अध्याय चौदावा
आतां अज्ञानासारिखें । वस्तु आपणपेंचि देखे । परी रूपें अनेकें । नेणों कोणें ॥82॥ जैसा रंकु भ्रमला । म्हणे जा रे मी रावो आला । कां मूर्च्छितु गेला । स्वर्गलोकां ॥83॥ तेवीं लचकलिया दिठी । मग देखणें जें जें उठी । तया नाम सृष्टी । मीचि वियें पैं गा ॥84॥ जैसें कां स्वप्नमोहा । तो एकाकी देखिजे बहुवा । तोचि पाडु आत्मया । स्मरणेंवीण असे ॥85॥ हेंचि आनी भ्रांती । प्रमेय उपलवूं पुढती । परि तूं प्रतीती । याचि घे पां ॥86॥ तरी माझी हे गृहिणी । अनादि तरुणी । अनिर्वाच्यगुणी । अविद्या हे ॥87॥ इये नाहीं हेंचि रूप । ठाणें हें अति उमप । हें निद्रितां समीप । चेतां दुरी ॥88॥ पैं माझेनिचि आंगें । पॉढल्या हे जागे । आणि सत्तासंभोगें । गुर्विणी होय ॥89॥ महद्ब्रह्मउदरीं । प्राकृतीं आठै विकारीं । गर्भाची करी । पेलोवेली ॥90॥ उभयसंगु पहिलें । बुद्धितत्त्व प्रसवलें । बुद्धितत्त्व भारैलें । होय मन ॥91॥ तरुणी ममता मनाची । ते अहंकार तत्त्व रची । तेणें महाभूतांची । अभिव्यक्ति होय ॥92॥ आणि विषयेंद्रियां गोसी । स्वभावें तंव भूतांसी । म्हणोनि येती सरिसीं । तियेंही रूपा ॥93॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : अर्जुना तयापरी, सरली द्वैताची वारी
अर्थ
आता वस्तु (आपण) आपल्यालाच अज्ञानाप्रमाणे (म्हणजे दृश्यत्वाने व नानात्वाने) पाहते, परंतु कोणत्या (किती) अनेक रूपांनी पाहते ते कळत नाही. ॥82॥ जसा एखादा भ्रमिष्ट झालेला दरिद्री मनुष्य म्हणतो की, जा रे, ‘मी राजा आलो आहे’, अथवा जसा एखादा मूर्च्छा आलेला मनुष्य भ्रमाने आपण स्वर्गास गेलो आहोत असे मानतो, ॥83॥ त्याप्रमाणे आत्मस्वरूपावरून दृष्टि घसरल्यावर मग जे जे दृश्य पुढे मांडले जाते, त्याचेच नाव मी सृष्टि प्रसवतो. ॥84॥ ज्याप्रमाणे एकटा निजलेला पुरुष स्वप्नाच्या भ्रमाने अनेक पदार्थरूपाने आपणाला पाहतो, तीच स्थिती आत्म्याची (आपल्या स्वरूपाच्या) स्मरणाचे अभावी होते. ॥85॥ हीच गोष्ट दुसऱ्या प्रकाराने पुन्हा उघड सांगू, परंतु हे सर्व (मी सृष्टीला प्रसवतो वगैरे) स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे, ही दृढ प्रतीती आत ठेऊन तू ऐक.॥86॥ तरी ही अविद्या माझी विवाहित स्त्री आहे ही अनादी आहे, परंतु तारुण्यात आहे व हिच्यामधे जे गुण आहेत ते सांगता येणे शक्य नाही (ती सत्, असत्, विलक्षण, अनिर्वचनीय आहे). ॥87॥ हिला वस्तुत: अस्तित्व नसणे, हेच हिचे स्वरूप आहे. आकाराने किंवा व्याप्तीने ही अमर्याद, अफाट आहे. ही अविद्या (स्वरूपी) निजलेल्यांना जवळ आहे व (स्वरूपी) जागे असलेल्यांना दूर आहे, ॥88॥ परंतु, मी स्वत: झोपलो म्हणजे ही जागृत असते (स्वरूपज्ञानाच्या गैरहजेरीत अविद्येचे व्यवहार चालतात). माझ्या सत्तेचा आश्रय करून ही (ब्रह्मांडे पोटात साठवून) गरोदर होते. ॥89॥ महद्ब्रह्म आपल्या उदरामध्ये प्राकृत आठ विकारांनी जगद्रूप गर्भाची वाढ करते. ॥90॥ उभयतांच्या (माझ्या व मायेच्या) संगात प्रथम बुद्धितत्व जन्मास आले, ते बुद्धितत्व (रजोगुणाने) भारले गेले, म्हणजे मन तयार होते. ॥91॥ मनाची तरुण स्त्री जी ममता, ती अहंकारतत्त्वास तयार करते व त्या योगाने पंचमहाभूते स्पष्ट दशेस येतात. ॥92॥ आणि विषय व इंद्रिये यांचा स्वभावत:च पंचमहाभूतात अंतर्भाव होत असल्यामुळे, विषय व इंद्रिये हीदेखील, त्या भूतांबरोबरच आकारास येतात. ॥93॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : हालविलिया जाये, निश्चळीं तरी होये


