होमिओपॅथीचा जन्म कसा झाला, तिच्यामागे कोणते वैद्यकीय आणि तात्त्विक विचार होते, हा स्वतंत्र आणि सखोल अभ्यासाचा विषय आहे. तो आपण पुढे कधीतरी पाहू. आजची आपली गोष्ट भारतापुरती ठेवूया. भारतातील होमिओपॅथीच्या इतिहासात सर्वप्रथम एक विलक्षण नाव समोर येते — डॉ. जॉन मार्टिन होनिगबर्गर. होनिगबर्गर हे ट्रान्सिल्व्हेनियातून आलेले वैद्य आणि प्रवासी होते. युरोप, मध्य-पूर्व आणि आशियातून प्रवास करत त्यांनी भारत गाठला. पंजाबमध्ये त्यांनी अनेक वर्षे काम केले आणि त्यांचा संबंध महाराजा रणजितसिंह यांच्या दरबाराशी आला.
1839मध्ये होनिगबर्गर पुन्हा लाहोरला आले. त्या काळात त्यांनी महाराजा रणजितसिंह यांच्यावर होमिओपॅथिक औषधाने उपचार केले. भारतीय होमिओपॅथीच्या इतिहासात हा प्रसंग महत्त्वाचा मानला जातो.
पण भारतातील होमिओपॅथीची खरी विलक्षण कहाणी पुढे घडते — कलकत्त्यात. होमिओपॅथीचा जन्म जर्मनीत झाला असला, तरी होमिओपॅथीची ‘काशी’ कोणती, असा प्रश्न मला विचारला तर, माझे उत्तर असेल, कलकत्ता!
कलकत्त्यातील आणि बंगालमधील अनेक पिढ्यांनी होमिओपॅथी केवळ स्वीकारली नाही, तर तिला वाढवले आणि सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवून जिवंत ठेवले. पुढे शिक्षणसंस्था, दवाखाने आणि रुग्णालये उभी राहिली. आजचे National Institute of Homoeopathy ही त्याच प्रदीर्घ परंपरेची पुढची कडी आहे.
या कलकत्त्याच्या कहाणीतील एक अत्यंत महत्त्वाचे नाव म्हणजे — बाबू राजेंद्रलाल दत्त! राजेंद्रलाल दत्त डॉक्टर नव्हते. ते एका संपन्न व्यापारी कुटुंबातून आलेले गृहस्थ होते. पण होमिओपॅथीवरील त्यांचा विश्वास आणि तिच्या प्रसारासाठी त्यांनी केलेले कार्य इतके मोठे होते की, पुढे त्यांना ‘Father of Indian Homoeopathy’ —भारतीय होमिओपॅथीचे जनक – असे संबोधले गेले.
हेही वाचा – Homeopathy : होमिओ आख्यान
त्यांनी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आणि राजा राधाकांत देव यांच्यासारख्या त्या काळातील प्रतिष्ठित व्यक्तींवरही उपचार केले. पण त्यांच्या कार्यातील कदाचित सर्वांत रंजक घटना म्हणजे त्यांनी आधुनिक वैद्यकातील एका अत्यंत उच्चशिक्षित आणि होमिओपॅथीविषयी साशंक असलेल्या डॉक्टरला होमिओपॅथीचा स्वतः अभ्यास करण्यास प्रवृत्त केले. ते डॉक्टर होते — डॉ. महेंद्रलाल सरकार.
महेंद्रलाल सरकार हे त्या काळातील उच्चशिक्षित आधुनिक वैद्यकातील डॉक्टर होते. सुरुवातीला होमिओपॅथीबद्दल त्यांना तीव्र आक्षेप होते. पण राजेंद्रलाल दत्त यांच्या संपर्कातून त्यांनी या पद्धतीकडे केवळ विरोधकाच्या नजरेने न पाहता तिचा स्वतः अभ्यास आणि अनुभव घेण्यास सुरुवात केली… आणि या इतिहासातील एक गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते — त्यांनी आपले मत बदलले!
एखाद्या विचाराला विरोध करणे सोपे असते. पण आपण ज्याला विरोध केला त्याचाच स्वतः अभ्यास करणे, आपल्या पूर्वीच्या मताला प्रश्न विचारणे आणि अनुभव वेगळे काही सांगत असतील तर, आपली भूमिका बदलणे — यासाठी वेगळ्याच प्रकारचे बौद्धिक धैर्य लागते.
1867पर्यंत महेंद्रलाल सरकार होमिओपॅथीकडे वळले होते. पुढच्याच वर्षी, 1868मध्ये त्यांनी The Calcutta Journal of Medicine सुरू केले. बंगालमधील होमिओपॅथीच्या प्रसाराला त्यामुळे आणखी बळ मिळाले.
दक्षिणेत पेटला आणखी एक दिवा…
होमिओपॅथीची ही कहाणी बंगालपुरती मर्यादित राहिली नाही. भारताच्या दक्षिणेकडे जवळजवळ त्याच काळात आणखी एक विलक्षण माणूस होमिओपॅथीची पाळेमुळे रुजवत होता — फादर ऑगस्टस मुलर.
जर्मनीत जन्मलेले फादर मुलर हे जेसुइट धर्मगुरू होते. 1878च्या अखेरीस ते मंगळुरूला आले. त्यांचे मूळ कार्य वैद्यकीय नव्हते. ते सेंट अलॉयसियस कॉलेजमध्ये फ्रेंच आणि गणित शिकवण्यासाठी आले होते. पण त्यांच्याबरोबर पॅरिसहून आलेली एक छोटीशी होमिओपॅथिक औषधांची पेटी होती.
हेही वाचा – निसर्गाची अलार्म सिस्टीम
कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या छोट्या-मोठ्या आजारांवर त्यांनी उपचार करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांची ख्याती पसरली. विद्यार्थी आले, त्यांचे नातेवाईक आले आणि मग आजूबाजूचे सर्वसामान्य लोकही येऊ लागले…
1880मध्ये कंकनाडी येथे ‘Homoeopathic Poor Dispensary’ सुरू झाली. पण फादर मुलर यांची ओळख केवळ होमिओपॅथ म्हणून नव्हती. ती होती — गरिबांचा वैद्य म्हणून! 1883पासून त्यांनी कुष्ठरोगाने ग्रस्त आणि त्या काळी समाजाने मोठ्या प्रमाणावर दूर लोटलेल्या रुग्णांची सेवा सुरू केली. पुढे प्लेग आणि कॉलऱ्यासारख्या साथींच्या काळातही त्यांच्या संस्थेने रुग्णांसाठी आपली दारे उघडी ठेवली. विशेष म्हणजे, गरजेनुसार होमिओपॅथी आणि आधुनिक वैद्यक या दोन्ही पद्धतींना त्यांच्या संस्थेत स्थान मिळाले.
त्यांच्या सेवाकार्याची दखल तत्कालीन ब्रिटिश सरकारनेही घेतली आणि त्यांना ‘Kaisar-i-Hind’ सन्मान देण्यात आला.
एका जर्मन धर्मगुरूने मंगळुरूला आणलेली ती छोटीशी औषधांची पेटी पुढे एका मोठ्या वैद्यकीय आणि शैक्षणिक संस्थेचे बीज ठरली


