सकाळचा चहा पित घराच्या ओसरीत बसलेले सदानंद आणि सावित्रीबाई एकमेकांकडे पाहात होते. कर्ज काढून शहराच्या मध्यवर्ती भागात घेतलेलं हे लहानसं घर. खूप काटकसर करावी लागली होती, कर्जाचे हप्ते फेडायला. मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडण्यात निवृत्तीच्या वेळी मिळालेले सर्व पैसे संपले होते. खासगी नोकरी केल्याने पेन्शन नव्हते आणि त्यामुळे त्यांना घरात फारशी किंमतही नव्हती.
या घराच्या किती आठवणी होत्या — राज आणि वरदच्या बालपणीच्या, त्यांच्या शाळेच्या, महाविद्यालयातील प्रवेशाच्या, त्यांच्या पहिल्या पगाराच्या… आणि मुलांनी आता हे घर विकायचं ठरवलं होतं, त्यामुळे सदानंद अस्वस्थ झाले होते.
“हे सर्व करतोय ते आपल्या मुलांसाठीच ना…” सावित्रीबाईंनी हळू आवाजात म्हटलं.
“हो सावित्री, पण आपल्या दोन्ही मुलांना स्वतंत्र घर व्हावं म्हणून आपलं हे घर…” म्हणताना सदानंदांच्या डोळ्यांत पाणी आलं.
घर विकलं गेलं. मिळालेल्या पैशांतून दोन्ही मुलांनी एकाच सोसायटीत दोन फ्लॅट घेतले. गृहप्रवेशाच्या दिवशी राज आणि वरद दोघंही आई-बाबांच्या पायांवर डोकं टेकवत म्हणाले, “आमचं घर म्हणजे तुमचंच घर आणि आता तुमचं एक नव्हे तर दोन घरं आहेत.”
राजची पत्नी नेहा आणि वरदची पत्नी रीना स्वतंत्र घर मिळालं म्हणून खूश होत्या. सदानंद आणि सावित्रीबाईंचं सुखी, समाधानी आणि आनंदी जीवन सुरू झालं. पण त्यांचा तो आनंद फार काळ टिकला नाही. हळूहळू त्यांचा अपेक्षाभंग होऊ लागला.
एक दिवस नेहा म्हणाली, “आई, तुम्ही जरा कमी बोलाल का? तुमची घरातली लुडबूड कमी कराल का? तुमच्यामुळे आमची प्रायव्हसी डिस्टर्ब होते.”
पुढच्या महिन्यात रीना म्हणाली —
“आई-बाबा, आता आम्ही तुमची वाटणी करतोय. सहा महिन्यांतले दोन महिने राज आणि नेहाकडे, दोन महिने आमच्याकडे… आणि दोन महिने देवस्थानी रहायचं, म्हणजे आम्हा सर्वांना तुमचा सहवास लाभेल आणि तुम्हाला देवदर्शनाचं पुण्यही!” अगदी चतुरपणे तिने आई-बाबांना थोड्या कालावधीसाठी का होईना पण बाहेरचा रस्ता दाखवला होता.
सदानंद आणि सावित्रीबाई एकमेकांकडे पाहत राहिले. त्यांच्या आयुष्याचं “टाइमटेबल” बनवलं होतं, मुलं आणि सुनांनी, स्वतःच्या सोयीसाठी! सदानंद आणि सावित्रीबाई आखून दिलेल्या टाइमटेबलप्रमाणे जगू लागले. स्वतःसाठी वाट्टेल तसा खर्च करणारी मुलं आई-बापाच्या आवश्यक गरजा पूर्ण करतानासुद्धा हात आखडता घेऊ लागले.
एके दिवशी सावित्रीबाईंनी सदानंदांपाशी इच्छा व्यक्त केली —
“मला गणपतीला अभिषेक करायचा आहे, 2100 रुपये हवेत. आधीच तुमचा खर्च आम्हाला झेपत नाही असं सांगत, राज आणि वरदने पैसे द्यायला स्पष्ट नकार दिला. मनातली इच्छा कशी पूर्ण होणार, समजत नाही.”
हेही वाचा – मुलगा राज रातोरात बदलल्याने सदानंद आणि सावित्रीबाई विचारात पडले…
सदानंद काही बोलले नाहीत. पण दुसऱ्या दिवशी ते लवकर उठून बाहेर गेले. संध्याकाळी परत आले, तेव्हा त्यांनी सावित्रीबाईंच्या हातात 5000 रुपये ठेवले.
“कुठून आणले?” सावित्रीबाईंनी विचारलं.
सदानंद हसले — “तुझ्यासाठी मिळवले काहीतरी करून…”
सावित्रीबाईंनी ते पैसे जपून पर्समध्ये ठेवले. त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं.
नेहा दूरून हे सगळं पाहत होती… काहीही न बोलता. संध्याकाळी नेहा क्लबमधून परत आली आणि घरात शिरताच ती आवाज चढवून म्हणाली, “माझ्या पर्समधले पैसे गायब झालेत, कुणीतरी चोरले.”
सावित्रीबाई आणि सदानंद दचकले.
“किती पैसे होते?” सावित्रीबाईंनी विचारले.
“खूप होते… आणि घरात तर बाहेरचं कोणी येत नाही…” म्हणताना नेहाने सावित्रीबाईंकडे रोखून पाहिलं.
“आई, तुमची पर्स बघू का?”
सावित्रीबाई थबकल्या. “माझी पर्स बघायची?”
“हो, बघायची आहे. द्या,” नेहा दटावत म्हणाली.
सावित्रीबाईंनी निरागसपणे पर्स नेहाला दिली. नेहाने पर्स उघडली… तिला पर्समध्ये पैसे दिसले.
“हेच माझे पैसे!” ती मोठ्याने म्हणाली.
‘सदानंद आणि चोरी?’ हा विचारही सावित्रीबाईंना असह्य होता. सावित्रीबाईंनी संशयाने सदानंदांकडे पाहिलं, पण मानेनेच त्यांनी नकार दर्शविला.
“हे चोरलेले पैसे नाहीत नेहा. हे पैसे तर…” सावित्रीबाईंना थांबवत नेहा चिडून म्हणाली, “प्लीज आई! तुम्ही खोटं बोलू नका.”
तेवढ्यात ऑफिसमधून थकलेला राज घरी आला.
“काय झालं?” नेहाचा चढलेला आवाज ऐकून त्याने विचारलं.
नेहा ओरडून म्हणाली — “तुझ्या आईने माझ्या पर्समधले पैसे चोरलेत!”
राजचा चेहरा बदलला.
“आई, हे खरं आहे का?”
सावित्रीबाईंचा आवाज थरथरला — “नाही रे राज… ते पैसे तुझ्या बाबांनी —”
“बस!” राज ओरडला.
“वाटलं नव्हतं या थराला जाशील तू. मी अभिषेकासाठी पैसे द्यायला नकार दिला, तर चक्क चोरी केलीस तू?” वाट्टेल तसे बोलून त्याने जन्मदात्या मातेचा पाणउतारा केला.
सदानंद सगळं शांतपणे पाहात होते.
त्या रात्री… सदानंदांनी सावित्रीबाईंचा हात धरला — हुंदके देत ते म्हणाले, “सावित्री, मी चोरी केली नाही. मी चोर नाही.”
“सदा, मी ओळखत का नाही रे तुला? ज्याने आयुष्यात फक्त आणि फक्त दिलं, तो चोरी का करणार? सदा, आता काय करायचं आपण?”
“सावित्री, इथं आपलं आता काही… काही उरलं नाही. इथे थांबलो तर, चोरासारखं राहावं लागेल. त्यापेक्षा बाहेर पडू. परमेश्वर दाखवेल ती वाट पकडू.”
दोघंही घर सोडून निघून गेले. ते परत आले नाहीत. राज आणि वरदने त्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आणि शेवटी पोलिसांत तक्रार दाखल केली.
साधारणतः एक महिन्याने राजला पोस्टाने एक पाकीट आलं. पाकिटात वकिलाचं पत्र होतं… “सावित्रीबाईंना माहेरच्या इस्टेटीतून 2 कोटी रुपये मिळणार असल्याचं! माझ्या ऑफिसला येऊन कागदपत्रांवर सह्या करा म्हणजे पैसे मिळतील असं सांगणारं,” ॲडव्होकेट साहेबांचं पत्र.
आता मात्र आई-बाबा सापडले पाहिजेत, काय करावं? राज आणि वरदला प्रश्न पडला. काय तो योगायोग! दुसऱ्याच दिवशी पोलीस स्टेशनमधून फोन आला— “10 हजार रुपये चोरी करताना एका वृद्ध स्त्री आणि पुरुषाला आम्ही पकडलं आहे. तेच तुमचे आई-बाबा आहेत का ते येऊन बघा…”
“म्हणजे यांनी चोरी करणे पण सुरू केले का?” असं म्हणत राज आणि नेहाने आई-बाबांचं दुष्कृत्य वरद आणि रीनाला सांगितलं.
“राज, ही तर गुड न्यूज आहे. त्यांनी गुन्हा केला तरीही मोठ्या आदराने त्यांना घरी आणू. अरे, दोन कोटी मिळतील ना आपल्याला, तुला नि मला प्रत्येकी एक कोटी. आई-बाबा मिळाले की, आधी सह्या घेऊ, मग बाकी बघू,” वरद म्हणाला. राज आणि वरद मोठ्या आनंदाने पोलीस स्टेशनला गेले, पण दुर्दैवाने पकडलेले वृद्ध जोडपे त्यांचे आई-बाबा नव्हते.
दोन कोटी म्हणजे खूप मोठी रक्कम आणि ती मिळण्यासाठी राज आणि वरद आई-बाबांना वेड्यासारखे शोधू लागले. शेवटी, कधीही मंदिरात न गेलेले राज, वरद, नेहा आणि रीना आई-बाबांना शोधायला मंदिरात गेले.
“देवा… एकदा आई-बाबा भेटू दे, दोन कोटींचा प्रश्न आहे रे…” त्यांनी परमेश्वराला साकडं घातलं. काय तो योगायोग! परमेश्वराने त्यांचा आवाज ऐकला आणि आई-बाबा लगेच सापडले.
मंदिराच्या बाहेर रांग होती. प्रत्येकाला दोन ग्लुकोज बिस्किटं मिळत होती.
“साहेब, माझ्या मालकांनी सकाळपासून काही खाल्लं नाही, दोन जादा बिस्किटं द्याल का?” हा तर आईचा आवाज. राजने आवाजाच्या दिशेने पाहिलं. हो, ती आईच होती.
“दोन बिस्किटांसाठी आई विनवणी करत होती, आणि आम्ही दोन कोटींसाठी तिचा शोध घेत होतो…” राजच्या मनात विचार चमकून गेला आणि…
“आई…” राजने आवाज दिला.
“आई, बाबा… चला ना घरी…” राज विनवू लागला.
सावित्रीबाई शांतपणे म्हणाल्या —
“नाही रे, आता आम्ही परत येणार नाही.”
सदानंद म्हणाले —
“जिथं विश्वास तुटतो, आरोप होतो, अपमान होतो, स्वाभिमान चुरडला जातो, तिथं घर उरत नाही रे पोरा…”
तेवढ्यात एक तरुण पुढे आला आणि नतमस्तक होत म्हणाला —
“बाबा… तुम्ही ऐनवेळी दुर्मीळ असलेलं बी निगेटिव्ह ग्रुपचं रक्त दिलं म्हणून माझे वडील वाचलेत. अभिषेकासाठी तुम्ही रक्तदान करून पैसे मिळवले, याचं माझ्या आई-वडिलांना खूप कौतुक वाटलं. तुम्ही खूप पुण्यवान आहात, असंही म्हणाले ते. केलात ना तुम्ही अभिषेक? तुमचं घर कुठे आहे?”
“बेटा, आमचं भाग्य जरा कमी पडलं. तू 5,000 रुपये दिलेस, पण दुर्दैवाने सूनेचे पैसे त्याच दिवशी हरवले आणि मुलाने नि सूनेने ते पैसे काढून घेत असहाय्य आणि लाचार असलेल्या आम्हाला चोर ठरवलं. आम्ही स्वेच्छेने घर सोडलं नि रस्त्यावर आलो. आता फूटपाथवर मिळेल ती जागा, हेच आमचं घर.”
राजला पश्चात्ताप झाला —
“मी माझ्या आईला वाट्टेल तसे बोललो…”
नेहाही शरमली…
“मी त्यांच्यावर चोरीचा आरोप केला.”
दोघांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचा भाव स्पष्ट दिसत होता.
“ऐनवेळी परमेश्वरासारखे धावून आलेले तुम्ही देवमाणूस आहात… का रस्त्यावर राहता तुम्ही? आमच्या घरी चला आणि तिथेच रहा, माझ्या आई-वडिलांना सोबत होईल. चला… नाही म्हणू नका.”
हेही वाचा – कालाय तस्मै नमः
“चालेल बेटा… पण त्याबदल्यात आम्ही घरातली सगळी कामं करू,” सदानंद म्हणाले.
सावित्रीबाई म्हणाल्या — “काम केलं की, हृदयावरील घाव कमी होतो आणि आमच्यासाठी ते आता खूप आवश्यक आहे.”
आई-बाबा “आपल्या घरी चला” म्हणणाऱ्या राज आणि वरदच्या डोक्यावर हात ठेवून सावित्रीबाई म्हणाल्या, “सदैव सुखी रहा.”
“तुम्ही ओळखता का त्यांना? कोण आहेत ते?” त्या तरुणाने विचारलं. आई काही बोलणार तेवढ्यात बाबा म्हणाले, “खूप नशीबवान आणि आई-बाप गमावलेले अनाथ आहेत ते.”
त्या तरुणाने आदराने सदानंद आणि सावित्रीबाईंना कारमध्ये बसवलं. कार निघून गेली.
सदानंद आणि सावित्रीबाई पुन्हा एकदा नव्याने आयुष्य सुरू करणार होते… स्वाभिमानाने.
राज, वरद, नेहा आणि रीना जागच्या जागी उभे होते. त्यांच्या हाती उरली होती — एक पोकळी, कधीही भरून न निघणारी… आणि दोन कोटी रुपयांचं पत्र, वारस असूनही बेवारस बनलेलं.


