अध्याय चौदावा
जालेनि विकारक्षोभें । पाठीं त्रिगुणाचें उभें । तेव्हां ये वासनागर्भें । ठायेंठावों ॥94॥ रुखाचा आवांका । जैसी बीजकणिका । जीवीं बांधें उदका । भेटतखेंवो ॥95॥ तैसी माझेनि संगें । अविद्या नाना जगें । आर घेवों लागे । आणियाची ॥96॥ मग गर्भगोळा तया । कैसें रूप तैं ये आया । तें परियेसें राया । सुजनांचिया ॥97॥ पैं मणिज स्वेदज । उद्भिज जारज । उमटती सहज । अवेव हे ॥98॥ व्योमवायुवशें । वाढलेनि गर्भरसें । मणिजु उससे । अवेवु तो ॥99॥ पोटीं सूनि तमरजें । आगळिकां तोय तेजें । उठितां निफजे । स्वेदजु मा ॥100॥ आपपृथ्वीउत्कटें । आणि तमोमात्रें निकृष्टें । स्थावरु उमटे । उद्भिजु हा ॥101॥ पांचां पांचही विरजीं । होती मनबुद्ध्यादि साजीं । हीं हेतु जारजीं । ऐसें जाण ॥102॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : हालविलिया जाये, निश्चळीं तरी होये
अर्थ
पंचभूते, विषय व इंद्रिये ही तयार झाल्यानंतर मागील सूक्ष्म प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या आठ विकारांच्या हालचालींनें, त्रिगुणांचा तयार झालेला हा गर्भपिंड व्यक्त होतो, त्या वेळी वासनेत सूक्ष्म रूपाने राहिलेला जीव जसा असावयास पाहिजे, तसा त्या गर्भपिंडात प्रवेश करतो. ॥94॥ ज्याप्रमाणे बीजाचा दाणा पाणी भेटल्याबरोबर आपल्यामधे वृक्षाचा सूक्ष्म आकार तयार करतो ॥95॥ त्याप्रमाणे माझ्या संगाने अविद्या ही अनेक जगरूपी अणकुचीदार अंकुर घेऊ लागते. ॥96॥ हे सुजनांच्या राजा (अर्जुना), त्या वेळी मग त्या गर्भगोलांचा आकार कसा व्यक्त होतो, ते ऐक. ॥97॥ तेव्हा अंडज, स्वेदज, उद्भिज व जारज असे हे अवयव स्वभावत: उमटतात. ॥98॥ मणिज हा अवयव आकाश व वायु यांच्या योगाने गर्भरस वाढल्याने उत्पन्न होतो. ॥99॥ अरे, तम व रज हे दोन गुण पोटात घालून, आप आणि तेज यांचे अधिक्य झाले असता, स्वेदज हा अवयव उत्पन्न होतो. ॥100॥ आप आणि पृथ्वी यांच्या अधिक्याने आणि केवळ नीच अशा तमोगुणाने स्थावर असा उद्भिज उत्पन्न होतो. ॥101॥ पंचमहाभूते ही सर्वच आपसात सहकारिता करतात आणि मन व बुद्धि इत्यादि ज्ञानसाधने तरतरीत होतात. ही मनुष्यादि जारज योनी उत्पन्न होण्याची कारणे आहेत, असे समज. ॥102॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जैसा रंकु भ्रमला, म्हणे जा रे मी रावो आला


