डॉ. किशोर महाबळ
“सर, तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला काही गोष्टी सुचवू का?” एका विद्यार्थ्याने त्याच्या वर्गशिक्षक असलेल्या तरुण प्राध्यापकांना विचारले. प्राध्यापकांनी अर्थातच होकारात्मक प्रतिसाद दिल्यावर तो विद्यार्थी पुढे म्हणाला, “सर, तुम्ही आजकालच्या आधुनिक कल्पना स्वीकारल्या आहेत, पण आधुनिक जीवनशैली स्वीकारलेली नाही. मला वाटते की, साध्याशा दिसणाऱ्या शर्ट, पँटऐवजी तुम्ही रोज अतिशय आकर्षक फॅशनेबल, ब्रॅण्डेड कपडे वापरायला सुरूवात करायला हवी. टू व्हीलर वापरण्याऐवजी तुम्ही लवकरच एखादी चांगली कारही खरेदी केली पाहिजे. शक्य असल्यास कार चालवण्यासाठी एखादा चालकही ठेवा.”
या सगळ्या सूचना ऐकून प्राध्यापकांना मजा वाटली; पण त्यामागची कारणं मात्र त्यांच्या लक्षात आली नाहीत. म्हणून काहीशा उत्सुकतेनं त्यांनी विचारलं, “तुझ्या सूचना इंटरेस्टिंग आहेत. पण मी हे सगळं करावं, असं तुला का आवश्यक वाटतंय, हे प्लीज मला सांगशील का?”
विद्यार्थी म्हणाला, “सर, मला वाटतं की, जर तुम्ही असं केलं तर, विद्यार्थी तुमचा सल्ला अधिक गांभीर्याने मनावर घेतील, तुम्हाला अधिक आदर देतील. आमच्यासारखा तरुणवर्ग सामान्यतः अतिशय आधुनिक लाइफस्टाईलने जगणाऱ्यांना फॉलो करतो. सर, मला यावर तुमचं मत जाणून घ्यायचं आहे.”
हेही वाचा – ‘तू मूर्ख’ आहेस!
प्राध्यापक म्हणाले, “जर विद्यार्थी माझ्या आधुनिक पोशाखामुळे मला अधिक आदर देणार असतील तर, याचा अर्थ असा होतो की, ते मला नव्हे तर माझ्या पोशाखाला आणि माझ्या वाहनाला अधिक महत्त्व देत आहेत! जर माझी किंमत आणि प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असेल तर, मी स्वतःला निरुपयोगी व्यक्ती आहे, असं मानायला हवं. मला असं वाटतं की, विद्यार्थ्यांनी माझ्या गुणवत्तेच्या आधारावर माझा आदर केला पाहिजे, माझ्या वस्तू किंवा पोशाखाच्या आधारावर नाही. त्याचप्रमाणे, विद्यार्थ्यांनी वर्गात मी कसा शिकवतो याला महत्त्व द्यावं, माझ्या पोशाखाला नाही, अशी माझी इच्छा आहे.”
“केवळ आधुनिक जीवनशैली म्हणजे पोशाख आणि वाहन अशी समजूत करून घेणाऱ्या किंवा यांना जास्त महत्त्व देणाऱ्या तरुणांबद्दल मला वाईट वाटतं. असे विद्यार्थी मला फॉलो करतात की, नाही याने मला काहीही फरक पडत नाही. जेव्हा ‘मला’ गरज वाटेल तेव्हाच मी माझी जीवनशैली बदलेन, कुणाच्या सांगण्यावरून नाही. तेव्हा आधी स्वतःला विचारा की प्राध्यापकांची ‘आधुनिक जीवनशैली, छानछोकीने रहाणे आणि पोशाख’ की त्यांचे ‘शिक्षण आणि त्यांच्यात असणारे गुण’ कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत?”
प्राध्यापकांना अशा सूचना करण्यात काही अर्थ नाही हे त्या विद्यार्थ्याच्या लक्षात आलं….!
हेही वाचा – शिक्षक आणि प्रतिभेची ओळख
(दिवंगत डॉ. किशोर महाबळ यांच्या Qualities or Attire? या कथेचा आराधना जोशी यांनी केलेला हा स्वैरानुवाद)