मधूची घाई झाली होती. आज रात्री दहा पर्यटक यायचे होते. आबांनी त्याला बोलावून सांगितले होते, “राती धा लोका येतत, तीन जोडपी आसत… बाकी चार कॉमनमध्ये. सगळे रूम तयार ठेव, लादी पुसान घे. संडास साफ करून ठेव, गादी झाडून ठेव, नवीन चादरी आणून ठेव कपाटातले… बाथरुमात पाणी येता काय, नाय बघ…. नवीन साबण ठेव!”
एक नाय दोन… कामेच कामे.
या पर्यटन लॉजमध्ये मधू एकटाच सर्व पहाणारा. मालक आबा नुसत्या ऑर्डरी सोडणार आणि कामे झाली नाहीत तर, शिव्या देणार. आबांची बायको – बाई, मधे मधे ती बोलवणार, ‘दुकानातून हे आणून दे…’, ‘ते याला पोचव.’ मधूला पाच वाजता शाळेच्या बाजूला जायचे असते, कारण यावेळी शाळा सुटते. युनिफॉर्म घातलेले मुले-मुली त्याला पाहायच्या असतात. शर्ट इन करून, पायात बूट नाहीतर चप्पल घालून घराकडे धावत जाणारी मुले आणि निळा स्कर्ट, पांढरा पोलका आणि कमरेला पट्टा बांधून बूट नाहीतर चप्पल घालून रमतगमत गप्पा मारत घराकडे निघालेल्या मुली… तो डोळे फाडून फाडून पहात असे. आपल्या नशिबात शाळा नाही… शाळा नाही म्हणजे दप्तरं नाही…. शाळेचे कपडे नाहीत… बूट नाहीत… शाळेतून घरी जाणारी मुले पाहिली की, त्याला आपण शाळेत गेल्यासारखे वाटे.
आज अचानक पर्यटक येणार म्हणजे त्यांची सोय पाहता पाहता आपल्याला उशीर होणार म्हणजे शाळेकडे जाता येणार नाही, याचे त्याला वाईट वाटले. शाळेतून घरी जाणाऱ्या मुलांत एक प्रमोद नावाचा मुलगा त्याच्या ओळखीचा झाला होता. मधू रोज प्रमोदला भेटत होता आणि त्याच्या कपड्यांकडे आणि बुटाकडे डोळे फाडून पहात असे.
मधूने झटपट काम संपवले आणि बाईंना ओरडून सांगितले, “आबांनी सांगलेली सगळी कामा केलंय, आता शाळेकडे जाऊन येतंय…”
बाईंना माहीत होते, या मुलाला शाळेत जायचंय, अभ्यास करायचाय… पण आपल्या या घरात सतत कामे आणि धावपळ… त्यात आता पर्यटन लॉज सुरू केलाय आबांनी, त्याचा व्याप. रोज पर्यटक येत असतात – मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर… कुठून कुठून.
मधूने मालतीताईची सायकल बाहेर काढली आणि पॅडल मारत मारत तो शाळेच्या दिशेने जोरात निघाला. आज त्याला उशीरच झाला, कारण शाळा सुटली होती आणि मुले घरी पोहोचली पण होती. मधूला चुकल्या चुकल्यासारखे वाटलं… निराश मनाने मधू घरी आला. मालतीताई बाहेरच बसली होती. त्याला पहाताच ती म्हणाली,
“खय गेल्लं रे?”
“शाळेकडे?”
“रोज शाळेकडे जाऊन तुका काय समाधान वाटता?”
मधू गप्प बसला आणि सायकल माटवाच्या खुटीला लाऊन लॉजमध्ये गेला. बाई पदराला हात पुसत बाहेर आली आणि मालतीला म्हणाली,
“मधू इलो काय? तेका सांग रूम साफ करून ठेव नायतर आबा गाळी घालतले.”
“गेलो आत… पण बाई, मधूक शाळेत जाऊची… अभ्यास करुची इच्छा आसा. म्हणून तो शाळेकडे घिरटे घालता… तेका घाला ना शाळेत! तेका शिकादे… माका कसा शाळेत घातलात…”
“अगो तू आमचा चेडू माली… तू नाय शिकलंस तर तुका चाकरमानी घो कसो गावतलो? मधू…”
बाईच्या डोळ्यासमोर आले… तिचं लग्न झालं आबांशी, तेव्हा समोरच्या मांगरात जन्या रहात होता. म्हणजे तो मांगर आबांचाच, पण तिकडे सहयाद्रीपट्ट्यातून जन्या फिरत फिरत खलाटीत आला आणि आबांची कामे करताकरता कायमचाच आबांकडे राहिला. आबांची पण खूप कामे असत… तीनशे माड होते. देवबागच्या हवेत आणि माशांचे कूट घातल्यामुळे माड खूप नारळ देत.
हेही वाचा – दोन स्पेशल
जन्या माडावर चढायला शिकला. नारळ काढणे, नारळ सोलणे, माडाना पाणी लावणे, माशांचे कूट घालणे, चूडते वळणे… सारी कामे जन्या करू लागला. आबांनी जन्याचे लग्न करून दिले आणि पार्वती त्या मांगरात आली. आबांना आणखी एक काम करायला बाई मिळाली! ती बागेतील कचरा गोळा करत असे, त्याला आग लावत असे… शिवाय, घरातील भांडी-कपडे… बाईंना मदत होऊ लागली. आबा, बाई यांची कन्या मालती… तिला न्हाऊ घालणे, शाळेत पोहोचवणे… सारेच पार्वती करत होती.
दोन वर्षे झाली आणि पार्वती गरोदर राहिली, पण ती काम करतच होती. सातव्या महिन्यात तिला प्रसूतीवेदना सुरू झाल्या… धावपळ करत आबांनी तिला मालवणच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नेले… मुलगा वाचला आणि पण पार्वती गेली. तो जन्या-पार्वतीचा मुलगा मधू.
समज येत होती, तेव्हापासून मधू या घरात वावरत होता… बाई त्याला पेज वाढायची. जन्याबरोबर जेवण वाढायची. तो लहानपणापासून आबांची मुलगी मालतीच्या आजूबाजूला असायचा.
आजूबाजूची मुले शाळेत जायची, तेव्हा मधूला त्यांचा हेवा वाटायचा. मुले-मुली शाळेचा युनिफॉर्म घालून दप्तर घेऊन शाळेत जाताना तो एकटक पहात राहायचा, मग बाईंनी दुकानात पाठविले की, वाटेत दिसणाऱ्या शाळेकडे पहात राहायचा…
बाईला कळत होते, याला शाळेची ओढ आहे, पण आबा त्याला शाळेत घालायचे बोलत नव्हते आणि मधूचा बाबा जन्या म्हणजे नुसता बैल होता… त्याला शाळा, शिक्षण हे काय असतं, हे माहीत नसायचं. फक्त मालकांनी म्हणजे आबांनी सांगितलेले काम करणे एवढेच!
मधू सहा वर्षाचा होता, तेव्हा जन्या माडावरून पडून मरण पावला आणि मधूला फक्त आबांच्याच घराचा आसरा राहिला. आबांची कन्या मालती मालवणच्या कॉलेजमधून ग्रॅज्युएट झाली आणि नोकरीसाठी अर्ज करू लागली.
कोकणात पर्यटन हा व्यवसाय अंग धरू लागला होता… देवबाग तारकर्ली भागात अनेक लोकांनी छोटी छोटी पर्यटन हॉटेल्स सुरू केली आणि भरघोस पर्यटक येऊ लागले. आबांची नदी आणि समुद्राच्या संगमाजवळ जागा होती, त्या ठिकाणी त्यांनी दहा खोल्यांचे लॉज सुरू केले आणि पहिल्या दिवसापासून पर्यटक गर्दी करू लागले. त्यांना जेवण, नाश्ता वगैरे घरातून बाई आणि मालती करून देऊ लागली… छोटा मधू त्यांच्या हाताखाली मिळाला.
पण मधूला एक मिनिट विश्रांती मिळेना… लॉजची साफसफाई आबांनी त्याच्यावर टाकली. शिवाय, चादरी-बेडशीट्स धुणे, घरात समान आणून देणे… पर्यटकांना जेवण पोहोचवणे, त्यांना सिगरेट, दारू, सोडा आणून देणे सर्वच मधूची कामं.
वेळ असे तेव्हा मधू मालतीबरोबर गप्पा मारी, तिला मनातले सांगे. रोजच्या प्रमाणे तो शाळेच्या रस्त्यावर जाऊन आला आणि मालतीला म्हणाला, “ताई, माका शाळेत जावचा आसा… ग म भ न शिकाचा आसा.. आबानका सांग माझा नाव शाळेत घालूक…”
“मी आबंका सांगून दमलंय रे! आबांचे व्याप खूप… त्याच्यात तुझ्यासारखो पोरगो हाताखाली गावलो, मग ते तुझा नाव शाळेत घालूचे नाय. पण माजा लग्न झाला की, मी तुका माज्या घरच्या गावात नेन आणि तुजा नाव शाळेत घालीन!”
“पण ताई, तुजा लगीन केवा होतला?”
“माका बघूक येवचे आसत पुण्यासून रविवारी… मग मी पुण्याक गेलंय की, तुका बरोबर न्हेतंय आणि तुजा नाव शाळेत घालतंय.”
“ताई, यां निश्चित ना?”
“निश्चित!”
मधू खूष झाला. आता त्याला समजले, शाळेत जायचे असेल तर, हे घर सोडायला हवे. या घरात राहून शाळेत जायची आणि ग म भ न शिकायची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही.
रविवारी पुण्याहून पाहुणे मालतीला पहायला आले आणि लग्न निश्चित करून गेले. मग आबा, बाईची धावपळ सुरू झाली आणि मधूचे काम दुप्पट वाढले.
मालतीताईने लग्नानंतर पुण्याला सोबत नेण्याचा आणि शाळेत नाव घालण्याचा शब्द दिला म्हणून मधू हवेत होता. रोज दुपारी तो मित्रांसोबत संगमावर पोहायला जायचा. देवबागचा हा संगम म्हणजे कर्ली खाडी आणि अरबी समुद्र यांच्या पाण्याचा संगम. तुफान भरलेली कर्ली खाडी समुद्रात घुसायची आणि एक भोवरा तयार व्हायचा. मधू त्या भोवऱ्यात एका वाकलेल्या माडावरुन उडी मारायचा. आज भोवऱ्यातून वर येताना, त्याच्या मनात पुण्याला जायचे आणि ग म भ न शिकायचे विचार होते.
मालवणच्या जानकी मंगल कार्यालयात मालतीताईचे लग्न झाले. मधूला वाटतं होते, ताई म्हणेल, ‘मधू, तू चल माझ्याबरोबर,’ म्हणून तो ताईच्या मागेमागे होता. पण ताई शेवटपर्यंत काही बोललीच नाही.
ताई पुण्याला गेली. मधूला वाटे ताई बाईला फोन करून सांगेल, ‘मधूला माझ्याकडे पाठवा कुणाबरोबर तरी.’
पण ताई काही म्हणालीच नाही. मग ताई एक महिन्यानंतर माहेरी आली, तेव्हा म्हणाली, “अरे, आमचा पुण्याचा घर लहान आसा… आता मोठो ब्लॉक बुक केलोवा, तिकडे गेलोव की, तुका न्हेतय.”
मधू खट्टू झाला. रोज शाळा सुटताना, शाळेच्या रस्त्यावर धावत होता… मुला-मुलींना पाहून खूश होत होता.
मग मालतीताई माहेरी आली, ती प्रेग्नंट होती… आता सहा महिने देवबागला रहाणार. म्हणजे यावर्षी पण शाळेत नाही! मालतीताई त्याला म्हणाली, “तुका पुण्यात न्हेवची आणि शाळेत घालूची इच्छा होती रे मधु, पण आमच्या घराचा काम काय होणा नाय. घरात आठ माणसा… त्यात आता माझ्या बाळाची भर. इंचभर जागा नाय…”
मधू पुन्हा उदास झाला. आता दुसरा मार्ग पहायला हवा, हे त्याच्या लक्षात आले. त्यांच्या पर्यटक केंद्रात अनेक पर्यटक येत, त्यांना तो सांगू लागला – “माका हयसून घेऊन जावा.. मी तुमच्या घरची कामा करीन, पण माका शाळेत घाला… माका ग म भ न शिकाचा आसा.”
पर्यटकांना फुकट कामाला पोरगा हवा होता, पण शाळेत घालायला कोणीही तयार नव्हता.
एक दिवस गद्रे नावाचे नवरा-बायको पर्यटक म्हणून आले. मधूला ती जोडी प्रेमळ वाटली, त्याने त्यांना उत्तम सर्व्हिस दिली. वेळेत गरम पाणी दिलं, शहाळी फोडून दिली. काजूगर आणून दिले. त्या गद्रे काकांना पण त्याने सांगितले, “माका तुमच्याकडे घेऊन जावा… मी सगळा काम करीन घरातला, फक्त माका शाळेत घाला, माका शिकूचा आसा.”
गद्रे म्हणाले, ठहो, ये तू आमच्याबरोबर, आम्ही उद्या जाणारं… उद्या दुपारी एकची ट्रेन आहे कुडाळहून. दहा वाजता होडी मिळेल ना पलीकडे जायला?”
“होय, दोन होड्या आसत नदीवर… अर्ध्या तासान सोडतात… मिळतली. मी बाईक सांगतंय आणि येतंय तुमच्याबरोबर.”
मधू बाहेर गेल्यानंतर बायको नवऱ्याला म्हणाली, “कशाला चेष्टा करतोस गरीबाची. आपण नेऊ शकतो काय त्याला आणि शाळेत…”
“कुठली शाळा आणि कुठलं काय? ही खेड्यातली मुलं शिकतात काय? आणि त्याचं वय काय, सात आठ वर्षे तरी असेल आणि त्याचा मालक त्याला सोडेल काय? मी त्याची फिरकी घेतली…” आणि गद्रे मोठ्याने हसला.
मधू खूप आनंदात होता.. त्याने आज माडावरून भोवऱ्यात खोल उडी मारली आणि मनसोक्त पोहोला. त्याच्या संवगड्याना त्याने सांगितले, “मी शाळेत जातंय मुंबईच्या. उद्या मी चललंय.”
त्याच्या सर्व सवंगगड्यानी त्याचा हेवा केला.
आबा कोल्हापूरला गेलेले. त्याने बाईला सांगितले. बाईला वाईट वाटले, पण तिला माहीत होते, या गावात त्याचे शिक्षण होणार नाही, आबा त्याला राबवून घेणार. माईंनी त्याला एक हजार रुपये दिले आणि सांगितले, “जा.. शिक्षण घे. पण काय सोय झाली नाय, तर तुझा घर समजान हय ये. ह्या घर तुझाच आसा असा समज.”
मधूला रात्रभर झोप आली नाही. या कुशीवरून त्या कुशीवर… त्याला मुंबईचे वेध लागले होते.
सकाळी लवकर उठून त्याने बाईला नमस्कर केला आणि नदीचा तीर गाठला. नदीच्या तीरावर प्रवासी जमले होते, त्यांना पलीकडे जायचे होते. कुणाला परुळ्याला, कुणाला वेंगुर्ल्याला, कुणाला कुडाळला…
मधू गद्रे दाम्पत्याची वाट पहात होता. दहाची होडी भरत आली होती, एवढ्यात गद्रे दाम्पत्य धावत धावत आले आणि होडीत चढले. ती दोघ होडीत चढली, हे पाहून मधू पण होडीत चढला आणि होडी भरली म्हणून नावाड्याने होडी सोडली.
मधू होडीच्या टोकाला बसला होता, नावाडी त्याच्या बाजूलाच होता. मधू हळूच गद्रेकडे पहात होता. त्यांनी पाहिल्यावर तो हळूच हसणार होता आणि आपण होडीत आहोत, असे सांगणार होता. होडी मध्यावर आली आणि गद्रेचे मधूकडे लक्ष गेले. मधु हसला… गद्रे म्हणाले,
“कुठे निघालास?”
“तुमच्याबरोबर… मुंबईक!”
“अरे, मी गंम्मत केली तुझी. तुला खरं वाटलं काय?”
गद्रेची बायको म्हणाली “अरे, आम्ही दोघ नोकरी करणारे, घरात कोणी नाही. तुला कसं नेणार आम्ही? आणि शाळेत कसं घालणार?”
मधू रडायला लागला. त्याने बाईला सांगून घर सोडल होतं. मधूला वाटायला लागलं, या नदीत उडी मारावी आणि जीव द्यावा!
होडी पलीकडच्या किनाऱ्याला लागली. कुडाळ आणि वेगुर्ला बस उभ्याच होत्या, प्रवाशांना नेण्यासाठी. प्रवासी झटपट उतरले, फक्त मधू सोडून. तो बसून राहिला. गद्रे उतरला, मधूजवळ आला आणि खिशातून पाचशेची नोट काढली आणि मधूच्या हातात कोंबली. मधूने लगेच ती नोट गद्रेंना परत केली. त्याच्याकडे एक कटाक्ष टाकून गद्रे जोडी कुडाळ गाडीच्या दिशेने निघाली…
होडीवाला नावाडी मघापासून मधूकडे पहात होता. त्या माणसाने दिलेले पाचशे रुपये या मुलाने परत केले… मघापासून हा मुलगा रडतो आहे, हे त्याने पाहिले.
होडी आता परत निघाली होती. होडीत तीन प्रवासी चढले… बाकी मधू आणि नावाडी.
नावाडी मधूला म्हणाला, “काय झाला तुजा? तू कित्या रडतंस? माका सगळा सांग.”
मधु म्हणाला “हे गद्रे, आबांच्या लॉजमध्ये रवलेले, मी तेंका सांगलंय, माका शाळेत घाला. मी तुमच्या घरची सगळी कामा करीन. तेनी होय म्हटला आणि आता नाय म्हणाले.”
“तू शाळेत जानस नाय? आणि तुझे आऊस बापूस?”
मधूने रडतरडत सगळी कहाणी सांगितली – “आबा सगळी कामा सांगतात, पण शाळेत घालणात नाय. मालतीताईनं सुद्धा पुण्याक नेऊन शाळेत घालतंय म्हणून सांगितल्यानं, पण तेना पण नाय म्हटल्यानं. या गद्रेनी पण फसवल्यानं.”
तो नावाडी सर्व ऐकत होता. मधूचे बोलणे संपल्यावर तो म्हणाला,
“बाळा, तू रडा नको. तुका शाळेतच जावचा आसा ना! अरे चल माझ्याबरोबर, तुझ्या एवढोच माझो झील आसा… मी काय श्रीमंत नाय. या होडीर माजा पोट…. पण दोन येळा जेवतंव मजेत. मी तारकर्लेक रवतंय… स्वतःचा घर आसा.”
मधूने डोळे पुसले.
“खराच माका शाळेत घालतलास?”
“अरे, मी काय मुंबईचो गद्रे वाटलंय की काय? रोज दहा वेळा ही खाडी ओलांडून पलीकडे जातंय… सकाळी उठल्या उठल्या रामेश्वराच्या देवळात जातंय. चल माज्याबरोबर…”
हेही वाचा – हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!
होडी पलीकडे लावून नावाडी मधूचा हात पकडून त्याला आपल्या घरी घेऊन गेला. बायको मुलाला त्याने ओरडून सांगितले, “हो बघ, खाडीत मोठो प्राणी गावलो. आजपासून हो प्राणी हयाच रावटलो, रमेशबरोबर.”
मधू घाबरत घाबरत पुढे गेला. नावाड्याची बायको पुढे झाली आणि तिने मधूला जवळ घेतले. त्याचा हात धरून ती म्हणाली “चल, पेज खाऊक ये.”
जूनमध्ये रमेशबरोबर मधू शाळेत जाऊ लागला आणि पाटीवर लिहू लागला,
‘ग म भ न…’


