अध्याय पंधरावा
तेथ म्हणिजे कवणें ठाईं । ऐसेंही पुससी कांहीं । तरी तें पद गा नाहीं । वेंचु जया ॥306॥ दृश्यपणें देखिजे । कां ज्ञेयत्वें जाणिजे । अमुकें ऐसें म्हणिजे । तें जें नव्हे ॥307॥
न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः । यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥6॥
पैं दीपाचिया बंबाळीं । कां चंद्र हन जें उजळी । हें काय बोलों अंशुमाळी । प्रकाशी जें ॥308॥ तें आघवेंचि दिसणें । जयाचें कां न देखणें । विश्व भासतसे जेणें । लपालेनी ॥309॥ जैसें शिंपीपण हारपे । तंव तंव खरें होय रुपें । कां दोरी लपतां सापें । फार होइजे ॥310॥ तैसीं चंद्रसूर्यादि थोरें । इयें तेजें जियें फारें । तियें जयाचेनि आंधारें । प्रकाशती ॥311॥ ते वस्तु कीं तेजोराशी । सर्वभूतात्मक सरिसी ।चंद्रसूर्याच्या मानसीं । प्रकाशे जे ॥312॥ म्हणौनि चंद्रसूर्य कडवसां । पडती वस्तूच्या प्रकाशा । यालागीं तेज जें तेजसा । तें वस्तूचें आंग ॥313॥ आणि जयाचां प्रकाशीं । जग हारपे चंद्रार्केंसीं । सचंद्र नक्षत्रें जैसीं । दिनोदयीं ॥314॥ नातरी प्रबोधलिये वेळे । ते स्वप्नींची डिंडी मावळे । कां नुरेचि सांजवेळे । मृगतृष्णिका ॥315॥ तैसा जिये वस्तूच्या ठायीं । कोण्हीच कां आभासु नाहीं । तें माझें निजधाम पाहीं । पाटाचें गा ॥316॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : आगी लगलिया रुखीं, देखोनि सैरा पळती पक्षी
अर्थ
परंतु तेथे म्हणजे कोणत्या ठिकाणी, असे देखील काही तू विचारशील, तर ज्या ठिकाणाला नाश नाही ते, ते ठिकाण होय. ॥306॥ जे पाहाण्याचा विषय म्हणून पाहिले जाते व जे जाणण्याचा पदार्थ म्हणून समजले जाते किंवा जे काही एक विशेष प्रकारचे आहे, असा ज्याविषयी व्यवहार होतो, असे जे जे आहे, त्यापैकी जे नाही, (तेथे ते मिळतात). ॥307॥
ते (पद) सूर्य प्रकाशित करीत नाही, चंद्र नाही, अग्नि नाही, ज्या ठिकाणी गेल्यावर (गेलेले लोक) परत मागे पाऊलच घेत नाहीत, ते माझे अत्यंत श्रेष्ठ निजधाम होय. ॥6॥
परंतु दिव्याच्या दिपवून टाकणार्या प्रकशाने जे प्रकाशले जाते अथवा चंद्र ज्याला प्रकाशित करतो ह्यांचीच गोष्ट काय सांगावी! (परंतु) सूर्यही ज्याचे प्रकाशन करतो ॥308॥ वरील तीन प्रकारच्या प्रकाशाने जगातील सर्व वस्तूंचे दिसणे, म्हणजे ज्याला (आत्मस्वरुपाला पाहण्य़ात इतर वस्तूंचा निरास होतो). जे आत्मस्वरूप लपले असता विश्व भासते. ॥309॥ ज्याप्रमाणे शिंपीचे शिंप म्हणून यथार्थ ज्ञान जसजसे नाहीसे होते, तसतसे त्या शिंपीवर मिथ्या भासणारे रूप खरे आहे असे भासावयास लागते. अथवा दोरीच्या यथार्थ स्वरूपाच्या अज्ञानात सापाचा भास जसा जास्त दृढ होत जातो. ॥310॥ त्याप्रमाणे चंद्र,सूर्य इत्यादिक जी ही मोठमोठाली तेजे आहेत, ती ज्या आत्मवस्तूच्या अज्ञानात प्रकाश करतात ॥311॥ ती आत्मवस्तु केवळ तेजाची रास आहे. आणि ती आत्मवस्तु सर्व प्राण्यांमध्ये आत्मत्वे करून सारखी व्याप्त आहे व जी चंद्रसूर्याच्या मनात प्रकाशते. ॥312॥ चंद्रसूर्य हे वस्तूंच्या प्रकाशाने पडणारे कवडसे आहेत. म्हणून तेजस्वी वस्तूंमध्ये जे तेज आहे, ते वस्तूंचे अंग आहे. ॥313॥ आणि ज्याप्रमाणे सूर्योदयी चंद्रासह नक्षत्रे लोपतात, त्याप्रमाणे ज्या आत्मवस्तूच्या प्रकाशात चंद्रसूर्यांसह सर्व जग लोपून जाते. ॥314॥ अथवा जागे झाल्यावर जसा स्वप्नातील पसारा नाहीसा होतो अथवा संध्याकाळी जसे मृगजळ रहात नाही ॥315॥ त्याप्रमाणे ज्या आत्मवस्तूच्या ठिकाणी कोणताच भास नाही, अर्जुना, ते माझे श्रेष्ठ ठिकाण आहे, असे समज. ॥316॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जैसा अग्नीचा डोंगरु, नेघे कोणी बीजअंकुरु


