अध्याय चौदावा
आतां मियां मज दाविला । शरीरीं वेगळालां । गुणीं मीचि बांधला । ऐसा आवडें ॥129॥ जैसें स्वप्नीं आपण । उठूनियां आत्ममरण । भोगिजे गा जाण । कपिध्वजा ॥130॥ कां कवळातें डोळे । प्रकाशूनि पिवळें । देखती तेंही कळे । तयांसीचि ॥131॥ नाना सूर्य प्रकाशें । प्रकटी तैं अभ्र भासे । तो लोपला हेंही दिसे । सूर्येंचि कीं ॥132॥ पैं आपणपेनि जालिया । छाया गा आपुलिया । बिहोनि बिहालिया । आन आहे ॥133॥ तैसीं इयें नाना देहें । दाऊनि मी नाना होयें । तेथ ऐसा जो बंधु आहे । तेंही देखें ॥134॥ बंधु कां न बंधिजे । हें जाणणें मज माझें । नेणणेनि उपजे । आपलेनि ॥135॥ तरी कोणें गुणें कैसा । मजचि मी बंधु ऐसा । आवडे तें परियेसा । अर्जुनदेवा ॥136॥ गुण किती किंधर्म । कायि ययां रूपनाम । कें जालें हें वर्म । अवधारिजे ॥137॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : प्रवृत्ति पेललें पोट, निवृत्ति ते पाठी नीट
अर्थ
आता निरनिराळ्या शरीरात माझे प्रकाशन माझ्याकडून होते आणि त्या शरीरामध्ये गुणांनी मीच बांधला गेल्यासारखा दिसतो. ॥129॥ हे अर्जुना, ज्याप्रमाणे स्वप्नामधे आपले मरण आपणच आपल्या कल्पनेने तयार करून, त्या स्वकल्पित मरणाचे दु:ख आपण स्वत:च भोगावे. ॥130॥ अथवा एखादी पांढरी वस्तु पिवळी दिसली म्हणजे आपल्यास कावीळ झाली असे समजते. हे कावीळ झाल्याचे ज्ञान आपल्यास डोळ्यांमुळे होते व तेच डोळे पिवळेपणाचे प्रकाशन करतात. ॥131॥ अथवा, सूर्य आपल्या, प्रकाशाने ज्या वेळेस आपल्यावर आलेल्या ढगांचे प्रकाशन करतो, त्या वेळेस ते ढग आपणास दिसतात व सूर्यबिंबावर आलेल्या ढगाने सूर्यास झाकून टाकलेले आहे, हे देखील सूर्याच्या प्रकाशामुळेच समजते. ॥132॥ अर्जुना, आपल्यापासूनच झालेल्या छायेला भ्याले असता, ती छाया भ्यालेल्या पुरुषाहून काही वेगळी आहे काय? तर नाही. म्हणजे त्या छायेचे प्रकाशन आपणच केले आहे. ॥133॥ त्याप्रमाणे हे अनेक देह दाखवून (प्रकाशून) मी अनेक होतो आणि त्या अनेक शरीरांत मी गुणांकडून बांधला गेलो आहे, असे जे वाटते, त्या वाटण्याचेही प्रकाशनही मीच करतो. ॥134॥ माझे मला यथार्थ ज्ञान असणे, हे गुणांचा बंध (दिसत) असून त्या बंधाकडून न बांधले जाण्यास कारणीभूत होते व आपल्या यथार्थ स्वरूपाच्या अज्ञानानेच (बंध) उत्पन्न होतो. ॥135॥ तर अर्जुनदेवा, कोणत्या गुणाने व कसा मला मी बंधन आहे असे वाटते; ते ऐका. ॥136॥ गुण किती आहेत? त्यांचे धर्म काय? त्यांचे नाव व रूप काय? व ते कोठे उत्पन्न झाले? हे वर्म ऐक. ॥137॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : पैं उंचानीचा डाहाळिया, विषमा वेगळालिया


