नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
गणपती बाप्पा गावाला गेले. आता पुढचा प्रवास. महालय सुरू. म्हणजे पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा किंवा श्राद्ध पक्ष. कोणीही काहीही म्हणो… पण हे असे दिवस आहेत की, या दिवसांत आपली पितरं आपल्या घरी जेवायला येतात, असं आपण मानतो. छान सुग्रास स्वयंपाक बनवला जातो आणि त्या अन्नाचा नैवेद्य करून आपल्या गेलेल्या व्यक्तीच्या नावाने ‘काव घास’ ठेवला जातो. आपली श्रद्धा की, आपले देवाघरी गेलेले आप्त, कुटुंबीय आज आपल्या घरी जेवायला आले. त्यांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाला मिळो, अशी प्रार्थना करतो.
माझ्या लहानपणापासून मी हे श्राद्ध बघत आलेय. माझ्या आजोबांचं दादाजींचं श्राद्ध. इथे एक नियम आहे की, पान ठेवल्यावर कावळ्याने येऊन घास घेतल्याशिवाय कोणीही जेवायचं नाही! आमच्याकडे असे झाले की, आजी म्हणायची – “आधी सगळ्या नातवंडांना खाऊ घाला. त्याशिवाय कावळा घास घेणारच नाही. मुलंबाळ उपाशी राहिलेली दादाजींना चालायचं नाही. आधी हिला काहीतरी खायला दे. हिने खाल्ल की मग बघ दादाजी पटकन येतील…” आणि खरंच तसं व्हायचं. मला ते कधीच कळलं नाही की, ज्यांनी मला कधी पहिलंच नाही, त्यांचं माझ्यावर प्रेम कसं काय असू शकेल? पण हे प्रश्न मला मोठेपणी पडायला लागले. दादाजींच श्राद्ध माझे वडील दरवर्षी करतात. कित्येक वर्ष श्राद्धाला मी गेलेच नाहीये तरी, कावळा पानाला शिवतोच की!
हेही वाचा – वास्तव अन् आभासी जगामधली धूसर रेषा!
आजी गेल्यावर मला एक गोष्ट कळली की, विधवा स्त्री गेल्यावर तिचे दिवस, भरण्या श्राद्ध, वर्ष श्राद्ध झालं की संपलं!! त्यानंतर कसलेही विधी करत नाहीत. मुले जिवंत असेपर्यंत गेलेल्या वडिलांचं श्राद्ध मात्र दरवर्षी केलं जातं. खरंतर, हा विषय संशोधनाचा आहे. स्त्रीशिक्षण, स्त्री सबलीकरण, स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने मिळणारा मान-सन्मान या ठिकाणी नाहीच!
मला विरोध नाही करायचा; पण वाईट वाटतेच ना, की इथे स्त्रीला, आईला, बायकोला डावललं जातं. हा म्हणजे जर का बाई अहेवपणी म्हणजे सौभाग्यवती असताना देवाघरी गेली, तर श्राद्ध पक्षात अविधवा नवमीला मोठ्या मानाने तिला पान ठेवलं जातं. मग विधवा बाई गेल्यानंतर हे असं का? नवरा नसेल तर, त्या स्त्रीला ही अशी दुय्यम वागणूक का दिली जाते? हे माझे माझ्या मनातले प्रश्न आहेत.
हेही वाचा – मेहनत करने वालों की…
पितरांना मात्र मनापासून नमस्कार… पृथ्वीवरील समस्त मानव जातीला तुमच्या आशीर्वादाची नितांत गरज आहे. तुमच प्रेम आणि आशीर्वाद कायम आम्हावर राहू द्या.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
https://whatsapp.com/channel/0029VbAtufJ65yDINAO9Ad2H
या लिंकला क्लिक करून WhatsApp Channel जॉइन करा.


