अध्याय चौदावा
पैं रजतमविजयें । सत्त्व गा देहीं इयें । वाढतां चिन्हें तियें । ऐसीं होती ॥204॥ जे प्रज्ञा आंतुलीकडे । न समाती बाहेरी वोसंडें । वसंतीं पद्मखंडें । दृती जैसी ॥205॥ सर्वेंद्रियांच्या आंगणीं । विवेक करी राबणी । साचचि करचरणीं । होती डोळे ॥206॥ राजहंसापुढें । चांचूचें आगरडें । तोडी जेवीं झगडे । क्षीरनीराचे ॥207॥ तेवीं दोषादोषविवेकीं । इंद्रियेंचि होती पारखीं । नियमु बा रे पायिकी । वोळगे तैं ॥208॥ नाइकणें तें कानचि वाळी । न पहाणें तें दिठीचि गाळी । अवाच्य तें टाळी । जीभचि गा ॥209॥ वाती पुढां जैसें । पळों लागे काळवसें । निषिद्ध इंद्रियां तैसें । समोर नोहे ॥210॥ धाराधरकाळें । महानदी उचंबळे । तैसी बुद्धि पघळे । शास्त्रजातीं ॥211॥ अगा पुनवेचां दिवशीं । चंद्रप्रभा धांवें आकाशीं । ज्ञानीं वृत्ति तैसी । फांके सैंघ ॥212॥ वासना एकवटे । प्रवृत्ति वोहटे । मानस विटे । विषयांवरी ॥213॥ एवं सत्त्व वाढे । तैं हें चिन्ह फुडें । आणि निधनही पडे । तेव्हांचि जरी ॥214॥ तरी जैसीचि घरींची संपत्ती । आणि तैसीचि औदार्यधैर्यवृत्ती । मा परत्रा आणि कीर्ती । कां नोहावें ॥215॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : तेवींचि आक्रोशबळें, व्यापारे कोणे एके वेळे
अर्थ
बाबा अर्जुना, रजोगुण व तमोगुण यांच्यावर जय मिळवून, जेव्हा सत्वगुण या देहात वाढतो, तेव्हा जी लक्षणे होतात, ती अशी असतात. ॥204॥ की, वसंत ऋतूत ज्याप्रमाणे सुवास कमलांच्या पाकळ्यांमध्ये न मावता बाहेर पडतो, तशी बुद्धि आतमध्ये न मावता बाहेर पडते. ॥205॥ सर्व इंद्रियांचे अंगणात विवेक पहारा करतो व हातापायांच्या ठिकाणी खरोखरच डोळे होतात. (म्हणजे हातपाय ही कर्मेंद्रिये असूनही त्यांना चांगले व वाईट निवडण्याची शक्ती येते). ॥206॥ राजहंसापुढे दूध व पाणी यांचे मिश्रण ठेवले असता, त्या राजहंसाच्या चोचीचे टोक जसे त्या मिश्रणातील दूध व पाणी यांची वेगळीक करते. ॥207॥ त्याप्रमाणे पापपुण्य निवडण्यात इंद्रियेच परीक्षा करणारी होतात. व त्यावेळेला, अरे अर्जुना, इंद्रियनिग्रह हाच (आपण होऊन) सेवाचाकरी करत असतो. ॥208॥ जे ऐकू नये, ते कानच वर्ज्य करतात, जे पाहू नये ते दृष्टीच टाकून देते, ज्याचा उच्चार करू नये ते जीभच टाळते. ॥209॥ दिव्यापुढे जसा काळोख पळावयास लागतो, त्याप्रमाणे इंद्रियांसमोर निषिद्ध विषय येत नाही. ॥210॥ पावसाळ्याच्या दिवसात जसा महानदीला अपरंपार पूर येतो त्याप्रमाणे सर्व शास्त्रात बुद्धी पसरते. ॥211॥ अर्जुना, पौर्णिमेच्या दिवशी ज्याप्रमाणे चंद्राचा प्रकाश आकाशात सर्वत्र पसरतो, त्याप्रमाणे ज्ञानात वृत्ति सर्वत्र पसरते. ॥212॥ वासना एकत्र होतात. (एक ब्रह्मप्राप्तीविषयीच काय ती वासना असते). संसाराकडे मनाची असलेली धाव कमी होते व मन विषयांना विटते. ॥213॥ याप्रमाणे सत्त्वगुण वाढतो तेव्हा ही लक्षणे खरोखर दिसतात आणि अशा स्थितीत जर मृत्यु घडला ॥214॥ तर जशी घरामधे (विपुल) संपत्ती आहे आणि त्याच प्रमाणे त्या संपत्तिवाल्याची वृत्ति उदार असून त्याच्या अंगी धैर्य आहे, तर मग इहलोकात कीर्ती आणि परलोकात सुख, त्यास का मिळू नये? ॥215॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : त्रिगुणवृद्धिनिरूपण, तीं श्लोकीं सांगितलें जाण


