भाग – 52
निशा आणि अन्वीला शोधत आनंदी पाठच्या अंगणात गेली… जिथे आजी त्यांना आपल्या वाड्याच्या रीती परंपरांची माहिती देत होत्या.
“सॉरी… निशाताई, शर्वायची भेट होईल असं वाटत नाही, ऑफिसमध्ये जरा प्रॉब्लेम झाला आहे,” आनंदी निशाकडे पाहून म्हणाली.
“अरे बापरे …. हो का? मग आम्ही पण निघतो. अजून थांबण्यात काही अर्थ नाही,” निशाने उठतच उत्तर दिलं
त्याही जणू ही उत्तम संधी मिळाली असं जाणवून निघाल्या…
अन्वी आणि निशा शांतपणे सुमित्रा आजींच्या खोलीत त्यांच्या समोर बसल्या होत्या . आजींचं बोलणं हळूहळू एका आठवणीच्या लयीत चाललंय.
सुमित्रा आजीचे डोळे अंधूक चमकत होते… आपल्या वाड्याबद्दल त्या बोलत होत्या….
“या वाड्यात पाऊल टाकल्यावर प्रत्येक स्त्री फक्त सून राहत नाही… ती एक परंपरा बनते. माझ्या वेळेस, मी जेव्हा पहिल्यांदा इथे पायघड्यांवर पाऊल ठेवलं, तेव्हा वाटलं होतं – आपण एका घरात नव्हे, तर एका चालत्या फिरत्या इतिहासात पाऊल ठेवतोय.”
त्या थोडं हसल्या.
“तेव्हाही प्रथा होत्या — दिव्याची वेळ, अंगणात पहाटे पहिली रांगोळी, सण कोणते आणि कसे साजरे करायचे याचेही नियम आहेत.” घराच्या सुनेने काय करावं काय करू नये याचे ही नियम आहेत…. का तर सर्व समाज त्यांच्याकडे आदराने पहात असतो… त्यांचं अनुकरण करत असतो.
अन्वीने आतुरतेने विचारलं, “आणि आता? सगळं जसंच्या तसं चालू आहे का?”
सुमित्रा आजी गर्वाने, आनंदीकडे बघत म्हणाल्या..
“घरात मी आल्यावर या प्रथांना जीव दिला… पण माझ्या नंतर जर कुणी त्या अजून हिरीरीने जपल्या असतील, तर ती आहे आनंदी.”
“ती केवळ पाळत नाही — तिने त्या प्रथांमध्ये नवा रंग मिसळला, नवा उत्साह फुंकला….कधी कधी मला वाटतं – माझ्याहीपेक्षा ती त्या जास्त उमजून चालवते.”
सुमित्रा आजी क्षणभर थांबल्या….
“काही लोकं परंपरा पाळतात कारण त्यांना सवय असते. पण काहीजण त्या जपतात, कारण त्यांना त्या काहीतरी सांगत असतात… आनंदी अशाच जपणाऱ्यांतली आहे.”
त्या क्षणी – अन्वी गुपचूप आनंदीकडे पाहत होती – कदाचित तिच्या मनात अस्वस्थता, कदाचित स्पर्धा, किंवा एक प्रश्न होता – “हे असं आयुष्य घालवणं जमणार आहे का आपल्याला? पद्धतीसाठी कोण असं सगळं करत बसेल? आपल्या आईने तर असं काही केलं नाही, आणि मी असं जगावं असं हिला वाटत… ” अन्वी मनातच म्हणत होती.
सुमित्रा आजी थोडं हसत, आवाजातील ठामपणा व्यक्त करत म्हणाल्या…
“घरात मी आल्यावर जसं मी या प्रथांना जीव दिला, तसंच आनंदीने त्या पुढे नेल्या… आता या प्रथा पुढे नेणारी तिचीच सून असेल, यात काही वादच नाही!”
त्यांनी मुद्दाम अन्वीच्या डोळ्यांत पाहत विचारलं….”हो ना, अन्वी?”
अन्वी क्षणभर गडबडली. पण लगेच स्वतः ला सावरत ती तोंड थोडं वाकडं करत निशाकडे पाहत, आणि हलक्याच स्वरात म्हणाली… “नाही म्हणजे… प्रथा पाळायचं म्हणजे वेळ लागतो, संयम लागतो… आणि…” तिला खरं तर उत्तर द्यायला काही सुचतं नव्हतं आणि जपून ही बोलावं लागत होतं..
नशीब तितक्यात आनंदी तिथे आली आणि अन्वीने सुटकेचा निश्वास सोडला…. नाही तर आजींनी चांगलाच क्लास लावला होता…
सगळ्यांशी निरोपाच्या औपचारिक गप्पा चालू होत्या, पण त्या गप्पांच्या आवाजातही काहीतरी हरवल्यासारखं होतं.
सुमित्रा आजींना दोघींनी नमस्कार केला, त्यांच्या डोळ्यांत प्रेमही होतं, पण त्याच वेळी एक अनामिक ताण दाटून आलेला होता – जणू काहीतरी सांगायचं राहून गेलं होतं.
“नंतर कधी तरी वेळ मिळेल तेव्हा या पुन्हा…” आजींनी शांतपणे म्हटलं. पण त्यांच्या स्वरात आग्रह नव्हता…
अन्वीने स्मित केलं, पण ते स्मित ओठांपुरतंच होतं. तिच्या डोळ्यांतून एक प्रश्न ओघळत होता, तर तिचं मन गोंधळलेलं होतं, पण तिने चेहऱ्यावरची शालीनता तुटू दिली नव्हती.
निशा मात्र खूप शांत होती. जणू मनात बरंच काही स्पष्ट झालं होतं, पण आता बोलून काही फरक पडणार नाही, हे तिच्या देहबोलीतून स्पष्ट होतं.
ती वळून एकदा वाड्याकडे पाहिलं – त्या जुन्या भिंतींना, त्या आठवणींच्या गंधाला – आणि नकळत तिचं मन भूतकाळाच्या एखाद्या दारात अडकल्यासारखं थांबलं.
“शर्वाय भेटला असता तर बरं वाटलं असतं,” आनंदी म्हणाली, आवाजात खंत होती.
पण त्या वाक्याला अन्वीने उत्तर दिलं नाही. तिने फक्त हलकेचं डोकं हलवत ‘हो’ केल्यासारखं काहीसं केलं आणि ती निशाकडे वळली.
गाडी तयार होती. अन्वीने पर्स घेतली, आणि दोघी गाडीकडे वळल्या.
त्या वळण्यात, त्या चालण्यात एक निश्चितपणा होता – पण त्याच वेळी तुटलेलं काहीतरी मागे राहतंय याची जाणीवही होती… गाडीत बसताना अन्वीने एकदा मागे वळून पाहिलं –
वाड्याच्या त्या उंची पाठी दूर होतं जाणारं घर, आणि त्या घरासोबत पाठी पडत जाणारे काही नात्यांचे धागे…
हेही वाचा – आजींनी आराध्यावर सोपविली नवीन जबाबदारी
गाडी निघाली. धुळीचा एक हलकासा पडदा मागे राहिला. वाड्याच्या पायऱ्यांवर सुमित्रा आजी, आनंदी आणि आराध्या अजूनही उभ्या होत्या…. गाडी दूर गेली आणि आराध्याच्या फोनची मेसेज ट्यून वाजली….
शर्वायचा मेसेज आला होता – “Just got free. Where are you?”
शर्वायचा मेसेज आल्यानंतर आराध्या क्षणभर स्तब्ध झाली.
“Just got free. Where are you?” या साध्याशा प्रश्नामागे खूप काही होतं –
त्याचं कामात अडकून जाणं,..तिचं वाट पाहणं, आणि मधे निघून गेलेल्या वेळातली भेटींची सल…
ती हळूच हसली….. एकदम लहान मुलीसारखी लाजलीही –
फोन हातात घेत तिने स्क्रीनकडे पाहिलं.
त्याच्या नावाखाली दिसलेलं “online”, यामुळे तर तिला काहीतरी खास वाटून गेलं.
तिने टाईप करायला सुरुवात केली — “वाड्यावर सोडून गेला आहात, विसरला की काय?”
अगदी छोटा प्रश्न. पण त्यात एक गोड रुसवा, एक लपलेला तक्रारीचा स्वर, आणि एक नात्यात वाट पाहणारी भावना होती.
तिने मेसेज पाठवला.
क्षणभर हसतच फोन बाजूला ठेवला…पण काही सेकंदांनी परत उचलला — “Seen” झालं होतं.
ती पुन्हा लाजली… आणि खिडकीपाशी जाऊन उभी राहिली.
आता तिच्या चेहऱ्यावर लाजेत लपलेलं हास्य होतं, आणि मनात कुठेतरी पुन्हा एकदा त्याची पावलं वाड्याकडे वळतील अशी आशा होती…
आराध्याने मेसेज पाठवून काही क्षण झाले. फोन स्क्रीनवर “seen” केलेलं कळलं होतं, पण टायपिंग सुरू नव्हतं. क्षणभर तिला वाटलं – कदाचित उशीर झाला…
तेवढ्यात फोन वाजला…… शर्वायचा कॉल होता… तिने पटकन उचलला.
” हॅलो?”
पलीकडे क्षणभर शांतता होती. मग त्याचा हलकासा श्वास ऐकू आला.
” आरु…” शब्द हलकेच उच्चारलेले, पण सोज्वळ अन आर्त वाटलं ते नाव घेणं …. असं त्याने पहिल्यांदाच तिला संबोधलं होतं.
“माफ करशील ना?”
तिच्या चेहऱ्यावर नकळत एक हसू उमटलं.
“माफी मागितलीत? म्हणजे चूक झाल्याचं मान्य आहे तुम्हाला?”
” हो… आणि शिक्षा ही मान्य आहे. पण फक्त एक अट – ती तू द्यायची”
आराध्याचं मन एक क्षण थबकलं.
” कसली अट? शिक्षा ही दे म्हणताय आणि अट ही घालताय?? ”
“मी येतो आहे. वाड्याजवळ आलोय. पण भेटलीस, तरच पुढे बोलणार…”
ती क्षणभर गोंधळली….काहीही न बोलता फोन कट झाला… शर्वायला नक्की काय सुचवायचं होतं हे तिला कळलंच नव्हतं.
त्याच्या मते तिला राग येणं स्वाभाविक होतं … बायको असूनही त्याने तिला तो असं अचानक का? आणि कुठे? जातोय याबाबत काहीच सांगितलं नव्हतं.
घरातून निघतानाचा त्याचा आवेश संतापलेला असावा, असाच वाटत होता, कारण ज्या पद्धतीत त्याने लूक दिला होता ते पाहूनच आराध्या घाबरली होती आणि माधवची बोलती बंद झाली होती …. त्यामुळे पुढे काय? कुठे? विचारायची सोय नव्हती.
हेही वाचा – शह-काटशहचा खेळ सुरू…..
आराध्या थोडीशी चकित झाली. तिने खिडकीबाहेर पाहिलं…
वाड्याच्या मुख्य गेटजवळ एक गाडी थांबलेली दिसली. गाडीचा दरवाजा उघडला गेला आणि त्यातून शर्वाय उतरला — त्याच्या हातात एक छोटसं box होता, आणि चेहऱ्यावर शांत हसू.
आराध्या पायऱ्यांवरून धावत खाली आली. त्याने ते बॉक्स तिच्या हातात दिलं. “आपण वाड्याच्या मागच्या बागेत जाऊन बसू”
बॉक्समध्ये तिच्यासाठी त्याने मोत्याचा सर मागवला होता. जो तो तिला सकाळी देणार होता … पण सगळंच अचानक बदल्याने द्यायचं राहिलं.
ती क्षणभर काही बोलू शकली नाही. फक्त त्याच्याकडे पाहात राहिली.
शर्वाय पुढे आला, आणि हलकेच तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला —
“माफ करशील ना…?”
“खरं सांगू, मला राग आलाच नव्हता आणि वाईटही नव्हतं वाटलं… मग तुम्ही माफी मागायचा प्रश्नच येत नाही… ” आराध्याने डोळे मिटून हलकेच मान हलवली.
मग दोघंही वाड्याच्या मागच्या बागेकडे वळले… दोघांत आता पुन्हा एक नाजूक नवा बंध तयार होत होता.


