अध्याय चौदावा
मां च योऽव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते । स गुणान् समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते ॥26॥
तरी व्यभिचाररहितें चित्तें । भक्तियोगें मातें । सेवी तो गुणातें । जाकळूं शके ॥371॥ तरी कोणु मी कैसी भक्ती । अव्यभिचारा काय व्यक्ती । हे आघवीचि निरुती । होआवी लागे ॥372॥ तरी पार्था परियेसा । मी तंव येथ ऐसा । रत्नीं किळावो जैसा । रत्नचि तो ॥373॥ कां द्रवपणचि नीर । अवकाशुचि अंबर । गोडी तेचि साखर । आन नाहीं ॥374॥ वन्हीं तेंचि ज्वाळ । दळाचि नांव कमळ । रूख तेंचि डाळ- । फळादिक ॥375॥ अगा हिंव जें आकर्षलें । तेंचि हिमवंत जेवीं जालें । नाना दूध मुरालें । तेंचि दहीं ॥376॥ तैसें विश्व येणें नांवें । हें मीचि पैं आघवें । घेईं चंद्रबिंब सोलावें । न लगे जेवीं ॥377॥ घृताचें थिजलेंपण । न मोडितां घृतचि जाण । कां नाटितां कांकण । सोनेंचि तें ॥378॥ नुकलितां पटु । तंतुचि असे स्पष्टु । न विरवितां घटु । मृत्तिका जेवीं ॥379॥ म्हणोनि विश्वपण जावें । मग मातें घेयावें । तैसा नव्हे आघवें । सकटचि मी ॥380॥ ऐसेनि मातें जाणिजे । ते अव्यभिचारी भक्ति म्हणिजे । येथ भेदु कांहीं देखिजे । तरी व्यभिचारु तो ॥381॥ याकारणें भेदातें । सांडूनि अभेदें चित्तें । आपणयासकट मातें । जाणावें गा ॥382॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : रात्रि तैसें पाहलें, हें धारणा जेवीं एक जालें
अर्थ
आणि अव्यभिचारी (अभेद) भक्तियोगाने जो माझी उपासना करतो, तो या गुणांच्या पूर्णपणे पलीकडे जाऊन त्यास ब्रह्मत्व प्राप्त होण्याची योग्यता येते. ॥26॥
तर (माझ्यावाचून) दुसरीकडे कोठेही मन गुंतू न देता भक्तिरूप मार्गाच्या द्वारा जो माझी उपासना करतो, तो गुणांना ताब्यात ठेऊ शकतो. ॥371॥ तर मी कोण आहे, भक्ति ती कशी असते व एकनिष्ठतेचे स्पष्ट स्वरूप काय, हा सर्व निर्णय (प्रथम) झाला पाहिजे. ॥372॥ (या विश्वात मी कोण आहे हे तुला सांगतो). तर अर्जुना, ऐक. मी तर या विश्वात असा आहे की, ज्याप्रमाणे रत्नाचे ठिकाणी असलेले तेज रत्नच आहे ॥373॥ अथवा ओलेपणाच जसे पाणी आहे किंवा पोकळीच आकाश आहे अथवा गोडी तीच जशी साखर आहे, वेगळी नाही. ॥374॥ अग्नि तोच जसा जाळ आहे, पाकळ्यांचेच नाव जसे कमळ आहे, वृक्ष तोच जसे फांद्या, फळे वगैरे आहे, ॥375॥ अर्जुना, बर्फ जे एकत्र गोठून झाले तेच जसे हिमालय पर्वत होय अथवा विरजलेले दूध तेच जसे दही असते, ॥376॥ त्याप्रमाणे विश्व म्हणून जे म्हणतात ते सर्व मीच आहे. पहा चंद्रबिंब जसे सोलावे लागत नाही (चंद्र पाहणे असल्यास) चंद्राच्या कला वेगळ्या करण्याची जरूरी नाही. ॥377॥ तुपाचा घट्टपणा न मोडता ते जसे तूपच आहे अथवा (सोन्याचे) कडे हे आटवले नसतांना ते सोनेच आहे. ॥378॥ वस्त्राचे धागे न उकलता, ते वस्त्रच जसे उघड दोराच आहे, अथवा मातीची घागर न विरघळता जशी ती घागर मातीच आहे. ॥379॥ म्हणून विश्वपण दूर करावे (विश्वाचा निरास करावा) व मग मला घ्यावे, तसा मी नाही, तर विश्वासकट सर्व मी आहे. ॥380॥ अशा प्रकारे मला जाणणे, ती अव्यभिचारी भक्ति असे म्हणतात. येथे (या विश्वात व माझ्यात) काही भेद पाहिला तर तो व्यभिचार होतो. ॥381॥ या कारणास्तव अर्जुना, भेदाला टाकून अभेद अशा चित्ताने आपल्यासकट (आपणास माझ्यावेगळे न मानून ) मला जाणावे. ॥382॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : साहीं ऋतु येतां आकाशें, लिंपिजेचि ना जैसें


