मला बाय रोड प्रवास करायला खूप आवडतं! कारने प्रवास करताना एखाद्या ढाब्यावर जेवण करणे म्हणजे पर्वणी असते. या धाब्यांवर खरपूस अशी तंदूर रोटी, ज्वारी किंवा बाजरीची भाकरी आणि त्यासोबत कधी झणझणीत शेव भाजी, मसाला वांगी, भरीत, दाल तडका, तर कधी डाळ पालक, डाळ मेथी असल्या भाज्या मिळाल्या तर दुसरं काय हवं? या ढाब्यांवर फक्त स्वच्छता आणि तिथे मिळणारे पदार्थ थोडे तपासून घ्यावे लागतात! ढाब्यांवर मिळणाऱ्या वेगवेगळ्या भाज्यांमध्ये माझी आवडती लसुणी पालक ही एक भाजी आहे! ज्वारीची, बाजरीची भाकरी, तंदूर रोटी, तवा रोटी कशाही सोबत ही भाजी छान लागते, सोबतीला दाल तडका, जिरा राईस आणि कांदा-लिंबू असले की झाले… मग कशाचीच गरज भासत नाही!
आमच्या शेतातून ताजा पालक / मेथी/ टोमॅटो/ मुळे/ वांगे/ कोथिंबीर घरी आणले जाते आणि मग काय त्या फ्रेश भाज्या शेजारीपाजारी वाटून होतात आणि मग विविध घरांतून मला त्यांचे फोन येतात की, वहिनी पालक खूपच छान होता, त्याच्या पुऱ्या झाल्या… कोथिंबीर वडी केली… मेथीचे मुठ्ठे केले… मसाला वांगी… मुळ्याचे पराठे… तुरीच्या दाण्यांचे आळण… कचोरी झाली वगैरे वगैरे… ते सर्व ऐकून आणि त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मला समाधान मिळते. शेतामधून जे काय घरी येईल ते शेजाऱ्यांना, मित्रमैत्रिणींना देण्यात आम्हा दोघांनाही खूप आनंद होतो. माझ्याही घरी मग या ताज्या भाज्यांचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. आज त्यातीलच एक लसुणी पालकाची रेसीपी ढाबा स्टाईलने कशी करायची ते सांगते.
साहित्य
- पालकाची जुडी – एक
- ओला लसूण – पाच-सहा (पातीसह असलेले गाठे)
- हिरव्या मिरच्या – चार
- लसूण – एक (सोललेला आणि बारीक चिरलेला)
- कांदे – दोन
- टोमॅटो – दोन
- आले – दोन इंच (बारीक किसलेले)
- जिरे – एक चमचा
- धणे – दोन चमचे
- हळद – अर्धा चमचा
- लाल तिखट – दोन चमचे
- गरम मसाला – एक चमचा
- धणे-जिरे पावडर – दोन चमचे
- हिंग – एक चमचा
- कोथिंबीर – मुठभर (बारीक चिरलेली)
- सार मीठ – चवीनुसार
- दही – दोन चमचे
- बेसन – एक चमचा
- साखर – एक चमचा
- तेल – एक पळी
- तेजपान – एक
- दालचिनी तुकडा – एक
- लाल सुक्या मिरच्या – तीन ते चार
- बटर – दोन चमचे
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल आंब्याची / कैरीची कढी!
कृती
- पहिल्यांदा पालक निवडून आणि स्वच्छ धुवून गरम पाण्यात एक चमचा साखर टाकून ब्लान्च करावा.
- पालक ब्लान्च झाल्यावर गरम पाण्यातून काढून थंड पाण्यात टाकावा जेणेकरुन त्याचा रंग कायम राहील आणि पेस्ट करायलाही सोपे जाईल.
- पालक ब्लान्च होईपर्यंत दोन कांदे कापून ते एक टेबल स्पून तेलावर गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावे आणि नंतर त्यात दोन चमचे धणे, एक चमचा जिरे आणि तीन-चार लाल सुक्या मिरच्या टाकून सर्व मिश्रण परतून घ्यावे.
- टोमॅटो पाण्यात उकळून घेऊन त्याची सालं काढून तेसुद्धा चिरून घेऊन याच कांद्याच्या मिश्रणात परतून घ्यावेत.
- हे सर्व मिश्रण थंड झाले की, त्याची फाइन पेस्ट करुन घ्यावी.
- ब्लान्च केलेला पालक मिक्सरमध्ये टाकून त्यात ओल्या लसणाची पात आणि गाठे बारीक चिरून टाकावेत. तसेच, चार हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर ही सामग्रीदेखील पालकामध्ये टाकावी आणि त्याचे मऊसर बारीक वाटण करुन घ्यावे.
- या वाटणामध्ये एक चमचा बेसन पाण्यात मिक्स करून टाकावे म्हणजे पालकाच्या पेस्टला पाणी सुटणार नाही.
- कढईत एक पळीभर तेल घेऊन त्यात मोहरी, जिरे टाकून ते तडतडल्यावर एक चमचा हिंग घालावा, आणि नंतर एक तेजपान तसेच दालचिनीचा तुकडा टाकावा. लगेच कांदा, टोमॅटोचे वाटण घालून ते सर्व व्यवस्थित कडेने तेल सुटेपर्यंत परतावे.
- नंतर त्यात दोन चमचे दही घालावे आणि ते मसाल्यांमध्ये चांगले मिक्स करावे.
- हळद, तिखट आणि गरम मसाला आणि एक वाटी पाणी घेऊन ते मिश्रण उकळून घ्यावे. नंतर त्यात एक चमचा धणे पावडर टाकून त्यात पालक-ओल्या लसणाचे वाटण घालावे आणि पालकाची पेस्ट मसाल्यांमध्ये एकजीव करावी.
- चवीनुसार मीठ टाकावे आणि भाजी उकळायला मंद आचेवर ठेवावी. भाजी जास्त घट्ट वाटल्यास परत एक वाटी पाणी टाकून एकदा भाजीला चांगली उकळी आणावी.
- सर्वात शेवटी दोन चमचा बटर टाकून भाजीवर झाकण ठेवावे आणि गॅस बंद करावा.
तडका बनविण्याची कृती
- या भाजीवर तडका तयार करण्यासाठी एका छोट्या तडक्याच्या कढईत एक पळीभर तेल तापवून त्यात मोहरी, जिरे टाकून ते तडतडल्यावर एक चमचा हिंग टाकावा.
- नंतर एक संपूर्ण लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून त्या लालसर होईपर्यंत फ्राय कराव्यात.
- त्यात आल्याचा किस टाकावा आणि गॅस बंद करून त्या तडक्यात तीन-चार चमचे रेड चिली फ्लेक्स टाकावे. नंतर हा तडका लसुणी पालक भाजीवर टाकावा.
हेही वाचा – Recipe : पोहे आणि बटाट्याचे टेस्टी पराठे!
टिप्स
- लसुणी पालक या नावातच लसूण असल्यामुळे या भाजीत लसूण थोडा जास्त लागतो.
- अशी ही लसणाचा स्वाद असलेली भाजी बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी, जिरा राइस आणि दाल तडका, सोबतीला एखादी चटणी, कांदा, लिंबू, रायता यासोबत जेवणाची लज्जत नक्कीच वाढवते!


