डोह हे निबंधांचं संकलन आहे. लेखकाने त्यांच्या गावाचं वर्णन केलं आहे. गाव अगदी स्वप्नात पहावं असं, परीकथेतलं गाव वाटत. गावात काहीही अद्भुत किंवा विशेष नाही, पण एका लहान मुलाच्या स्वप्नील निरागस दृष्टीने पाहिलेलं ते गाव आहे. लेखकाची निरीक्षणशक्ती आणि स्मरणशक्ती मात्र अद्भुत आहे. त्यांचा जन्म सांगली मधल्या औदुंबर गावात झाला तिथे प्राथमिक शिक्षण झाल्यावर नंतर पुढचे शिक्षण अंकलखोपमध्ये झाले.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर काळसर हिरव्या पोपटी पांढरट रंगाच्या छटातून घनदाट अरण्य, समोर डोह. झाडांच्या पानांतून वाहणारा सूर्यप्रकाश दाखवला आहे तर मलपृष्ठावर शांताबाई शेळकेंनी केलेली समीक्षा आहे. लेखकाच्या समर्थ लेखनशैलीमुळे जो बदल झाला त्याबद्दल त्या म्हणतात, ‘ललित लेखन वाइमय प्रकार अधिक लवचिक, प्रसारणशील, मोकळा झाला. इतर वाइमय प्रकार आणि ललित लेख यांच्यातल्या सीमारेषा अस्पष्ट होत शेवटी पुसून गेल्या. इतर वाइमय प्रकार आपल्यात चपखलपणे सामावून घेतले. ही विकासाची वाट प्रथम ‘डोह’ने मोकळी करून दिली.’’
9 आवृत्या प्रकाशित झालेल्या या पुस्तकातले ललित निबंध सत्यकथा, मौज सारख्या वेगवेगळ्या मासिकांत प्रसिद्ध झाले होते. लहानसं गाव, कधीही कोरडी न पडणारी नदी, नदीला कातीव घाट, पायऱ्या, पावसाळ्यात चहूबाजूंनी पाण्याने वेढल्यामुळे बेटासारखे झालेले गाव, देवीचे मंदिर, पाण्याच्या पातळीनुसार देवालयाचे वरती -खाली करणे, पांढऱ्या भिंती असलेले सर्वात उंचावर असलेले घर, डोहाजवळ असलेली उंबरासारखी झाडे, वडाचा पार, त्यावरचे वेगवेगळे पक्षी, डोहातले प्राणी या सर्वांबद्दल लेखक इतक्या आत्मीयतेने लिहितात की जणू हे सगळे त्यांच्या कुटुंबाचा भाग आहेत.
दादा म्हणजे वडील, आई, थोरली आई आणि धाकटी बहीण, यांनी सांगितलेल्या खऱ्या आणि काल्पनिक गोष्टी ते सांगतात तेव्हा आपले बालपण आठवत राहते, हसूही येते. या काल्पनिक गोष्टीचं, त्यातून निर्माण झालेल्या जगाचं एक हळुवार नातं असतं, जे मनात कायम राहत. त्या आठवणीने गालावर मोरपीस फिरवल्यासारखं सुख मिळत. दादांनी त्यांचं बालपण आनंदमय केलं. खांद्यावर बसवून नदीवर घेऊन जाणारे, पाण्याची भीती जावी म्हणून बुरुजावरून ढकलून देणारे, मग स्वत: पाण्यात उडी घेणारे दादा, उंबराच्या भोवती अलगद पावले टाकत पाण्यातून चालायला शिकवणारे, आपल्या पाण्यात सुसरी नाहीत असे ठामपणे सांगून एक दिवस स्वत:च सुसर दाखवणारे, हिरव्यागार करंजाच्या झाडाला लागलेली करंजे या करंज्या आहेत आणि दिवाळीत याच तोडून आपण घरी नेतो असे म्हणणारे, बिनधास्त, मिश्कील आणि कुटुंबवत्सल दादा हे विलोभनीय व्यक्तिमत्व आहे. लेखक लिहितात, ‘दादांच्या शब्दांचे अर्थ फार पसरत. एका रस्त्याला पुढे दोनतीन वाटा फुटाव्यात आणि वाट चुकावी तसे त्यांच्याशी बोलताना होई. पालकत्व न करता आदर्श पालकत्व करणारे दादा.’
या घरातला लहानगा मुलगा चौकस, जिज्ञासू, सूक्ष्म निरीक्षण, तितकेच तीव्र आकलन असलेला बुद्धिमान मुलगा आहे. त्याच्या नजरेतून पाहिलेले गोजिरवाणे जग लेखक सांगत आहेत. सुरूवातीचा लेख वानरांवर आहे. वानरांच्या टोळ्या, माद्या, लहान पिल्ले, आडदांड वानर यांचं बारकाईने केलेलं निरीक्षण दिसत. लेखाच्या शेवटी त्यांनी आईची आठवण सांगितली आहे. आई म्हणायची, आपली आणि त्या मोठ्ठ्या कुणाची प्रत्येक जन्मी गाठभेट होत असते. तो गोकुळात कृष्ण होता तेव्हा आपण गोपांच्या मेळ्यात होतो. तो रामराजा होता त्यावेळी आपण वानरांच्या फौजात होतो.’’लहान असताना खरंच असचं काहीसं वाटायचं. जसं शिवाजी महाराजांच्या फौजेत आपण होतो किंवा रायगडावर महाराजांचा भास होतो असं म्हणणारे चौथीतला महाराजांचा इतिहास शिकणारे वर्गमित्र, मैत्रिणी मला आठवत राहिले.
हेही वाचा- Bookshelf : ‘ॲनिमल फार्म’… लेखणीची ताकद असलेली कादंबरी
लेखक म्हणतात, येताना अनेक जिवलग वाटांना जायचे राहून गेले. अनेक जिवलग वाटा हरवल्या. हरवलेल्या वाटांच्या आठवणींना जाणारी वाट आता हरवू नये. ’’लहानपण संपून मोठ्या झालेल्या प्रत्येकाला हेच वाटत असत, लेखकाने ते फार हळुवार मांडलं आहे. वटवाघूळ या विषयावर सुद्धा इतका भावनोत्कट लेख लिहिला आहे. वाघळाशी भीती, किळस आणि अंधाऱ्या जागेत त्यांनी केलेल्या विष्ठेचा वास हेच जोडलेले आहे. थोरल्या आईने त्यांना सांगितलं, पंक्तीप्रपंच केल्याने वाघळाच्या जन्माला गेलेली ती गेल्या जन्मीची माणसे आहेत. वडाच्या झाडावर बसलेल्या वाघळात, गेलेली कोणती माणसे दिसतात, हे शोधताना इथे थोरली आई नसणार याची खात्री त्या मुलाला आहे कारण तिने कधीच पंक्तीप्रपंच केलेला नाही. घुबड आणि पिंगळ्याच्या भोवती अशुभाचे वलय आणि मृत्यूची चाहूल असते. थोरली आई गेली तेव्हा असाच संकेत घुबडाने दिला होता.
उन्हाबद्दल लिहिताना जणू एखाद्या सजीवाचं वर्णन करत आहेत असं वाटत. उन्हे यायची सावकाश, ती काही लवकर उठायची नाहीत. एकदा उतरली की झडझडून पंख झाडायची आणि उंच होत जायची. कुठल्या अनोळखीपणातून चालताना काहीच कळत नसते आणि कुठून तरी जन्मांच्या सोबतीसारखे ते ऊन अनोळखीपणावर पसरते. सारे ओळखीचे होऊन जाते.’’ते म्हणतात, स्मरणवाट कुठपर्यंत जाते कळत नाही. आठवणींना ते जुने निळे क्षण म्हणतात. प्रकाशाला चिवचिवण्याची आणि लाटांना कुरळ्या केसांची उपमा देतात. आईने सांगितलं होतं, वारा झाडावर राहतो आणि तो तिथून उठला की त्याला बोलवण्यासाठी झाडांची पाने हलू लागतात.
प्रत्येक ऋतूतला वारा वेगळा. घराची छपरे उडवणारा वारा, लाटा उंचावणारा वारा आणि लय मंदावल्यावर दिवस पांढरेकोरडे करणारा वारा. या वाऱ्याला परीकथेच्या पंक्तीत नेऊन बसवणारी लिनी सांगते की वाऱ्याने वर नेलेला पाचोळा खाली उतरताना डोळे मिटून ओंजळीत पकडला आणि तसंच जमिनीत पुरला की त्याचे सोने होते. वाऱ्याचे एक ताऱ्याचे घर असते. लहान मुलांना देव बेंबीला दोरी बांधून आकाशातून काळोख्या रात्री खाली सोडतो तेव्हा दोरीचा झोक मधल्या पोकळीतल्या वाऱ्याने आमच्या घरी थांबवला असला पाहिजे. मलाही जेव्हा एका काळोख्या रात्री देवाने आकाशातून सोडले तेव्हा आई, थोरली आई, दादा असलेल्या घरीच नेमका तो थांबला हे त्याचे केवढे चांगुलपण.
पाणी, पूर, देव पाण्याखाली जाताना होणारी घालमेल, आरती, घराच्या पायरीला पाणी लागायची भीती आणि त्यात नदीतल्या सुसरी याचे जिवंत वर्णन वाचताना सगळे तसेच तसे डोळ्यांसमोर उभे राहते.
लेखक निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीशी तद्रूप झाला आहे. इतका की चर अचर सृष्टीतल अंतर मिटून गेलं आहे. त्याच्या चौकस नजरेने कुतूहलाने तो जे पाहतो त्यातले काही आपल्या आसपास घडत असते, पण त्या निर्मळ नजरेने आपण ते पाहत नाही. पैशाने विकत न घेता येण्यासारख्या ज्या मोजक्या गोष्टी आहेत त्यापैकी हे एक आहे, अगदी निश्चितच. ऊन, वारा, पाउस, पाणी, वानर, सुसर, घुबड, पिंगळा, देव, देवालय सगळे व्यक्तिमत्व लेवून मोहक रुपात समोर येते.
हेही वाचा- Bookshelf : ‘सेतू’… कथानकाची घट्ट वीण असलेली कादंबरी
लेखकाने असे कितीतरी शब्द वापरले आहेत जे आता वापरात नाहीत. काही शब्द त्यांनीच पहिल्यांदा वापरले असावेत. आपल्या भाषेचं हे जुनं लावण्य पाहून आतून आनंद वाटला. लेखकाच्या बालपणाचा एका गावातला तो काळ या पुस्तकात त्यांनी अमर केला आहे. या डोहात इतके काही सामावले आहे की डोह अथांग वाटतो. हा डोह मनाचा आहे, आठवणींचा आहे. त्यात दडलेला आठवणींचा खजिना बाहेर येऊ लागल्यावर हरवलेलं काही अनमोल मिळू लागत. लेखकाप्रमाणे माझंही घर कोणी उन्हात बांधणार होत, आकाशातल्या ताऱ्यात कोणाचं तरी घर होतं, डोक्याला डोकं लागलं की शिंग येणार होतं आणि ओवाळणीच्या वेळी कोणी एकच ओवाळायचा राहून गेला तर माझं नाक गरुडासारख लांब होणार होतं.
डोह वाचताना डोळ्यांच्या कडा ओलावतात, स्मित उमटतं आणि आपण पुन्हा पुन्हा पाने उलटी सुलटी करत वाचत राहतो.
समीक्षकांनी गौरवलेली, खूप लोकप्रिय झालेली कादंबरी असल्यामुळे वाचायला हवी. पण खरे तर ही वाचली नाही तर काही खास हातून निसटेल म्हणून नक्कीच वाचायला हवी.


