दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तोंडावरच पडलेला एक इसम ओपीडीत आला होता. घसरत गेल्यावर एक प्रकारचं फ्रिक्शन बर्न होतं, अर्थात इजा जळीतासारखी होते. त्यामुळं जखम बरी होणे आणि त्वचा पूर्ववत होणे याला वेळ लागतो, हे त्याला समजावून सांगितलं.
“हातपाय मोडले असते तरी चाललं असतं, पण चेहऱ्याला लागायला नको होतं,” असं त्याचं म्हणणं पडलं. पण “थोडा वेळ जाईल पण नीट काळजी घेतली की, सर्व ठीक होईल” असं त्याला समजावून सांगितले तरी त्याचं फारसं समाधान झालं नाही.
“शेवटी चेहराच फर्स्ट इम्प्रेशन असतो,” या त्याच्या म्हणण्यात तथ्य नव्हतं, असं नव्हे. पण तो गेला आणि इकडं मला प्रकर्षानं अमेरिकन सैनिक रिचर्डची आठवण झाली..
साल 1997 असावं. अमेरिकेच्या एका सैनिकी तळावर सकाळचे सूर्यकिरण नुकतेच धुरकट आकाश भेदत होते… रिचर्ड ली नॉरिस नावाचा एक तरुण, निरागस चेहरा, स्वप्नांनी भरलेले डोळे आणि आयुष्यभर पुढं जाण्याची जिद्द… पण एका साध्या चुकलेल्या ट्रिगरनं त्याचं आयुष्य दोन तुकड्यांत विभागलं गेलं!
एक भीषण अपघात… एका स्फोटाचा आवाज… आणि पुढच्याच क्षणी रिचर्डचा चेहरा जवळजवळ पूर्णपणे नष्ट झाला. गाल, ओठ, दात, नाक, जबडा या सगळ्यांचा गोळ्या आणि धातूंच्या कणांनी विद्ध्वंस केला, तरीही तो वाचला; पण जवळपास चेहऱ्याशिवाय! पुढे त्याच्यावर 7 वर्षांत 12 हून अधिक शस्त्रक्रिया झाल्या. यात स्कीन ड्राफ्टिंगसह इतरही उपचार करण्यात आले. मात्र, तरीही त्याला बोलणं कठीण झालं होतं, खाणं जवळजवळ अशक्य होतं, आणि सामाजिक जीवन? ते तर पूर्णपणे हरवलं होतं…
हेही वाचा – लिओनिद रोगोजोव्ह… स्वत:वरच ऑपरेशन करणारा डॉक्टर
रिचर्ड घराबाहेर पडायला घाबरू लागला. त्यानं स्वतःचा चेहरा आरशात बघणंही बंद केलं. या काळातच फेस ट्रान्सप्लांट क्षेत्रातील जगप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. एडुआर्डो रोड्रिग्वेझ हे त्याच्यासाठी एक आशेचा किरण घेऊन आले. त्यांनी सांगितलं, “तुला नवीन चेहरा देणं शक्य आहे. पूर्ण चेहरा… ओठ, नाक, जबडा, त्वचा आणि अगदी सगळ्या स्नायूंसकट.”
ही त्या काळातील तोपर्यंतची सर्वात क्लिष्ट पुनर्गठन शस्त्रक्रिया होती आणि त्यात जोखीम किती होती? तर प्रचंड. इम्युनोसप्रेसंट औषधांचा आयुष्यभराचा बोजा, नकारात्मक परिणामांचा धोका… पण तरीही रिचर्डनं होकार दिला, कारण त्याचं चेहऱ्याशिवायचं आयुष्य म्हणजे तसंही आयुष्य नव्हतंच.
2012 च्या मार्च महिन्यातील एक दिवस. 30 पेक्षा अधिक सर्जन्स, नर्सेस आणि ॲनेस्थेटिस्ट्सचा चमू सज्ज झाला. एक सोडून दोन ऑपरेशन थिएटर्स रेडी ठेवण्यात आली, शेकडो मायक्रोव्हॅस्क्युलर कनेक्शन्स, नसांचे मिलिमीटर-स्तरावर शिवणकार्य… मोठंच काम होतं ते!
हेही वाचा – जगातली पहिली यशस्वी ॲपेंडिसेक्टॉमी…
डोनरचा अर्थाच ब्रेनडेड झालेल्या एका तरुणाचा चेहरा रिचर्डला देण्यात आला; फक्त त्वचा नव्हे, तर संपूर्ण नाक, संपूर्ण ओठ आणि त्यांच्या सूक्ष्म स्नायूंसह, जवळपास संपूर्ण चेहऱ्याचा मधला भाग, जीभेचा काही भाग आणि खालचा जबडा… असं सगळंच देण्यात आलं.
ही त्या काळातील जगातील सर्वात मोठी फेस ट्रान्सप्लांट सर्जरी मानली गेली. जेव्हा रिचर्डला शुद्ध आली तेव्हा डॉ. रोड्रिग्वेझ शांत आवाजात म्हणाले, “तुझं नवं आयुष्य सुरू झालंय.”
आरशासमोर त्याला जेव्हा आणलं, तेव्हा रिचर्ड प्रथमच न बोलता फक्त हसला, इतक्या वर्षांनी त्याला स्वतःचं हसू जाणवत होतं, हळूहळू तो बोलू लागला, पाण्याचा घोट घेऊ शकला… त्याच्या श्वासाचे आवाज कमी झाले, चेहऱ्यावरचे भाव पुनश्च जागे झाले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तो पुन्हा रस्त्यानं चालू लागला, लोकांसमोर आला अगदी आत्मविश्वासानं!
आज रिचर्ड ली नॉरिस हा जगातील सर्वाधिक काळ यशस्वीपणे जगलेला, पूर्ण-फेस ट्रान्सप्लांट झालेला पेशंट म्हणून ओळखला जातो. या प्रकरणामुळं वैद्यकीय जगात अधिक सुरक्षित इम्युनोसप्रेसंट प्रोटोकॉल आले, नर्व्ह री-जनरेशनसाठी नवीन तंत्र आलं, मायक्रोव्हॅस्क्युलर टेक्निक्स सुधारल्या, बायोइंजिनीअरिंगमध्ये मानवी चेहऱ्याच्या प्रत्यारोपणाचं मॉडेल तयार झालं. ही केस वैद्यकशास्त्रासाठी मैलाचा दगड ठरली!


