“राजाला दिवाळी काय माहीत साहेब? त्याला रोजचा दिवस दिवाळीसारखाच असतो. पण आमच्यासारख्या शेतकऱ्याला दिवाळी म्हटलं की दिवाळंच आठवतं!”
शामू अण्णांच्या तोंडून बाहेर पडलेले शब्द समीरच्या काळजात खोलवर रुतले. समीर काही क्षण त्यांच्याकडे पाहतच राहिला. शामू अण्णांच्या चेहऱ्यावर एक विचित्र निर्विकारपणा होता. दुःखाची एक मर्यादा ओलांडली की, माणूस रडायचंही विसरून जातो, बहुधा त्याचीच ही अवस्था असावी.
“एकुलता एक पोरगा गेल्या साली अपघातात गेला. त्यानं बागेसाठी खाजगी फायनान्सवाल्याकडून कर्ज काढलं होतं. पोरगा हुता तोपर्यंत वाटायचं, हळूहळू सगळं फेडू. पण काळानं घाव घातला. गेल्या आठवड्यातच जप्ती आलती. आता सांगा, कशाची आलीया दिवाळी आन् कशाचा सण?”
शामू अण्णा बोलत होते. त्यांच्या आवाजात आक्रोश नव्हता. उलट एक प्रकारचा थकवा होता. जणू दुःखालाही आता त्यांच्या घरात जागा उरली नव्हती. समीरला काय बोलावं हेच सुचत नव्हतं.
श्यामू अण्णा समीरच्या आईचे मामा होते. त्यांच्या घरात सुतक असल्यामुळे दिवाळी होणार नव्हती. ज्यांच्या घरात दिवाळी केली जात नाही त्यांच्या घरात चार कानुलं, दोन-चार लाडू असा फराळ देण्याची एक प्रथा आहे. ग्रामीण भागात आजही ती जोपासली जाते. त्या रिवाजानुसार समीरच्या आईने समीरला फराळ घेऊन शामू अण्णाकडे पाठवले होते.
शामू अण्णा बाजल्यावरून उठले. उठताना त्यांच्या गुडघ्यांची हाडं काडकाड वाजली. कुडावरचा टावेल काढून त्यांनी खांद्यावर टाकला. ते घराबाहेर आले. अंगणातल्या हौदाच्या नळावर चूळ भरली. तांब्या तिथेच ठेवून ते पलीकडच्या परसात गेले. वाकून वांग्याच्या झाडातून चार वांगी तोडली. बाजूच्या मिरचीच्या झाडावरून मूठभर मिरच्या तोडल्या.
दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या पिशवीत त्यांनी ती वांगी आणि मिरच्या टाकल्या. समीरच्या हातात पिशवी देताना म्हणाले, “घ्या साहेब. आमच्याकडं देण्यासारखं काय हाय? शेतात जे पिकलंय तेच देतो. शेतकऱ्याला कुठला सण आणि कुठलं गोडधोड? येणारा प्रत्येक दिवस फाटका!”
समीरने पिशवी हातात घेतली. शामू अण्णांच्या पायाला हात लावून तो गाडीकडे निघाला. शामू अण्णाही त्याच्या पाठोपाठ गाडीपर्यंत चालू लागले.
“आता काय काय केलंय शेतात?”
“पोटापुरतं हाब्रीड आन् ही चार झाडं माळव्याची. झालं की. दुसरं काय करणार? तशी कणाची जमीन तर नकू का? आमची जमीन मजी मुतानं भिजायची आन् चांदण्यानं वाळायची. त्यात आमी दोघबी थकल्यालू.”
हेही वाचा – उंबऱ्यापलीकडचा सातबारा
तो गाडीत बसला. अण्णांना पुन्हा एकदा नमस्कार केला. अण्णा पाठमोरे झाले. त्याने क्रेटा गाडीला स्टार्टर मारला. नोकरीला लागल्यावर दोनच वर्षात त्याने गाडी घेतली होती. एसी सुरू केला. गाडीच्या थंडगार हवेत समीर काही क्षण डोळे मिटून बसला. पण त्याला त्या क्षणी गाडीचा एसी जाणवत नव्हता. शामू अण्णांच्या घराच्या छपरातला जीवघेणा उकाडा त्याच्या मनात ठसला होता.
दिवस मावळतीला गेला होता. आभाळात संध्याकाळची तांबूस छटा पसरली होती. समीरची गाडी गावाच्या रस्त्याने पुढे सरकत होती.
सगळीकडे लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू होती. कुठे घरांच्या दारात सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. कुठे सुंदर नक्षीचे आकाशकंदील वाऱ्यावर डोलत होते. कुठे पायऱ्यांवर दिव्यांच्या माळा उजळल्या होत्या. व्यापाऱ्यांच्या दुकानांवर रंगीबेरंगी रोषणाई झगमगत होती. लहान मुलांच्या हातात फटाक्यांच्या माळा होत्या. अधूनमधून आकाशात एखादा शोभेचा फटाका फुटत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिवाळी नटली होती.
‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा!’
समीरच्या मनात ही म्हण आली. पण लगेच त्याच्या डोळ्यांसमोर शामू अण्णांचा चेहरा तरळला. किती विरोधाभास होता!
एका बाजूला दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेली घरे आणि दुसऱ्या बाजूला एखाद्या दिव्यासाठी तेल विकत घेण्याचीही ऐपत नसलेली छपरे! एका बाजूला मिठाईच्या दुकानांबाहेर लागलेल्या रांगा आणि दुसऱ्या बाजूला भाकरीबरोबर खायला चटणी मिळेल की नाही याची चिंता करणारी कुटुंबे! एका बाजूला लाखो रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी आणि दुसऱ्या बाजूला कर्जाच्या नोटिसीने काळवंडलेले संसार!
समीरच्या डोळ्यांसमोर शामू अण्णांची तुटकी चप्पल तशीच दिसत होती. हाडं आणि कातडं एक झालेली ती नवरा-बायकोची जोडी. दिवसभर शेतात राबायचं. कधी उन्हात, कधी पावसात, तर कधी मध्यरात्री लाईट आली म्हणून पाण्यासाठी उठायचं. आयुष्यभर कष्ट करून त्यांनी एक छोटंसं स्वप्न पाहिलं होतं. मुलगा शिकेल, बाग फुलवेल, घराला हातभार लावेल. म्हातारपणी आपल्याला दोन घास सुखाचे खायला घालेल.
पण एका अपघाताने त्यांचा मुलगा हिरावून घेतला. मुलाबरोबरच त्यांच्या जगण्याचा आधारही निघून गेला. मागं राहिलं ते कर्ज, जप्तीची नोटीस आणि दोन म्हातारे जीव! त्यांच्या घरात दिवाळी येणार तरी कशी?
समीरच्या मनात विचारांचं काहूर माजलं.
अशी कितीतरी शामू अण्णांसारखी कुटुंबं असतील. दिवाळीच्या दिवशीही ज्यांच्या घरात सुतक असेल. एखाद्या घरातला कर्ता माणूस दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत असेल. कुणाच्या घरातला प्रमुख माणूस एखाद्या चुकीच्या गुन्ह्यात अडकून तुरुंगाच्या गजाआड खितपत पडला असेल. कुणाची मुलगी संसाराच्या वणव्यात होरपळत असेल. कुणाचा बाप कर्जाच्या डोंगराखाली दबला असेल. दुष्काळाने होरपळलेल्या एखाद्या गावात तर दिवाळीच्या दिवशीसुद्धा चुलीवर भाकरी भाजण्यासाठी पीठ असेल की नाही, याची शाश्वती नसेल.
मग त्यांच्यासाठी दिवाळी म्हणजे काय? फक्त कॅलेंडरवरची एक तारीख? की दुसऱ्यांच्या घरात उजळलेले दिवे पाहत स्वतःच्या अंधाराची दुखरी जाणीव करून देणारा एखादा दिवस?
आपण दिवाळी साजरी करतो. आनंदाने फराळ करतो. नवे कपडे घेतो. घराला रोषणाई करतो. फटाके फोडतो. एकमेकांना शुभेच्छा देतो. यात गैर काहीच नाही. आनंद साजरा करायलाच हवा. पण आपल्या आनंदाच्या उत्सवात कुणाच्या दुःखाची जाणीवच हरवून जायला नको.
दिवाळी म्हणजे केवळ स्वतःच्या घरात दिवे लावणे एवढाच अर्थ आहे का? आपल्या शेजारच्या घरात अंधार असेल तर तिथेही एखादा दिवा पोहोचवण्याचं नाव दिवाळी नाही का?
समीरच्या मनात एकामागून एक प्रश्न उभे राहत होते.
आपण म्हणतो, ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ शाळेत असताना ही प्रतिज्ञा किती अभिमानाने म्हणायचो आपण! पण आजही एक बांधव तुपाशी आणि दुसरा बांधव उपाशी का आहे? एकाच्या घरात पंचपक्वान्नांची रेलचेल आणि दुसऱ्याच्या घरात चुलीवर पाणी तापवण्याचीही ऐपत नाही, असं चित्र का आहे?
विकासाच्या गप्पा मारणाऱ्या देशात शामू अण्णांसारख्या शेतकऱ्याला स्वतःच्या कष्टाने उभारलेल्या बागेची मालकीही टिकवता येत नसेल, तर त्या विकासाचा नेमका उपयोग कुणाला होतोय?
समाजातील प्रत्येक माणसाला सन्मानाने जगता येईल, कुणाच्या वाट्याला पराकोटीचं दुःख येणार नाही, अशी व्यवस्था आपण निर्माण करू शकणार नाही का?
बुद्धी आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, साधनसामग्री आहे. मग माणसाचं दुःख कमी करण्यासाठी या सगळ्यांचा उपयोग का होत नाही? राजकारण करणाऱ्या माणसांनी कधीतरी सत्तेच्या खुर्चीतून खाली उतरून शामू अण्णांच्या बाजल्यावर बसायला नको का? त्यांच्या घरातल्या अंधाराचं कारण समजून घ्यायला नको का?
समीर प्रश्नांच्या या भेंडोळ्यातच घरी पोहोचला.
त्याच्या घरासमोर दिव्यांची सुंदर माळ लावली होती. अंगणात मोठी नक्षीदार रंगीबेरंगी रांगोळी काढली होती. दारात डेरेदार आकाशकंदील लावला होता. घरात लक्ष्मीपूजनाची जोरदार तयारी सुरू होती. फराळाचे ताट सजवले होते. ताटात नोटांचं पुडकं गोल करुन मांडलं होतं. नवीन कपडे घातलेल्या मंडळींची लगबग सुरू होती.
समीर गाडीतून उतरला. हातातली पिशवी त्याने अलगद बाजूला ठेवली. तेवढ्यात दादा घाईघाईने त्याच्याजवळ आला.
“काय रे, कुठं अडकला होता एवढा वेळ? पटकन कपडे बदल. आरती झाली की आपल्याला फोटोसेशन करायचंय. मग भरपूर फटाके उडवायचे आहेत. यंदा भारी आणलेत बघ फटाके!”
दादा लगबगीने निघून गेला. समीर मात्र तिथेच उभा राहिला.
त्याने पिशवीतून एक वांगं बाहेर काढलं. हातात फिरवलं. त्याला अचानक जाणवलं, आपण बाजारातून हजारो रुपयांचा फराळ विकत घेऊ शकतो, पण ज्या माणसाने आयुष्यभर शेतात राबून अन्न पिकवलं, त्याच्या घरात आज गोडधोड शिजत नसेल. त्याने पुन्हा त्या पिशवीकडे पाहिलं. चार वांगी आणि मूठभर मिरच्या! शामू अण्णांनी किती सहजपणे त्या पिशवीत टाकल्या होत्या. पण समीरला त्या वांग्या मिरच्यांपेक्षा त्यामागची भावना अधिक मोठी वाटत होती. स्वतःच्या घरात अंधार असतानाही दुसऱ्याच्या घरात काहीतरी देण्याची त्यांची वृत्ती त्याला अस्वस्थ करून गेली.
घरातून आरतीचे स्वर ऐकू येऊ लागले.
“सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची…”
समीरच्या मनात विचार आला. आपण ज्या गणरायाला सुखकर्ता, दुःखहर्ता म्हणतो, त्या सुखाची आणि दुःखाची व्याख्या तरी आपण समजून घेतली आहे का?
इतक्यात बाहेर फटाक्यांची मोठी माळ फुटली. आकाशात रंगीबेरंगी प्रकाश पसरला. लहान मुलांचा आनंदाने ओरडण्याचा आवाज आला.
हेही वाचा – सत्याचा विजय होतोच, पण…
समीरने खिशातून मोबाईल काढला. शामू अण्णांचा नंबर शोधला. काही क्षण तो तसाच पाहत राहिला. मग फोन लावला.
“अण्णा, मी समीर बोलतोय. जेवण झालं का तुमचं?”
पलीकडून शामू आण्णांचा नेहमीसारखाच आवाज आला. “व्हय साहेब. झालं की. तुम्ही करा लक्ष्मीपूजन.”
समीर काही क्षण गप्प राहिला. मग म्हणाला,
“अण्णा, उद्या सकाळी मी परत येतोय. तुमच्याशी थोडं बोलायचंय.”
फोन ठेवून तो घरात गेला. आरती सुरू होती. सगळे देवासमोर हात जोडून उभे होते. समीरही हात जोडून उभा राहिला. पण आज त्याने लक्ष्मीला एक वेगळीच प्रार्थना केली.
“हे लक्ष्मीमाते, आमच्या घरात भरपूर संपत्ती दे, असं मी तुला मागत नाही. पण ज्या हातांनी धान्य पिकवलं, त्या हातांना उपाशी राहू देऊ नकोस. ज्या घरात मुलाच्या आठवणीने आईबापाचे डोळे भरून येतात, त्या घरात पुन्हा एकदा हसू फुलू दे. ज्या घरात कर्जाच्या नोटीसीने चूल विझली आहे, तिथे जगण्याची उमेद निर्माण होऊ दे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, दुसऱ्याच्या घरातला अंधार पाहण्याची दृष्टी आम्हाला दे!”
आरती संपली. सगळ्यांनी एकत्र फोटो काढला. फटाके उडवायला सुरुवात झाली. समीरही सगळ्यांमध्ये उभा होता. पण त्याचं मन कुठेतरी दुसरीकडेच होतं.
रात्री उशिरा तो झोपायला गेला. खिडकीतून बाहेर पाहिलं. समोरच्या इमारतीत असंख्य दिवे लुकलुकत होते. पण त्याला मात्र शामू अण्णांच्या शेतातलं काळोखलेलं छप्पर दिसत होतं. त्याच्या डोळ्यांसमोर एकच दृश्य वारंवार येत होतं.
चार वांगी… मूठभर मिरच्या… आणि एका शेतकऱ्याच्या ओठांवरचं ते वाक्य…“शेतकऱ्याला कुठला सण आणि कुठलं गोडधोड? येणारा प्रत्येक दिवस फाटका!”
समीरच्या लक्षात आलं. दिवाळीच्या दिवशी आपण घरात शेकडो दिवे लावले, तरी दुसऱ्याच्या आयुष्यातला अंधार थोडा तरी दूर झाला नाही तर आपल्या दिवाळीला तरी काय अर्थ आहे?
दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजन झालं होतं. घरातले सगळे दिवे उजळले होते. पण समीरच्या मनात एक प्रश्न अजूनही रेंगाळतच होता… ज्या देशात अन्न पिकवणारा शेतकरीच उपाशी झोपतो, त्या देशाने दिवाळीच्या रोषणाईचा नेमका अभिमान तरी कशाचा बाळगायचा?
कदाचित दिवाळीचा खरा अर्थ दिव्यांच्या संख्येत नसतो. तो आपण दुसऱ्याच्या आयुष्यात किती प्रकाश पोहोचवला, यात असतो. कारण…दिवाळी घर उजळवण्यासाठी नसतेच. ती माणसाच्या मनात माणुसकीचा दिवा पेटवण्यासाठी असते…!!!


