माया / भाग – 8
ज्ञेयो न विषयो ह्यात्मा
निर्विकारो ह्यतोऽद्वयः।
स्वीकारो वा परित्यागो
नात्मनो विद्यते खलु॥
– गीताव्रत
आपण जगातील अनेक गोष्टींचे ज्ञान मिळवत असतो. आपण विज्ञान, इतिहास, भूगोलाचे ज्ञान घेतो किंवा एखाद्या नवीन भाषेचे ज्ञान घेतो. या सर्व प्रक्रियेमध्ये एक गोष्ट समान असते, ती म्हणजे जाणणारा आणि जाणण्याची वस्तू हे दोन्ही वेगवेगळे असतात. पण आत्मज्ञानाचे असे होत नाही. आत्मा हा कधीच ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही, कारण तो साक्षात जाणणारा म्हणजेच ज्ञाता आहे.
आपण आपल्या डोळ्यांनी या जगातील यच्चयावत सुंदर गोष्टी पाहतो. डोंगर, फुलं, सूर्योदय, सूर्यास्त, नद्या, समुद्र, रंग, आकार सगळं काही आपण अगदी स्पष्ट पाहतो. पण तेच डोळे स्वतःला थेट पाहू शकतात का? तर नाही. डोळ्यांना स्वतःला पाहण्यासाठी पुन्हा एखाद्या आरशाची गरज भासते. ते स्वतःहून स्वतःला कधीच पाहू शकत नाहीत, कारण ते पाहण्याचे साधन आहेत पाहण्याचा विषय नाहीत.
अगदी त्याचप्रमाणे आत्मा हा सर्वांना जाणणारा आहे, त्याला जाणण्यासाठी दुसरी कोणतीही वस्तू नाही. आत्म्यामध्ये कोणतेही परिवर्तन नाही आणि तो अनेक नसून तो अद्वय म्हणजेच एकच आहे. त्यामुळे आपण पाहिले की, मी या आत्म्याला स्वीकारतो किंवा मी या आत्म्याला नाकारतो, असा कोणताही प्रश्नच तिथे उद्भवत नाही. आत्मा स्वतःलाच कसे आणि का नाकारेल? तो आपला पाहतो आहे. पाहणे हा त्याचा मूळ स्वभाव आहे. आणि आत्मा हा आपल्याला बंद डोळ्यांच्या अंतर्मनाच्या आरशातून पाहायचा, अनुभवायचा संवादायचा असतो.
अन्तर्बहिः स्थितो ह्यात्मा
जन्ममृत्युविवर्जितः।
ऐक्यज्ञानं यदा जज्ञे
पुनर्जन्म न विद्यते॥
– गीताव्रत
माणसाच्या मनातील सर्वात मोठी भीती कोणती असेल तर ती म्हणजे मृत्यूची आणि नाशाची भीती. आपण सगळेजण आतून कुठेतरी मृत्यूला घाबरून असतात. पण ज्ञानी मनुष्य अत्यंत निर्भय का असतो, याचे उत्तर या श्लोकात दडले आहे.
ज्ञानी मनुष्य पक्के जाणतो की, मी जो अंतर्बाह्य भरून राहिलेला आत्मा आहे… तो जन्म आणि क्षय, म्हातारपण आणि मृत्यू यांच्या पूर्णपणे पलीकडे आहे. जो जन्माला येतो, तो कधीतरी मरणार हे नक्की, पण मी तर कधी जन्मालाच आलो नाही, मग माझा मृत्यू कसा काय होणार?
एकदा का ही जाणीव आणि खात्री झाली की, मग किंचितमात्र तरी भीती का आणि कोणाची वाटेल? पण यासाठी अनुभूती घ्यावी लागेल. ज्याला जीव आणि ब्रह्म यांच्या अद्वैताचे आणि ऐक्याचे प्रत्यक्ष ज्ञान झाले आहे, त्याच्या बाबतीत पुनर्जन्माचा प्रश्नच कायमचा मिटून जातो.
हेही वाचा – खरी साधना आणि ध्यान
आपण कोणता जन्म कसा घेणार, हे देखील अनेकांना कळतं. अनेकांना आपल्या मृत्यूची तारीख सांगता येते. अनेकांना आता आपण हा देह सोडावा, हे ठरवता येतं. अनेकांना याच नव्हे, तर अनेक जन्मांचे ज्ञान आत्म्याच्या द्वारे होत असतं.
पण हे सगळं समजून घेण्यासाठी आपण शेतातील एका बीजाचे उदाहरण घेऊया. शेतामध्ये आपण जेव्हा एखादे बी पेरतो, तेव्हा त्याला पाणी मिळाले की, त्यातून नवीन रोपटे उगवते. पण जर तेच बी आपण विस्तवावर किंवा अग्नीवर चांगले भाजून काढले आणि मग जमिनीत पेरले तर त्यातून काहीही उगवत नाही. कारण अग्नीने त्याची उगवण्याची क्षमता पूर्णपणे जाळून टाकलेली असते. अज्ञान हे त्या कच्च्या बीजासारखे आहे, जे जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यात आपल्याला अडकवते. पण जेव्हा आत्मज्ञानाच्या प्रखर अग्नीत ते अज्ञानरूपी बीज पूर्णपणे भाजून निघते, तेव्हा त्याचे अस्तित्वच उरत नाही आणि पुनर्जन्माचा प्रश्नच कायमचा मिटून जातो.
नाज्ञातो हि कदाप्यात्मा
न त्याज्यो न च गृह्यते।
स्वदेहे च यथा मानं
नात्मने मानमन्यथा॥
– गीताव्रत
आपल्याला अनेकदा असे वाटते की आत्मा ही काहीतरी अत्यंत गूढ आणि कोणालाही कधीही न समजलेली अशी अज्ञात गोष्ट आहे, जी आपल्याला कुठूनतरी खूप कष्ट करून मिळवायची आहे. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. आत्मा ही काही कोणालाही आणि कोणत्याही काळी अज्ञात असलेली गोष्ट नाहीच. ती बाजारातून मिळवण्याची किंवा नको असेल तर टाकून देण्याची एखादी वस्तू नाही. आपण स्वतःचेच अत्यंत साधे उदाहरण घेऊया. समजा आपण झोपेतून सकाळी जागे झालो, तर आपण जागे आहोत किंवा आपण जिवंत आहोत, हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज असते का? आपण घरातल्या लोकांना रोज विचारतो का की, कृपया मला सांगा मी खरंच जिवंत आहे ना? नक्कीच नाही. स्वतःच्या शरीराची आणि अस्तित्वाची ओळख पटण्याकरिता जसा आपल्याला कोणताही बाह्य पुरावा लागत नाही, तसाच स्वतःच्या आत्म्याची ओळख होण्यासाठी कोणताही बाह्य पुरावा किंवा कोणत्याही ग्रंथाची आवश्यकता नसते.
दिवसा सूर्याला पाहण्यासाठी जशी बॅटरीची किंवा दिव्याची, प्रकाशाची गरज नसते कारण सूर्य स्वतःच प्रकाश आहे. तो स्वयंप्रकाशित आहे अगदी तसेच आपले अस्तित्व हे स्वयंप्रकाशित आणि स्वयंसिद्ध आहे. आपण काय आहोत, हे कदाचित आपल्याला माहीत नसेल, पण आपण आहोत हे आपल्याला नेहमीच माहीत असते. ती अस्तित्वाची जाणीव म्हणजेच आत्मा होय!
तीव्रा मुमुक्षुता ह्येका
आत्मप्राप्तेर्हि साधनम्।
देहाभिमानतो विश्वं
सत्यवद्भासते खलु॥
– गीताव्रत
आत्मप्राप्तीसाठी अनेक मार्ग आणि अनेक साधने सांगितली जातात, पण त्या सर्वांमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा आणि एकमेव उपाय आहे तो म्हणजे मुमुक्षुता. इतर सर्व इच्छांचा संपूर्ण त्याग करून केवळ आणि केवळ आत्मानुभूतीची अत्यंत तीव्र इच्छा असणे, हाच तो मुख्य उपाय आहे. ही इच्छा किती तीव्र असावी?
समजा, एखाद्या माणसाच्या केसांना अचानक आग लागली, तर त्यावेळी त्याच्या मनात कोणती इच्छा असेल? त्याला त्या वेळी भूक लागेल का? त्याला संपत्ती आठवेल का? किंवा त्याला मान आणि अपमान आठवेल का? तर, नक्कीच नाही. प्रयत्न करून देखील असे काही त्याला आठवणार नाही. त्या क्षणी त्याला केवळ एकच गोष्ट हवी असेल आणि ती म्हणजे पाणी! जोवर आग विझत नाही, तोवर इतर सर्व गोष्टी त्याच्यासाठी पूर्णपणे अर्थहीन असतील. तशीच संसाराच्या तापाने पोळलेल्या साधकाला जेव्हा सत्याची अत्यंत प्रबळ ओढ लागते, तेव्हाच त्याला आत्मज्ञान प्राप्त होते.
आत्मा आणि ब्रह्म यांच्या ऐक्याची प्रत्यक्ष अनुभूती येण्यापूर्वी हे जे इंद्रियांना दिसणारे अफाट जग आहे, ते आपल्याला पूर्णपणे सत्य आणि निश्चित आकाराचे वाटते. जोपर्यंत आत्म्याविषयीची आपली कल्पना केवळ या देहभावनेशी एकरूप असते म्हणजेच जोपर्यंत ‘मी देह आहे’ असे आपण मानतो, तोपर्यंत हे जग आणि या जगाचा अनुभव सत्यच आहे, असे मानले पाहिजे. वाळवंटात दिसणारे मृगजळ जोपर्यंत आपण खरे मानतो, तोपर्यंत आपण पाण्यासाठी धावत राहतो; पण एकदा का ते खोटे आहे हे कळले की ते मृगजळ दिसणे थांबत नाही, पण आपले त्यामागे धावणे कायमचे थांबते.
पापपुण्यविमुक्तोऽयं
कालत्रयविवर्जितः।
सर्वदेवातिगो ह्यात्मा
तस्मै सर्वात्मने नमः॥
– गीताव्रत
या शेवटच्या आणि अत्यंत परमोच्च श्लोकात आद्य शंकराचार्यांनी आत्मज्ञानाचा अंतिम टप्पा अतिशय सुंदर रीतीने मांडला आहे. आत्मा हा साक्षात परब्रह्म असून तो पाप आणि पुण्य; भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ तसेच कार्यकारणभाव यासारख्या सर्व बंधनांपासून पूर्णपणे मुक्त आहे, हे आपण अत्यंत ठामपणे जाणले पाहिजे. आत्म्याची ज्ञानशक्ती कधीच विराम पावत नसल्यामुळे आणि तो अपरिवर्तनशील असल्यामुळे तो नेहमी जागाच असतो. मग ती जागृतीची अवस्था असो, स्वप्नाची अवस्था असो किंवा गाढ झोपेची अवस्था असो या तिन्ही अवस्थांमध्ये तो अखंड ज्ञानवान असतो. ज्ञानी पुरुषाला जो आत्मा नेहमी नित्य आणि शुद्ध भासतो, तोच आत्मा अज्ञानी माणसाला नित्य अशुद्ध भासतो; कारण दोघांची दृष्टी वेगवेगळी असते.
हेही वाचा – तुज आहे तुजपाशी
परमात्मा सर्वसमावेशक आणि निखळ आनंदस्वरूप असल्यामुळे तिथे ज्ञाता म्हणजे जाणणारा, ज्ञान म्हणजे जाणण्याची क्रिया आणि ज्ञेय म्हणजे जाणण्याची वस्तू या तिन्ही रूपांना म्हणजेच त्रिपुटीला तो कधीही प्रवेश देत नाही. या तिन्ही रूपांच्या पलीकडे जाऊन केवळ तोच प्रकाशमान असतो. आणि जेव्हा साधक या अत्यंत उच्च आणि अद्वैत स्थितीला पोहोचतो, तेव्हा त्याच्या अंतःकरणातून अत्यंत विनम्र उद्गार बाहेर पडतात.
तो म्हणतो की, जो सर्व देवांच्याही पलीकडे आहे, तो आता कोणाला नमस्कार करणार? जो त्या परमोच्च स्थितीला पोहोचला आहे, तो आता कोणतीही शास्त्रविहित कर्मे किंवा कर्मकांड करीत नाही. सर्व प्रयत्नांच्या आणि सर्व शोधांच्या मुळाशी असलेला जो माझा स्वतःचा स्वयंप्रकाशित आत्मा आणि परमात्मा आहे, त्यालाच मी पुनः पुन्हा अत्यंत लीन होऊन नमस्कार करतो.
लाटेला जेव्हा स्वतःच्या अथांग समुद्र असण्याची जाणीव होते, तेव्हा ती लाट शांत होते आणि ती समुद्रातच विलीन होते. तसेच, हे आत्मानुभूतीचे सर्वोच्च शिखर आहे, जिथे सर्व द्वैत संपते आणि उरते ती केवळ परमानंदाची अनुभूती.
आपण ध्यान आणि शुद्ध चिंतन करीत रहा! आपल्याही अंतःकरणात तो आत्मानंदाचा प्रकाश नक्कीच उजळून निघेल.


