चिंचेचा ठेचासाठी साहित्य
- ओल्या चिंचा – अर्धा किलो (मध्यम तयार झालेल्या)
- ओल्या मिरच्या – 20 ते 25
- गूळ – चिंचेच्या प्रमाणानुसार अंदाजे
- मीठ – चवीनुसार
- मेथीदाणा – दोन चमचे
- हिंग – दोन चमचे
- तेल – फोडणीसाठी
- मोहरी – एक टीस्पून
- हळद – एक चमचा
कृती
- चिंचा साधारण तयार झालेल्या – म्हणजे जास्त जूनही नाहीत आणि जास्त कोवळ्याही नाहीत, अशा घ्याव्यात.
- चिंचा धुऊन पाट्यावर अगर उखळात चांगल्या बारीक ठेचाव्यात. चिंचोके जून असल्यास काढून टाकावेत. नाहीतर तेही ठेचावेत.
- मिरच्यांचे तुकडे करावेत.
- नंतर चिंचेचा ठेचलेला गोळा, मीठ, मिरच्यांचे तुकडे असे एकत्र करून अगदी बारीक वाटावे.
- वाटून झालेल्या गोळ्याच्या पाऊणपट गूळ घेऊन, तो त्यात घालून, पुन्हा सर्व एकत्र वाटून एकजीव करावे.
- नंतर त्यात हिंग, हळद, मेथी आणि मोहरी यांची तेलात खमंग फोडणी करून घालावी.
- हा ठेचा फार रुचकर लागतो.
हेही वाचा – Recipe : एकदम टेस्टी दही मिसळ!
टिप्स
- चिंचेचा ठेचा सात-आठ दिवस टिकतो. ठेचा पुष्कळ दिवस टिकावयास पाहिजे असल्यास चिंचा, मिरच्या, थोडी हळद आणि मीठ असे वर दिल्याप्रमाणे ठेचून, तो गोळा बरणीत भरून, त्यावर थोडे मीठ घालून ठेवावे. गोळा पुष्कळ दिवस म्हणजे पाच-सहा महिनेसुद्धा टिकतो.
- ठेचा वाढावयाचा असेल, त्या वेळी बरणीतील पाहिजे तेवढा गोळा काढून वर लिहिलेल्या पद्धतीप्रमाणे वाटून आणि फोडणी घालून आयत्या वेळी तयार करावा.
कारळ्याच्या चटणीसाठी साहित्य
- कारळे – एक वाटी
- भाजलेले दाणे – अर्धी वाटी
- तीळ – अर्धी वाटी
- सुके खोबरे – पाव वाटी तुकडा
- कढीलिंब – साधारण वाटीभर पाने
- सुक्या मिरच्या – 10 ते 15
- मीठ – चवीनुसार
- हिंग – एक चमचा
- तेल – दोन टेबलस्पून
कृती
- कारळे भाजून घ्यावेत.
- तेलावर हिंगाचा खडा तळून घ्यावा. नंतर त्याच तेलात खोबरे तांबूस होईपर्यंत तळून घ्यावे.
- नंतर त्याच तेलात तीळ, कढीलिंब आणि मिरच्या परतून घ्याव्यात.
- नंतर चवीनुसार मीठ घालून भाजलेले दाणे आणि सर्व जिन्नस एकत्र करून चांगले कुटावेत किंवा मिक्सरमध्ये भरड करावी.
हेही वाचा – Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…
टिप्स
- कारळ्याच्या चटणीप्रमाणे तीळ आणि जवस यांचीही चटणी करावी.
- कारळ्याऐवजी एक वाटी तीळ घ्यावेत. बाकी सर्व साहित्य आणि कृती कारळ्याच्या चटणीप्रमाणेच.
- कारळ्याऐवजी जवस एक वाटी घ्यावेत. बाकी सर्व साहित्य आणि कृती वरीलप्रमाणेच. मात्र जवस जास्त आणि खरपूस भाजून घ्यावेत.


