अध्याय चौदावा
सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति याः । तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता ॥4॥
याकारणें मी पिता । महद्ब्रह्म हे माता । अपत्य पंडुसुता । जगडंबरु ॥116॥ आतां शरीरें बहुतें । देखोनि न भेद हो चित्तें । जे मनबुद्ध्यादि भूतें । एकेंचि येथें ॥117॥ हां गा एकेचि देहीं । काय अनारिसें अवयव नाहीं । तेवीं विचित्र विश्व पाहीं । एकचि हें ॥118॥ पैं उंचानीचा डाहाळिया । विषमा वेगळालिया । येकाचि जेवीं जालिया । बीजाचिया ॥119॥ आणि संबंधु तोही ऐसा । मृत्तिके घटु लेंकु जैसा । कां पटत्व कापुसा । नातू होय ॥120॥ नाना कल्लोळपरंपरा । संतती जैसी सागरा । आम्हां आणि चराचरा । संबंधु तैसा ॥121॥ म्हणोनि वन्हि आणि ज्वाळ । दोन्ही वन्हीचि केवळ । तेवीं मी गा सकळ । संबंधु वावो ॥122॥ जालेनि जगें मी झांकें । तरी जगत्वें कोण फांके । किळेवरी माणिकें । लोपिजे काई ॥123॥ अळंकारातें आलें । तरी सोनेपण काइ गेलें । कीं कमळ फांकलें । कमळत्वा मुके ॥124॥ सांग पां धनंजया । अवयवीं अवयविया । आच्छादिजे कीं तया । तेंचि रूप ॥125॥ कीं विरूढलेया जोंधळा । कणिसाचा निर्वाळा । वेंचला कीं आगळा । दिसतसे ॥126॥ म्हणोनि जग परौतें । सारूनि पाहिजे मातें । तैसा नव्हें उखितें । आघवें मीचि ॥127॥ हा तूं साचोकारा । निश्चयाचा खरा । गांठीं बांध वीरा । जीवाचिये ॥128॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : रुखाचा आवांका, जैसी बीजकणिका
अर्थ
हे कौंतेया, सर्व योनीमध्ये ही जी शरीरे निर्माण होतात, त्या सर्वांचे कारण (आई) माया आहे आणि बीज पेरणारा पिता मी आहे. ॥4॥
या कारणास्तव मी बाप, महद् ब्रह्म ही आई व अर्जुना, जगडंबर हे मूल आहे. ॥116॥ आता निरनिराळी शरीरे पाहून चित्तात भेद येऊ देऊ नकोस. कारण की, या सर्व शरीरात मन, बुद्धि, अहंकार व पंचमहाभूते, ही जी जगातील आठ तत्वे आहेत, ती एकच आहेत. ॥117॥ अर्जुना, एकाच देहामध्ये निरनिराळे (भिन्न आकारांचे) अवयव नाहीत काय? त्याप्रमाणे हे विचित्र विश्व एकच आहे, असे समज. ॥118॥ ज्याप्रमाणे वरच्या, खालच्या व भिन्नभिन्न आकारांच्या अशा वेगवेगळ्या डहाळ्या एकाच बीजाच्या झालेल्या असतात. ॥119॥ आणि आमचा या जगाशी संबंध आहे, पण तो देखील कसा आहे म्हणून म्हणशील, तर मृत्तिकेचे मूल जसा घट, अथवा कापसाचे नातवंड जसे वस्त्रपण आहे ॥120॥ अथवा लाटांची परंपरा ही अशी समुद्राला संतति आहे, तसा आमचा व चराचराचा संबंध आहे. ॥121॥ म्हणून अग्नि व ज्वाळा हे दोन्ही जसे केवळ एक अग्नीच आहे, त्याप्रमाणे मीच सर्व जग आहे व हा सर्व संबंध मिथ्या आहे. ॥122॥ झालेल्या जगाने जर मी झाकला गेलो, तर जगपणाने कोण प्रकाशतो? माणकाच्या तेजाने माणिक लोपले जाते काय? ॥123॥ सोने हे अलंकार दशेला आले असता त्याचे सोनेपण जाते काय? अथवा कमळ उमलले असता कमळत्वाला मुकते काय? ॥124॥ अवयवी हा अवयवांकडून झाकला जातो, की अवयव हेच त्या अवयवीचे रूप आहे? अर्जुना, सांग बाबा. ॥125॥ जोंधळ्याचा कण पेरून, त्याला अंकुर फुटून कणीस परिपक्व झाल्यावर तो पहिला पेरलेला दाणा नाहीसा झाला, का पुष्कळ पटींनी वाढला? ॥126॥ म्हणून जगाचा निरास करून मला पाहावे, तसा मी नाही, तर सर्वांसकट मीच आहे. ॥127॥ हे वीरा (अर्जुना), तू आपल्या अंत:करणात या सिद्धांताचा दृढनिश्चय कर. ॥128॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : प्रवृत्ति पेललें पोट, निवृत्ति ते पाठी नीट


