जर हे संपूर्ण जग मायेने बनलेले आहे, तर या मायेचा जन्म कधी झाला? तिचा आरंभ कुठे आणि कसा झाला?
अध्यात्म याचे उत्तर पोटतिडकीने देते. मायेचा आरंभ शोधू नये, शोधणारा काळात अडकतो, मात्र स्वतःचा आरंभ शोधणारा काळाच्या पलीकडे जातो. तो कालातीत होतो. कारण काळ, वेळ आणि अवकाश या संकल्पनाच मायेचा भाग आहेत. मायेच्याच मोजपट्टीने मायेचे मोजमाप करता येत नाही.
जेव्हा आपण स्वतःच्या खऱ्या किंवा मूळ स्वरूपाचा, आत्मस्वरूपाचा शोध घेतो तेव्हा तो काळ आणि स्थळ यांच्या सर्व मर्यादा ओलांडून त्या अनंत परब्रह्माशी एकरूप होतो. स्वतःला जाणणे म्हणजे काळाच्या पलीकडे असलेल्या शाश्वत ईश्वरी तत्त्वाचा अनुभव घेणे होय.
अनेकांना अशी भीती वाटते की, ही माया आपल्या खऱ्या स्वरूपाला, म्हणजेच परब्रह्माला डागाळेल किंवा नष्ट करेल. परंतु सत्य अगदी वेगळे आहे. माया कधीच ब्रह्माला स्पर्श करू शकत नाही. ती केवळ आपण हा देह आहोत या चुकीच्या कल्पनेलाच स्पर्श करते.
आकाशात काळे ढग येतात. विजा चमकतात. मुसळधार पाऊस पडतो. परंतु त्या पावसाच्या एका थेंबानेही आकाश कधी ओले होत नाही. किंवा डागाळत तर मुळीच नाही. आकाश त्या ढगांमधला थोडासा भाग देखील अंगाला चिकटून घेत नाही. आकाश सदैव अलिप्त आणि निर्विकार राहते.
परब्रह्मही अगदी आकाशासारखेच आहे.
माया केवळ देह आणि मनावर परिणाम करते. आपण स्वतःला हा नश्वर देह मानतो तेव्हाच मायेच्या जाळ्यात अडकतो. आपण स्वतःला त्या अथांग चैतन्यरूप आकाशाशी एकरूप मानतो तेव्हा मायेचे कोणतेही वादळ आपल्याला स्पर्श करू शकत नाही. शिवाय ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर मायेशी युद्ध करावे लागते किंवा तिला पराभूत करावे लागते, असा समजही चुकीचा आहे. निसर्गाकडे पाहिले तर प्रकाशाला अंधाराशी कधीच संघर्ष करावा लागत नाही. प्रकाश प्रकट झाला की अंधार आपोआप नाहीसा होतो.
ब्रह्मज्ञान आणि माया यांचे नातेही अगदी असेच आहे. अंधार ही स्वतंत्र बाब किंवा वस्तू नसते. अंधार म्हणजे केवळ प्रकाशाचा अभाव असतो. अंधाऱ्या खोलीत दिवा लावला की, अंधार खिडकीतून पळून जात नाही किंवा तो दिव्याशी युद्ध करत नाही. तो त्याच क्षणी संपून जातो. अंधार प्रकाशात विरघळतो असेही नाही. तो नाहीसा होतो. कारण त्या ठिकाणी प्रकाश जन्मलेला आहे. त्या ठिकाणी प्रकाश अवतरलेला आहे. ज्ञान आले की अज्ञान नाहीसे होते. अज्ञानाची जागा ज्ञान घेते असे नाही. तसेच अंतःकरणात आत्मज्ञानाचा दीप प्रज्वलित झाला की, अज्ञानाची आणि मायेची रात्र आपोआप संपते. तिथे संघर्ष राहत नाही. केवळ अखंड प्रकाश उरतो.
याचा अर्थ जगातून माया कायमची नष्ट होते का? तर तसाही अर्थ अजिबात नाही. मायेचा नाश होत नाही. नष्ट होतो तो तिच्याविषयीचा असलेला आपला गैरसमज.
हेही वाचा – गुरूमंत्र… शिष्याची श्रद्धा आणि गुरूंची व्याकुळता
ज्ञानी पुरुषालाही हे जग दिसते. निसर्ग दिसतो. माणसे दिसतात. व्यवहारही दिसतो. परंतु तो या दृश्य विश्वाला अंतिम सत्य मानत नाही. त्याला हे सर्व परमेश्वराची अद्भुत लीला वाटते. जसे नाटक पाहताना रंगमंचावरील प्रसंग वास्तव नाहीत हे माहीत असूनही आपण त्याचा आनंद घेतो, तसेच ज्ञानी पुरुष या मायेच्या खेळाकडे साक्षीभावाने पाहतो. तो त्यात सहभागी होतो, पण त्यात गुंतत नाही.
रात्री गाढ झोपेत पडलेले स्वप्न खूपच खरे वाटते. त्या स्वप्नात आपण हसतो, रडतो, घाबरतो, धावतो. पण जागे झाल्यावर ते स्वप्न कुठे गेले असा प्रश्न कोणी विचारत नाही. कारण जागृती, वास्तवाची जाण हेच त्याचे उत्तर असते. ब्रह्मज्ञानही अगदी असेच असते. ते मायेचे स्पष्टीकरण देत बसत नाही. ते मायेचे स्थानच पूर्णपणे बदलून टाकते.
यथा स्वप्ने जगद्भाति
प्रबोधे नैव दृश्यते।
तथा मायाकृतो भेदो
ब्रह्मबोधे न विद्यते॥
(गीताव्रत साधना)
जसे स्वप्नामध्ये हे संपूर्ण जग खरे आणि जिवंत असल्याचा भास होतो, पण जागे झाल्यावर त्या स्वप्नाचा किंचितही मागमूस राहत नाही, तसेच मायेने निर्माण केलेले सर्व भेद, अनेकत्व आणि वेगळेपण खऱ्या ब्रह्मबोधानंतर पूर्णपणे विरघळून जाते.
स्वप्नात आपण पाहिलेला गोष्टीतला राजा स्वतःला भिकारी समजून दुःख भोगत असेल, वेदनेने व्याकुळ होऊन रडत असेल. पण ते तो स्वप्नात असतानाच रडेल. तो जागे झाल्यावर तो त्या दुःखासाठी रडत बसणार नाही. कारण त्याला आपले खरे स्वरूप समजलेले असते.
आपली स्थितीही अशीच आहे. संसाराच्या स्वप्नात आपण स्वतःला मर्यादित, असहाय आणि दुःखी मानतो. परंतु आत्मज्ञानाची जागृती होताच हे स्पष्ट दिसते की, आपण कधीच अपूर्ण नव्हतो. आपण साक्षात त्या अखंड परमानंदस्वरूप चैतन्याच्याच रूपाचे प्रकटीकरण आहोत. हे समजले की, त्या एकाच क्षणात जन्मोजन्मीचे अज्ञान विलीन होते आणि उरते ते केवळ एक अखंड, अद्वैत चैतन्य. जिथे कोणताही भेद राहत नाही.
हेही वाचा – सुसंगती… साधनेचा सुंदर मार्ग
“परब्रह्म शोधण्याची आवश्यकता नाही. शोध संपला की, जे उरते त्याला परब्रह्म म्हणतात.”
मनुष्य आयुष्यभर कशाचा ना कशाचा शोध घेत असतो. मन सतत बाह्य जगाकडे धावत राहते. पण एक क्षण असा येतो की, हा अखंड चाललेला शोध थांबतो. मन शांत होते. विचारांची गर्दी विरते. त्या निःशब्द खोल शांततेत कोणतीही धावपळ उरत नाही. त्या वेळी जी अथांग, निर्विकार, प्रसन्न आणि स्वयंप्रकाशी शांतता अनुभवास येते, तीच साक्षात परब्रह्म होय.
परब्रह्म हे आपल्या अस्तित्वाचेच मूलस्वरूप आहे. म्हणून काही मिळवायचे नसते. केवळ बाहेरचा शोध थांबवून प्रेमपूर्वक स्वतःमध्ये स्थिर व्हायचे असते. त्या स्थिरतेतच, अमात्र आणि कैवल्य स्थितीचा अनुभव येतो, तिथेच ब्रह्मानुभव प्रकट होतो.


