माझी रोजची किंवा हक्काची म्हणाल तर, मंगळवारची ती गणपतीच्या देवळाची वाट. आठवड्यातला तो एक दिवस ठरलेला असायचा — संध्याकाळच्या वेळेस देवळात जायचं, बाप्पाचं दर्शन घ्यायचं आणि थोडा वेळ तिथल्या दगडी कट्ट्यावर शांत बसून यायचं.
तिथे गेल्यावर ओळखीचे काही चेहरे दिसायचे. त्यात एक काकू असायच्या. अंगावर साधीसुधी सुती साडी, कपाळावर कुंकू आणि त्यांच्या हाताला धरून चालणारा त्यांचा छोटासा नातू. त्या नेहमी दिसायच्या, पण कधी आमचं बोलणं झालं नव्हतं; फक्त समोर आल्यावर एकमेकांकडे बघून एक ओळखीचं, गोड हसू दिलं जायचं.
त्या दिवशी मंगळवार होता, पण एरवीपेक्षा देवळात गर्दी बरीच कमी होती. त्यामुळे घाईगडबड नव्हती. गाभाऱ्यातून येणाऱ्या समईच्या वातींचा आणि फुलांचा मंद सुवास हवेत दरवळत होता. मी नेहमीप्रमाणे दर्शन घेतलं आणि बाहेरच्या मोकळ्या प्रांगणातल्या त्या दगडी कट्ट्यावर येऊन बसले. थोड्या वेळानं त्या काकूही तिथंच येऊन बसल्या आणि त्यांचा छोटा नातू पायऱ्यांवर खेळायला लागला.
हेही वाचा – थकलेल्या जीवाला नवा श्वास देणारे शब्द…
आज मनातलं आलं, आज तरी या काकूंशी दोन शब्द बोलायचेच. मी हळूच त्यांच्याकडे सरकले, हसून नमस्कार केला आणि विचारलं, “काकू, तुम्ही या छोट्याला घेऊन बऱ्याचदा इथे येताना दिसता. आज म्हटलं जरा तुमच्याशी बोलावं.”
माझ्या त्या साधेपणाचा आदर करत काकूंनीही प्रेमळपणे हात जोडले आणि म्हणाल्या, “हो गं बाई, हा माझा नातू. याला बाप्पाची फार आवड आहे, आणि मलाही या शांततेत इथे आल्यावर बरं वाटतं.”
मग काय, गप्पांचा ओघ सुरू झाला. बोलता बोलता विषय देवाकडे आणि आपण घालणाऱ्या साकड्यांकडे वळला. मी सहजच त्यांना विचारलं, “काकू, आपण सगळेच बाप्पाकडे काही ना काही मागतो. तुम्ही आज काय मागितलं?”
माझा हा प्रश्न ऐकून काकूंनी एक दीर्घ, पण अतिशय समाधानाचा श्वास घेतला. त्यांनी गाभाऱ्यातल्या बाप्पाच्या मूर्तीकडे पाहिलं, ओठांवर एक मंद हास्य आणलं आणि अगदी आपुलकीने म्हणाल्या, “बघं गं पोरी, आपण नेहमी देवाकडे काहीतरी मागतो. वेळेनुसार तो आपल्याला काहीना काही देतच असतो. आपण आपल्या मनातलं सगळं देवाला सांगतो — ‘बाप्पा, माझ्या मुलांना, माझ्या नातवाला परीक्षेत छान यश मिळू दे, त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ दे.’
हेही वाचा- साधं वरण-भाताच्या वासात आई शोधताना…
काकू पुढे सहज हसून म्हणाल्या, “पण सांगू का ग पोरी? मी देवाला कधी असं नाही म्हणत की, तू माझी इच्छा पूर्ण कर… मग मी तुला सोनं देईन, चांदी वाहीन किंवा भरपूर पैसा देईन. मी बाप्पाला साधीच गोष्ट सांगते — तू माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर, माझ्या लेकरांचं-नातवाचं भलं कर; आणि तुझ्या या कृपेच्या बदल्यात, मी माझ्या परीने दहा गरजू लोकांना नक्की मदत करेन, त्यांच्या आयुष्यातला एखादा आनंद पूर्ण करेन. माझा नवस असतो ग, तो पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने फेडायचा!”
त्या काकूंचे ते शब्द ऐकून माझ्या अंगावर काटा आला. आपण आयुष्यभर देवाला काय देतो याचंच गणित मांडतो. पण देवाने दिलेलं आयुष्य किंवा दिलेलं सुख पुढे दुसऱ्या एखाद्या गरजूपर्यंत पोहोचवणं, हा किती मोठा, निर्मळ आणि खरा नवस होता!
त्या दिवशी मंगळवारी देवळातून बाहेर पडताना माझे पाय जड झाले होते, पण मन मात्र खूप हलकं झालं होतं. रोजच्या गर्दीतल्या त्या देवळाच्या वाटेने चालताना, मला बाप्पा फक्त त्या दगडी मूर्तीत नाही, तर त्या काकूंच्या साध्या शब्दांतून जिवंत होऊन भेटला होता.


