अजित गोगटे
`शीतावरून भाताची परीक्षा` या म्हणीनुसार काही पत्रकारांच्या अपवादात्मक वर्तनावरून सर्वच पत्रकारांच्या गैरवर्तनाचे गृहीतक काढणे योग्य आहे का? यावर ज्यामुळे मत-मतांतरे मांडली गेली त्या प्रसंगाविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे. हा प्रसंग मी दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये नोकरीला असताना 1980च्या दशकाच्या पूर्वार्धात घडला.
नक्की कुठे ते आठवत नाही. पण त्यावर्षीचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राबाहेर, बहुदा मध्य प्रदेशात कुठे तरी भरणार होते. संमेलनाच्या आयोजन समितीने संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेसोबत `लोकसत्ता`सह मुंबईतील वृत्तपत्रांना औपचारिक निमंत्रण पाठविले होते. सोबत एक पत्रही होते. त्यात संमेलनासाठी येणाऱ्या माध्यम प्रतिनिधींची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली जाईल, या नेहमीच्या मजकूराखेरीज पुढील सूचनाही ठळकपणे लिहिलेली होती :
“काही पत्रकार आयोजकांकडून अनाठायी अपेक्षा ठेवतात / मागणी करतात आणि ती पूर्ण झाली नाही तर, आयोजक अडचणीत येतील अशा बातम्या देतात, असा अनुभव आहे. तरी, अशा गोष्टी आमच्याकडून खपवून घेतल्या जाणार नाहीत, याची आपण ज्या प्रतिनिधीला पाठविणार असाल त्यांना पूर्वकल्पना द्यावी.”
हेही वाचा – पत्रकारितेची नीतिमूल्ये आणि प्रसार माध्यमांची विश्वासार्हता
आयोजकांच्या निमंत्रणपत्रातील हा सूचनावजा मजकूर पत्रकारांविषयी सरधोपट (गैर)समज करून घेऊन त्यांचा अपमान करणारा आहे, असे `लोकसत्ता`च्या संपादकमंडळातील वरिष्ठांचे मत पडले. पत्रकारवर्गामध्ये अयोग्य वर्तन करणारा एखादा असेलही. परंतु त्यावरून सर्वच पत्रकार तसे असतात, असा समज जाहीरपणे व्यक्त करणे, ही आयोजकांची कृती औद्धत्याची आहे, असे संपादकमंडळाचे म्हणणे होते. तेच वैचारिक सूत्र ठेवून दुसऱ्या दिवशीच्या `लोकसत्ता`च्या अंकात साहित्य संमेलनाच्या आयोजकांवर टीका करणारे संपादकीय स्फूट लिहिले गेले. मुंबईच्या आणखी एका मराठी दैनिकात अशाच प्रकारे टीका करणारी बातमी पहिल्या पानावर प्रसिद्ध केली गेली.
या प्रकरणी आयोजकावर आगपाखड करणे मला त्याहीवेळी पटले नव्हते. `लोकसत्ता`मधील संपादकीय स्फूटाचा सविस्तर प्रतिवाद करणारे पत्र `वाचकांची पत्रे` या सदरात छापण्यासाठी मी संबंधितांकडे दिले. अर्थात, माझे ते पत्र प्रसिद्ध केले गेले नाही, हे वेगळे सांगायला नको! आयोजकांनी त्यांच्या निमंत्रणपत्रात काहीही वावगे लिहिले नव्हते, हे माझे तेव्हाचे मत आजही कायम आहे. पत्रकारिता आणि त्यातील नीतिमूल्ये याविषयी चुकीचे समज (सोईस्करपणे ) डोक्यात भरलेले (भरवून घेतलेले) लोक वरिष्ठ पदांवर बसल्यावर (बसविल्यावर) माध्यमांची विश्वासार्हता गर्तेत जाणार, हे उघड आहे.
हेही वाचा – पत्रकारितेमधील अनीतिमूल्ये : `व्होडका` भेट देऊन लाज काढली!
पत्रकारांच्या वर्तणुकीचे मूल्यमापन करताना `शीतावरून भाताची परीक्षा` हाच निकष लावायला हवा. पत्रकार त्याच्या कामानिमित्त विविध समाजवर्गांपुढे जातो तेव्हा तो केवळ त्याच्या माध्यमाचे नव्हे तर, तमाम पत्रकारितेच्या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करत असतो. पत्रकारांचा बडेजाव त्या व्यक्तीचा म्हणून नव्हे तर, तो ज्या माध्यमाचे प्रतिनिधीत्व करतो, त्याची मर्जी राखणे हिताचे असणे, या स्वार्थी हेतूने राखला जातो. जिचा आपल्याला काहीच उपयोग नाही, अशा व्यक्तीला खुश ठेवण्याचा अट्टाहास कोण कशासाठी करेल? पत्रकारांची मर्जी केवळ त्यांच्या व्यवसायामुळे राखली जाते. म्हणूनच एखाद्या पत्रकाराचे गैरवर्तन त्याच्यापुरते व्यक्तिगत न राहता ते त्याच्या व्यवसायाचे प्रातिनिधिक गैरवर्तन ठरते. एकाच्या गैरवर्तनाच्या शिंतोड्यांनी संपूर्ण पत्रकारितेचे विश्व मालिन व्हायलाच हवे. अनेक पत्रकार परिषदा सूर्यास्तानंतर तारांकित हॉटेलांमध्ये होतात. त्यांच्या निमंत्रणांमध्ये ‘पत्रकार परिषदेनंतर मदिरापान आणि जेवण असेल,’ असे स्पष्ट लिहिलेले असते. अशी निमंत्रणे माध्यमांच्या कार्यालयांमध्ये आणून देताना ‘तुमच्याकडून येणारा प्रतिनिधी पिणारा आहे का?’ असे विचारून दिली जात नाहीत. अशा निमंत्रणामागेही सर्व पत्रकार पिणारेच असतात, असे अप्रत्यक्ष गृहीतक असते. अपमान झाल्याचे न मानता किंवा कपाळावर नाराजीची एकही अढी न पडू देता अशा निमंत्रणांचा सहर्ष स्वीकार केला जातो. थोडक्यात, पत्रकारितेच्या नीतिमूल्यांचे पालन दुटप्पीपणाने केले जाते आणि हातात लेखणी आहे म्हणून अतार्किकतेने काहींवर निष्कारण आसूड ओढले जातात.
(क्रमशः)