गणपतीच्या आधी आठवडाभर तिला फोन करून सांगायला मी फार उत्सुक असायचो इतकी वर्षे – “पहिल्या आरतीपर्यंत पोहोचतोय गं मी आई…” फोन ठेवल्यावर मी थेट घरीच पोहोचायचो मनाने!
नाना आणि आईचं मी शेंडेफळ. अभ्यासात जात्याच हुशार लहानपणापासून. नानांनी माझी हुशारी ओळखून शालांत परीक्षेनंतर मला पुढील शिक्षणासाठी बरीच खटपट करून मुंबईला त्यांच्या मित्राकडे पाठवले होते. नानांचा निर्णय ऐकून माझ्या काळजीने आईचे पाणावलेले डोळे आजही आठवतात. जसजसा मुंबईला जायचा दिवस जवळ येत होता, तसतसे आम्ही दोघेही एकमेकांना नजर द्यायला टाळायचो. नानांचा विरोध पत्करून काय काय खाण्याचे पदार्थ तिने करून दिले होते, माझ्यासोबत न्यायला!
सुरुवातीला मुंबईमध्ये रुळायला वेळ लागला मला. पण अंतिम ध्येय आणि नानांनी केलेली खटपट डोळ्यांसमोर ठेवून दिवसरात्र अभ्यास करून मी इंजिनीअर झालो. पुढे शिष्यवृत्ती मिळवून पदव्युत्तर शिक्षण घेऊन बंगलोरला संगणक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कंपनीत रूजू झालो. वर्षभरात फक्त गणपतीसाठी मी रजा घेऊन कोकणात जायचो. अर्धा दिवस काम करून मी बंगलोरहून विमानाने मुंबईला आदल्या दिवशी संध्याकाळी पोहोचायचो आणि मिळेल ते वाहन पकडून सकाळी घर गाठायचो.
हेही वाचा – मानसिक आधार देणारा सलाइनचा स्टँड!
घरी सुखरूप पोहोचल्यावर नाना नेहमी म्हणायचे, “दोन तासांपासून तुझी आई आत-बाहेर करतेय तुझी वाट बघत. त्या गणपतीला सुद्धा हेवा वाटत असेल तुझा.”
पण दोन्ही हातातील सामान खाली ठेवून आई म्हणून तिला मारलेली मिठी आजही आठवते. तिच्या छातीची धडधड माझ्या सर्वांगात भिनायची. तिच्या अश्रूंनी शर्टाची ओली झालेली बाही आठवून आजही जीव कासावीस होतो माझा.
“त्याला असा दारातच उभा करणार आहेस का तू सुमती? त्याला आत येऊ दे आता आणि तू लाग नैवेद्याच्या तयारीला…” नानांच्या दटावणीने आई भानावर यायची आणि माझा गृहप्रवेश व्हायचा. पहिली आरती मात्र दणक्यात व्हायची. आरत्यांचा क्रम ठरलेला असायचा. सगळं कसं परंपरागत शास्त्रशुद्ध पद्धतीने असायचं. आमची आरती झाली की, आळीतील ज्यांच्या ज्यांच्याकडे गणपती असायचा, तिथे तिथे मी आणि दादा जायचो. दोन दिवस बाप्पांचं कोडकौतुक करण्यात जायचे. एकदा का बाप्पा आपल्या घरी पोहोचलो की, आईला मी घेऊन जायचो मार्केटमध्ये खरेदीसाठी. हट्ट करून तिला साड्या घ्यायला लावायचो. नवीन तऱ्हेची भांडी आणि स्वयंपाकघरात काम लवकर उरकणारी उपकरणे मी विकत घेऊन द्यायचो तिला. तिचे हात हातात घेऊन म्हणायचो, “या हातांना सुद्धा आता विश्रांतीची गरज आहे.” यावर ती हसून म्हणायची, “आईचं प्रेम आणि बाईचं काम न संपणारं असतं.” नंतरची काही वर्षं हेच दृश्य असायचे. माझं लग्न तिच्या हट्टाखातर मी कोकणात केले आणि तिची सगळी हौसमौज तिने हक्काने पूर्ण करून घेतली होती.
पण गेल्या वर्षीया मात्र अपघातात आई गेली आणि आमच्या घराने आत्माच हरवला. तिला वाचवायला कोणाला काहीच करता आलं नाही, ह्याची चुटपुट आयुष्यभर सतावणार आहे मला. नाना देखील खचून गेले त्यानंतर…
हेही वाचा – शेअर बाजार अन् सामंत काका
गणपतीच्या दिवसांत म्हणून मी कोकणात जायचं टाळलं यावर्षी. आज बंगलोरहून निघालोय खरा कोकणात जायला, आई-नानांच्या आठवणींच्या विमानात बसून. पण मन मात्र उदास आहे.
उद्या सकाळी घरी पोहोचल्यावर आई म्हणून हाक मारून जिच्या कुशीत मी शिरायचो, ती माझी आई मात्र नसेल. माझ्या शर्टाची बाही कोरडीच रहाणार आहे पहिल्यांदाच. उद्या सकाळी दारात नक्की उभ्या असतील, मंजू वहिनी स्वागताला आणि दादाची मुलं आतुरतेने वाट बघत असतील माझी आणि माझ्या बायकोची. पण माझा गृहप्रवेश शांततेत पार पडेल. आरामखुर्चीत शांतपणे बसलेल्या नानांना मला बघवणार नाही कदाचित!
यावर्षीची पहिली आरती कशी झाली असेल कोण जाणे? बाप्पाचे दोन दिवस सगळं विधीवत केलं असेल मंजू वहिनीने. पण आईने बनवलेले उकडीचे मोदक ना बाप्पांना मिळाले असतील, ना इतर कोणाला, हे मान्य करायला माझं मन मात्र अजूनही तयार नाही.


