मोडकळीस आलेल्या घरात पुन्हा शांतता पसरली.‌

    दुसऱ्या दिवशी सकाळी पका शेतावर गेला.

    बांधावर एक कागद ठेवलेला होता. त्याने तो उचलला. जमिनीच्या वाटणीचा कागद होता तो. पकाने तो वाचला. त्याच्या वाट्याला सगळीच जमीन टाकली होती. असावं म्हणून फक्त वडिलार्जित जुनं घर तेवढं दादाने घेतलं होतं. पकाच्या वाट्याला आलेल्या जमिनीच्या खाली अजून एक ओळ होती, “दादाच्या नोकरीसाठी विकलेल्या चार एकरांच्या बदल्यात…”

    पुढे काही लिहिलं नव्हतं.

    पका बराच वेळ कागदावरच्या त्या रिकाम्या जागेकडे पाहत राहिला. मग त्याने कागद दुमडला. सदऱ्याच्या खिशात ठेवला. तो नांगराच्या दिशेने चालू लागला.

    पाठीमागून दादाचा आवाज आला.

    “पका!”

    तो वळला. दादा बांधावर उभा होता. त्याच्या हातात चपला होत्या. पाय मातीने माखलेले होते.

    “काय?”

    दादा काही क्षण काहीच बोलला नाही. मग हळूच म्हणाला, “आज… मला नांगरायला शिकवशील?”

    पकाने दादाकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर ना हसू होतं, ना राग. त्याने फक्त नांगराचा एक दांडा पुढे केला. दादाने तो धरला. दोघे बांधावरून खाली उतरले. माती ओली होती. नांगराचा पहिला फाळ जमिनीत शिरला आणि त्या दोन भावांच्यात, वर्षानुवर्षे न बोललेली एक गोष्ट मातीखाली अलगद पुरली गेली…!!!!

    ॲड. कृष्णा पाटील

    मोबाइल – 9372241368

    Related Posts

     स्मार्ट गूगल की आई?

    November 26, 2026 ललित

    साडी अन् तीन पिढ्या…

    November 25, 2026 ललित

    भूतकाळाच्या आठवणी

    November 25, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

     स्मार्ट गूगल की आई?

    By तृप्ती देवNovember 26, 2026

    “अमु, मी बाजारात जाऊन येते. तुझा आणि निलूचा नास्ता बनवून टेबलावर ठेवला आहॆ. तुमचं काम…

    साडी अन् तीन पिढ्या…

    November 25, 2026

    भूतकाळाच्या आठवणी

    November 25, 2026

    री-लॉगइन

    November 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    उशिरा उजाडलेली पहाट

    November 26, 2026

    सरप्राइज!

    November 26, 2026

     स्मार्ट गूगल की आई?

    November 26, 2026

    कर्तव्य आणि ओझे : एक आध्यात्मिक चिंतन

    November 26, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : जैसा अग्नीचा डोंगरु, नेघे कोणी बीजअंकुरु

    November 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 नोव्हेंबर 2026

    November 26, 2026

    POPULAR CATEGORY

    [category_count_style]
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    उशिरा उजाडलेली पहाट

    November 26, 2026

    सरप्राइज!

    November 26, 2026

     स्मार्ट गूगल की आई?

    November 26, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.