अध्याय पंधरावा
विशिष्टां व्रतांचे फोक । धीरांचा अणगटी तिख । जन्मवेगें ऊर्ध्वमुख । उंचावती ॥191॥ माजीं वेदांचा पाला दाट । तो करी सुविद्येचा झडझडाट । जंव वाजे अचाट । सत्त्वानिळु तो ॥192॥ तेथ धर्मडाळ बाहाळी । दिसती जन्मशाखा सरळी । तिया आड फुटती फळीं । स्वर्गादिकीं ॥193॥ पुढां उपरति रागें लोहिवी । धर्ममोक्षाची शाखा पालवी । लाहालाहात नित्य नवी । वाढतीचि असे ॥194॥ पैं रविचंद्रादि ग्रहवर । पितृ ऋषी विद्याधर । हे आडशाखा प्रकार । पैसु घेती ॥195॥ याहीपासून उंचवडें । गुढले फळाचेनि बुडें । इंद्रादिक ते मांदोडे । थोर शाखांचे ॥196॥ मग तयांही उपरी डाहाळिया । तपोज्ञानीं उंचावलिया । मरीचि कश्यपादि इया । उपरी शाखा ॥197॥ एवं माळोवाळी उत्तरोत्तरु । ऊर्ध्वशाखांचा पैसारु । बुडीं साना अग्रीं थोरु । फळाढ्यपणें ॥198॥ वरी उपरिशाखाही पाठीं । येती फळभार जे किरीटी । ते ब्रह्मेशांत अणगटीं । कोंभ निघती ॥199॥ फळाचेनि वोझेपणें । ऊर्ध्वीं वोवांडें दुणें । जंव माघौतें बैसणें । मूळींचि होय ॥200॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : अर्जुना गा अवधारीं, मनुष्यालागोनि इया परी
अर्थ
आणि जे धैर्याच्या अंकुराने तीक्ष्ण असतात असे श्रेष्ठ व्रतरूपी फोक, उत्पत्तीच्या वेगाने वर टोक असलेले असे, उंच वाढतात (श्रेष्ठ व्रतांच्या योगाने वरवरचे जन्म त्यास प्राप्त होतात. ॥191॥ जोपर्यंत सत्त्वगुणाचा प्रचंड वारा सुटतो, तोपर्यंत (मनुष्यरूपी शाखेच्या) मध्ये असलेला वेदरूपी दाट पाला विद्यांचा (ज्ञानांचा) झडझडाट (गर्जना) करतो. ॥192॥ तेव्हा धर्मरूपी शाखेच्या विस्तारात जन्माच्या सरळ वाढलेल्या फांद्या दिसतात व त्या फांद्यांना स्वर्गादिक फळाने युक्त असे अनेक आडफाटे फुटतात. ॥193॥ पुढे रंगाने तांबड्या असलेल्या वैराग्यरूपी शाखेस धर्म व मोक्षरूपी लुसलुशीत पालवी नित्य नवीन येऊन वाढतच रहाते. ॥194॥ नंतर याच धर्मरूपी शाखेला सूर्य, चंद्र वगैरे श्रेष्ठ ग्रह, पितर, ऋषि, विद्याधर हे आणखी आडव्या शाखांचे प्रकार विस्तार घेतात. (अभिप्राय असा की, धर्माचरणापासून श्रद्धेनुसार हे लोक प्राप्त होतात). ॥195॥ ह्याही फांद्यांपेक्षा वर उंच गेलेल्या इंद्रादिक मोठ्या फांद्यांचे झुबके असून त्या फांद्यांची बुडे फळांनी झाकलेली असतात. ॥196॥ मग त्याही डहाळ्यांवर (इंद्रादि शाखेवर) तपाने व ज्ञानाने उंच वाढलेल्या मरीचिकश्यापादि वरच्या शाखा आहेत. ॥197॥ याप्रमाणे वर असलेल्या शाखांचा शाखोपशाखी अधिकाधिक होणारा हा विस्तार, या फांद्यांच्या बुडाशी लहान व शेंड्यास जास्त फळे असल्यामुळे थोर असा आहे. ॥198॥ अर्जुना, शिवाय या वरच्या शाखांनंतर या संसारवृक्षाला जे फळभार येतात, ते ब्रह्मदेवरूपी आणि शंकररूपी अणकुचीदार कोंब येतात.॥199॥ हा संसारवृक्ष, मनुष्यरूपी शाखेत वरच्या भागाला इतका लवलेला आहे की, ती मनुष्यरूपी शाखा (सत्कर्मांच्या) फळांच्या भाराने, मूळ जे माया, त्याला पुन्हा येऊन टेकते. (ब्रह्माच्या जवळ जवळ येते.) ॥200॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : उकलतेनि उन्मेखें, प्रज्ञाकुशलतेंची तिखें


