अध्याय पंधरावा
तरी श्वः म्हणिजे उखा । तोंवरि एकसारिखा । नाहीं निर्वाहो यया रुखा । प्रपंचरूपा ॥111॥ जैसा न लोटतां क्षणु । मेघु होय नानावर्णु । कां विजु नसे संपूर्णु । निमेषभरी ॥112॥ ना कांपतया पद्मदळा । वरीलिया बैसका नाहीं जळा । कां चित्त जैसें व्याकुळा । माणुसाचें ॥113॥ तैसीचि ययाची स्थिती । नासत जाय क्षणक्षणाप्रती । म्हणौनि ययातें म्हणती । अश्वत्थु हा ॥114॥ आणि अश्वत्थु येणें नांवें । पिंपळु म्हणती स्वभावें । परी तो अभिप्रावो नव्हे । श्रीहरीचा ॥115॥ एऱ्हवीं पिंपळु म्हणतां विखीं । मियां गति देखिली असे निकी । परी तें असो काय लौकिकीं । हेतु काज ॥116॥ म्हणोनि हा प्रस्तुतु । अलौकिकु परियेसा ग्रंथु । तरी क्षणिकत्वेंचि अश्वत्थु । बोलिजे हा ॥117॥ आणीकही एकु थोरु । यया अव्ययत्वाचा डगरु । आथी परी तो भीतरु । ऐसा आहे ॥118॥ जैसा मेघांचेनि तोंडें । सिंधु एके आंगें काढे । आणि नदी येरीकडे । भरितीचि असती ॥119॥ तेथ वोहटे ना चढे । ऐसा परिपूर्णुचि आवडे । परी ते फुली जंव नुघडे । मेघानदींची ॥120॥ ऐसें या रुखाचें होणेंजाणें । न तर्के होतेनि वहिलेपणें । म्हणौनि लोकु यातें म्हणे । अव्ययु हा ॥121॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : तो बुद्धीची घेऊनि आगारी, भेदाची वृद्धि करी
अर्थ
तर श्व म्हणजे उद्या, तोपर्यंत या प्रपंचरूप वृक्षाला एकसारखे टिकणे नाही. (म्हणून याला अश्वत्थ असे म्हणतात.) ॥111॥ ज्याप्रमाणे एक क्षण लोटला नाही तोच, मेघ नाना रंगांचा होतो, अथवा वीज ही एक पूर्ण निमिषभर देखील टिकत नाही. ॥112॥ अथवा हलणार्या कमळाच्या पाकळीवरील पाण्याच्या थेंबाला जशी स्थिरता नाही; अथवा व्याकुळ माणसाच्या चित्ताला जशी स्थिरता नसते ॥113॥ त्याप्रमाणेच या संसारवृक्षाची स्थिती आहे, म्हणजे हा प्रतिक्षणाला नाश पावतो, म्हणून याला ज्ञाते (लोक) अश्वत्थ असे म्हणतात. ॥114॥ आणि अश्वत्थ या नावाने स्वभावत: पिंपळ असे म्हणतात, परंतु भगवंताचा तसा अभिप्राय नाही. ॥115॥ एरवी पिंपळ या अर्थाने संसाराला भगवंतांनी अश्वत्थ उपमा दिली असती, तरीसुद्धा ती मला चांगली पटली असती. परंतु ते राहू द्या, आपल्याला लौकिकार्थाशी काय करायचे आहे? ॥116॥ म्हणून आता (या संसारवृक्षासंबंधी) अलौकिक व्याख्यान ऐका. तर या वृक्षास क्षणभंगुरतेच्याच दृष्टीने शास्त्रात अश्वत्थ असे म्हटले जाते. ॥117॥ आणखी एक याच्या अविनाशीपणाबद्दल मोठी प्रसिद्धी आहे. परंतु तो अविनाशीपणा आतून असा आहे. ॥118॥ ज्याप्रमाणे मेघांच्या मुखांनी समुद्र एका बाजूने उपसला जातो व दुसर्या बाजूने नद्या त्यास भरीतच असतात. ॥119॥ त्या योगाने तो (समुद्र) कमी अथवा जास्त होत नाही, असा परिपूर्णच आहे, असा वाटतो, परंतु त्याचे परिपूर्णत्व मेघाचा आणि नदीचा त्याच्याशी (समुद्राशी) जोपर्यंत संयोग बिघडला नाही, तोपर्यंतच असते. ॥120॥ त्याप्रमाणे या संसारवृक्षाचे होणेजाणे वेगाने होत असल्यामुळे, त्या होण्याजाण्याचा तर्क करता येत नाही, म्हणून लोक याला अविनाश असे म्हणतात. ॥121॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : आतां याचा हाचि विस्तारु, हाचि यया पैसारु


