अध्याय चौदावा
इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः । सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च ॥2॥
जे माझिया नित्यता । तेणें नित्य ते पंडुसुता । परिपूर्ण पूर्णता । माझियाची ॥52॥ मी जैसा अनंतानंदु । जैसाचि सत्यसिंधु । तैसेचि ते भेदु । उरेचि ना ॥53॥ जें मी जेवढें जैसें । तेंचि ते जाले तैसें । घटभंगीं घटाकाशें । आकाश जेवीं ॥54॥ नातरीं दीपमूळकीं । दीपशिखा अनेकीं । मीनलिया अवलोकीं । होय जैसें ॥55॥ अर्जुना तयापरी । सरली द्वैताची वारी । नांदो नामार्थ एकाहारीं । मीतूंविण ॥56॥ येणेंचि पैं कारणें । जैं पहिलें सृष्टीचें जुंपणें । तैं ही तया होणें । पडेचिना ॥57॥ सृष्टीचिये सर्वादी । जेयां देहाची नाहीं बांधी । ते कैचें प्रळयावधी । निमतील पां ॥58॥ म्हणौनि जन्मक्षयां- । अतीत ते धनंजया । मी जालें ज्ञान यया । अनुसरोनी ॥59॥ ऐसी ज्ञानाची वाढी । वानिली देवें आवडी । तेवींचि पार्थाही गोडी । लावावया ॥60॥ तंव तया जालें आन । सर्वांगीं निघाले कान । सपाई अवधान । आतला पां ॥61॥ आतां देवाचिया ऐसें । जाकळीजतु असे वोरसें । म्हणोनि निरूपण आकाशें । वेंटाळेना ॥62॥ मग म्हणे गा प्रज्ञाकांता । उजवली आजि वक्तृत्वता । जे बोलायेवढा श्रोता । जोडलासी ॥63॥ तरि एकु मी अनेकीं । गोंविजे देहपाशकीं । त्रिगुणीं लुब्धकीं । कोणी परी ॥64॥ कैसा क्षेत्रयोगें । वियें इयें जगें । तें परिस सांगें । कोणे परी ॥65॥ पैं क्षेत्र येणें व्याजें । हें यालागीं बोलिजे । जे मत्संगबीजें । भूतीं पिके ॥66॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : गुण ते कैसे किती, बांधती कवणे रीती
अर्थ
या ज्ञानाचा आश्रय करून माझ्यासमान झालेले (मद् रूपतेला प्राप्त झालेले) सृष्टि निर्माणकाली जन्म पावत नाहीत आणि प्रलयकाली दु:ख (मरण) पावत नाहीत. ॥2॥
अर्जुना, जी माझी नित्यता आहे, त्या नित्यतेने ते (पुरुष) नित्य आहेत व माझ्याच परिपूर्णतेने ते परिपूर्ण आहेत. ॥52॥ मी जसा अमर्याद आनंद आहे व जसा मी सत्याचा समुद्र आहे, तसेच ते आहेत. (त्यांच्यात व माझ्यात) भेद शिल्लक राहातच नाही. ॥53॥ कारण की, मी जसा व जेवढा आहे तसेच व तेवढे ते (ज्ञानाच्या योगाने) झालेले असतात. (कसे तर) ज्याप्रमाणे घट फुटल्यावर घटाकाश जसे महाकाश होते ॥54॥ अथवा दिव्याच्या मूळ ज्योतीत दुसर्या अनेक ज्योती मिळाल्या असता जसे होते, (जशा त्या सर्व ज्योती एकरूप होऊन जातात) त्याप्रमाणे समज. ॥55॥ अर्जुना, त्याप्रमाणे त्या पुरुषाच्या ठिकाणी द्वैताची येरझार संपली व (आता) तो व मी असे दोघे, देव व भक्त या दोघांच्या नामांचा अर्थ जे स्वरूप, त्या स्वरूपाच्या ठिकाणी एका पंक्तीला (ऐक्याने) मी व तू अशा द्वैतभावाशिवाय नांदत आहोत. ॥56॥ या कारणामुळे जेव्हा मूळ सृष्टि उत्पन्न होते, तेव्हाही त्यास जन्मास यावे लागत नाही. ॥57॥ सर्व सृष्टीच्या आरंभी ज्यांना देहाचा आकार घ्यावा लागत नाही ते (आत्मज्ञानी पुरुष) प्रलयकालच्या वेळेस कसे मरण पावतील? ॥58॥ अर्जुना, म्हणून ते पुरुष या ज्ञानाचा मार्ग स्वीकारून जन्मक्षयातीत असे मदरूप झाले. ॥59॥ असा ज्ञानाचा महिमा वर्णन करणे देवास प्रिय असल्यामुळे व त्याचप्रमाणे अर्जुनालाही गोडी लावण्याकरिता म्हणून देवांनी या प्रमाणे ज्ञानाचा महिमा वर्णन केला. ॥60॥ (असे भगवंतांनी ज्ञानाचे महत्त्व वर्णन केले) तेव्हा अर्जुनाची वेगळी स्थिती झाली. ती ही की त्याच्या सर्व अंगाला कान फुटले. फार काय सांगावे! तो अवधानाची मूर्तीच बनला. ॥61॥ अर्जुन सर्व अंगाने अवधानरूप झाला, तेव्हा देवासारख्या सर्वज्ञाकडून केले जाणारे अफाट व्याख्यान त्याच्याकडून आकलन केले जात होते आणि (आपण जे सांगतो त्याचा उपयोग होत आहे, असे देवाने जाणले). म्हणून देवाचे व्याख्यान आकाशाच्याही कवळीत येणार नाही, एवढे विस्तृत होऊ लागले. ॥62॥ मग श्रीकृष्ण म्हणाले, हे बुद्धिरूप स्त्रीच्या पति अर्जुना, आमचे जेवढे व्याख्यान, तेवढेच अवधान असणारा तू श्रोता मिळाल्यामुळे, आज आमची वक्तृत्वरूपी कन्या विवाहित झाली. (कारण तिला तुझ्यासारखे योग्य स्थळ मिळाले). ॥63॥ तरी मी एक (असून) त्रिगुणरूपी पारध्याकडून अनेक देहपाशात कोणत्या प्रकाराने अडकला जातो ॥64॥ व (मी) क्षेत्राच्या संगाने ही जगे कोणत्या प्रकाराने व कसा प्रसवतो ते सांगतो, ऐक. ॥65॥ माझ्या संगरूपी बीजाने यात (अज्ञानात) प्राणीरूपी पीक येते, याच कारणामुळे याचा (अज्ञानाचा) क्षेत्र या नावाने उल्लेख केला जातो. ॥66॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : अनादि जे मुक्तता, आपुली असे पंडुसुता


