अध्याय चौदावा
तैसी बोली साचारी । अवतरो माझी माधुरी । माले मागूनि घरीं । गुरुकृपेचां ॥31॥ तरी मागां त्रयोदशीं । अध्यायीं गोष्टि ऐसी । श्रीकृष्णु अर्जुनेंसी । चावळले ॥32॥ जे क्षेत्रक्षेत्रज्ञयोगें । होईजे येणें जगें । आत्मा गुणसंगें । संसारिया ॥33॥ आणि हाचि प्रकृतिगतु । सुखदुःखभोगीं हेतु । अथवा गुणातीतु । केवळु हा ॥34॥ तरी कैसा पां असंगा संगु । कोण तो क्षेत्रक्षेत्रज्ञयोगु । सुखदुःखादि भोगु । केवीं तया ॥35॥ गुण ते कैसे किती । बांधती कवणे रीती । नातरी गुणातीतीं । चिन्हें काई ॥36॥ एवं यया आघवेया । अर्था रूप करावया । विषो एथ चौदाविया । अध्यायासी ॥37॥ तरि तो आतां ऐसा । प्रस्तुत परियेसा । अभिप्रावो विश्वेशा । वैकुंठाचा ॥38॥ तो म्हणे गा अर्जुना । अवधानाची सर्व सेना । मेळौनि इया ज्ञाना । झोंबावें हो ॥39॥ आम्हीं मागां तुज बहुतीं । दाविलें हें उपपत्ती । तरी आझुनी प्रतीती- । कुशीं न निघे ॥40॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जी एकार्णवाचां ठाईं, पाहतां थेंबाचा पाडु नाहीं
अर्थ
श्रीगुरूंच्या कृपेच्या घरात कर्जफेडीची भिक्षा मागून त्यामुळे माझ्या भाषणात त्या प्रकारची खरी खरी गोडी प्रगट होवो. ॥31॥ तर मागे तेराव्या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनास अशी गोष्ट सांगितली-. ॥32॥ की, हे जग क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संबंधात उत्पन्न होते व आत्मा हा गुणसंबंधाने संसारी झाला आहे. ॥33॥ आणि हा (आत्माच) प्रकृतीच्या तावडीत स्वाधीन झाल्याकारणाने सुखदु:ख भोगण्यास कारण होतो. (त्यास सुखदु:खाचा भोग होतो). एरवी खरोखर पाहिले तर, हा केवळ गुणातीतच आहे. ॥34॥ तर असंगाला संग कसा (झाला) व क्षेत्रक्षेत्रज्ञ यामधील संबंध तो कोणता? व त्याला सुखदु:खादि भोग कसे (प्राप्त होतात?) ॥35॥ गुण ते कसे व किती आहेत व ते (आत्म्याला) कोणत्या प्रकाराने बांधतात अथवा गुणातीताची लक्षणे काय आहेत? ॥36॥ याप्रमाणे या सर्व गोष्टींचा अर्थ स्पष्ट सांगणे, हा येथे चौदाव्या अधायाचा प्रतिपाद्य विषय आहे, ॥37॥ तर जगाचा स्वामी जो श्रीकृष्ण, त्याचा प्रस्तुत अभिप्राय आहे, तो आता ऐका. ॥38॥ श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, अवधानरूपी सर्व सेना एकत्र जुळवून आणून या ज्ञानास झोंबावे बरे! ॥39॥ आम्ही मागे तुला पुष्कळ प्रकारच्या युक्तिवादांनी हा विचार समजावून सांगितला आहे. परंतु अजून तुझी अनुभवाची कूस भरून आलेली दिसत नाही. ॥40॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : प्रमेयमहापूरें, मतिगंगा ये थोरें


