मी दोन दिवसांपूर्वी एक पोस्ट वाचली या विषयावर. छानच पोस्ट होती… पण आई-वडील गेले की, माहेरपण संपतं हे काही माझ्या मनाला पटेना. मान्य आहे की, आई-वडिलांची जागा कोणी घेऊ शकत नाही; पण त्याचा अर्थ माहेरपण संपलं, असा नाही होऊ शकत.
लहानपणापासून ज्या घरात आपण राहिलो, ज्या भावंडांशी खेळलो, भांडलो, एकमेकांशी घरातील सुखं-दुःख वाटून घेतली, एकमेकांच्या यश-अपयशात सहभागी झालो… ते घर, ती माणसं आई-वडील नसतील, तर एकाएकी परकी कशी होतील?
खरं पाहिले तर, लग्न होऊन सासरी गेलेल्या सर्वच स्त्रिया आपले माहेर, माणसं सोडून परक्या घरी येऊन त्या घराला घरपण देतात. तिथल्या माणसांमध्ये दुधातील साखरेप्रमाणे मिसळून जातात, मग आई-वडील नसले तर, आपलेच घर आपल्याला परके का बरं वाटावे?
हेही वाचा – घरघंटीची उपयुक्तता नेमकी किती?
आपण जसे स्वतःचे घर सोडून, लग्न होऊन दुसरीकडे आलेलो असतो, त्याप्रमाणे आपली भावजयपण तिचे स्वतःचे घर, आई-वडील, भावंड सोडून तुमच्या घरची सून म्हणून आलेली असते. खरंतर, अशाच वेळी नणंद, भावजयीचे घट्ट मैत्रीचे नाते विणता आले पाहिजे. पाठच्या बहिणीवर जसे प्रेम करतो, तसे एकमेकींवर करता आले पाहिजे.
नणंद म्हणून एकीने आपला तोरा मिरवायचा नाही, तर भावजय म्हणून दुसरीने तिला आपला रूबाब दाखवून सारखे हिणवायचे नाही… दोघींनीही एकमेकींच्या गोष्टींमध्ये लक्ष घालायचे नाही… नणंद मग ती कोणीही असो, भावजय आली की, भावावरचा आपला हक्क कमी करायचा. लहान असो किंवा मोठी… भावांच्या संसारात लुडबूड करायची नाही. भावजयीशी मैत्रीचे असे काही घट्ट नाते विणायचे की, प्रसंगी तीच तुमचा खंबीर आधार बनली पाहिजे. भाऊ-भावजय धावत तुमच्याकडे यायला हवेत!
खरं सांगायचं तर, खूप छोट्या-छोट्या गोष्टी असतात तुमचे नाते तुटायला आणि एकदा का हे नाते दुरावले, की ते सांधता सांधता आयुष्य निघून जातं… पण दुखावलेली मन काही जुळत नाहीत. उलट, मी तर म्हणेन की, घरातील मोठी कोणी असो, नणंद किंवा भावजय, तिने दुधावरच्या सायीसारखी माया केली पाहिजे सगळयांवर. मग मला सांगा, अशा घराचे माहेरपण कसे बरे संपेल? जो भातुकलीचा खेळ तुम्ही लहानपणी खेळला असाल, तो भातुकलीचा खेळ तुम्हाला मोठेपणी पण खेळायचा असतो… पण अंगावर जबाबदारीची चादर पांघरून!
हेही वाचा – सुपर मार्केट अन् सुपर खरेदी!
एकमेकींचे आई-वडील बनून सासर आणि माहेर दोन्ही घरी एकोपा टिकवून ठेवला पाहिजे. नात्यांमध्ये सहज सुंदरता आणली तर, तुमचे माहेर संपण्याचा प्रश्न येतोच कुठे? कारण, आई-वडील गेल्यावर हाच एक महत्त्वाचा दुवा असतो आणि नणंद-भावजयीचे नातेपण तितकेच मोलाचे असते. माहेरपण हवे असेल तर, काही गोष्टी तडजोडीने, तर काही गोष्टी मायेने आत्मसात करता यायला पाहिजेत.
मनामध्ये माहेरपण संपल्याचा विचार आणायचाच कशाला?
हक्काने माहेरी जावे… बहीण-भावंडांशी लहानपणासारखेच निरागस क्षण घालवावेत… वहिनीशी थोडी धुसफूस करावी… मस्करी करावी, जशी आईशी करतो तशीच! आणि मग तिची समजूत काढून मस्त गप्पांचे फड रंगवावेत… लहान होऊन भाच्यांच्या विश्वात हळूच डोकवावे आणि अशा अगणित आठवणी मनामध्ये साठवून आपल्या घरी परतावे, ते परत मनामध्ये आनंदाचा संचार करत आणि गुणगुणतच “असं माहेर सुरेख बाई खेळायला मिळते….”
माहेरपण टिकवणे, हे असे आपल्या हातात असले पाहिजे.


