साहित्य
- मैदा – दोन वाट्या
- बटाटे – दोन
- मटार दाणे – पाऊण वाटी
- चिरलेली कोवळी फरसबी – पाऊण वाटी
- कांदा – पाऊण वाटी (चिरलेला)
- ओले खोबरे – पाऊण वाटी
- ओल्या मिरच्या – पंधरा-वीस
- आले – दोन इंच तुकडा
- लसणाच्या पाकळ्या – दहा-बारा
- जिरे – दोन चमचे
- धणे – तीन चमचे
- चिरलेली कोथिंबीर – पाऊण वाटी
- मीठ – चवीनुसार
- साखर – चवीनुसार
- अनारदाणे अगर लिंबू
- तेल – तळणासाठी
हेही वाचा – Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)
कृती
- मैद्यात थोडेसे मीठ, पाव वाटी तेल आणि पाणी घालावे आणि मैदा पोळ्यांच्या कणकेइतपत भिजवा.
- फरसबी आणि मटार तेलावर परतून घ्यावेत.
- धणे आणि जिरे भाजून, कुटून घ्यावेत. तर, कोथिंबीर, मिरच्या, आले आणि लसूण वाटून घ्यावे. बटाटे उकडून कुस्करावेत.
- नंतर फरसबी, मटार, धण्या-जिऱ्याची पूड, मिरच्या, लसूण आणि आले यांचा वाटलेला गोळा आणि कुस्करलेले बटाटे हे सर्व एकत्र करून, त्यात चवीपुरती साखर (ऐच्छिक) आणि आंबटपणाकरिता वाटलेले अनारदाणे घालून अगर लिंबू पिळून सारण तयार करावे.
- भिजवलेल्या मैद्याच्या लिंबाएवढ्या दोन गोळ्या घेऊन त्या पुरीसारख्या लाटाव्या. एका पुरीला तेल लावून त्यावर थोडी पिठी लावावी आणि त्या पुरीवर दुसरी पुरी ठेवावी आणि ही जोड-पुरी पोळीप्रमाणे मोठी लाटावी.
- नंतर ती पोळी भाजावी. पोळी कडक भाजू नये. पोळी फुगल्याबरोबर काढून ती ओल्या फडक्याखाली झाकून ठेवावी.
- नंतर सुरीने त्या पोळीच्या उभ्या तीन पट्ट्या पाडाव्या. त्या पट्ट्या सोडवून घेतल्यावर सहा पट्ट्या होतील.
- त्यापैकी एक पट्टी घेऊन, तिची खणासारखी घडी घालून, त्यात तयार केलेले सारण भरावे आणि घडी घालावी.
- शेवटची घडी घातल्यावर जे टोक राहील, ते भिजवलेला मैदा अगर कणीक लावून चिकटवावे.
- नंतर ते सामोसे तेलात बदामी रंगावर तळून काढावेत.
- खावयास देताना बरोबर खोबऱ्याची चटणी अगर टोमॅटो केचप द्यावे.
हेही वाचा – Recipe : तंदुरी पनीर कबाब अन् कुरकुरीत भेंडी
टीप
- सामोशाच्या सारणामध्ये फ्लॉवरही घालतात.
- फरसबी, बटाटा, कांदा आणि मटार या सर्वच भाज्या घातल्या पाहिजेत, असे नाही. त्यापैकी एकच अगर जेवढ्या पाहिजेत, तेवढ्या अगर सर्वच भाज्या घालण्यास हरकत नाही.


