अध्याय तेरावा
प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः । यः पश्यति तथात्मानमकर्तारं स पश्यति ॥29॥
आणि मनोबुद्धिप्रमुखें । कर्मेंद्रियें अशेखें । करी प्रकृतीचि हें देखे । साच जो गा ॥1079॥ घरींचीं राहटती घरीं । घर कांहीं न करी । अभ्र धांवे अंबरीं । अंबर तें उगें ॥1080॥ तैसी प्रकृति आत्मप्रभा । खेळे गुणीं विविधारंभा । येथ आत्मा तो वोथंबा । नेणे कोण ॥1081॥ ऐसेनि येणें निवाडें । जयाचां जीवीं उजिवडें । अकर्तयातें फुडें । देखिलें तेणें ॥1082॥
यदा भूतपृथग्भावमेकस्थमनुपश्यति । तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा ॥30॥
एऱ्हवीं तैंचि अर्जुना । होईजे ब्रह्मसंपन्ना । जैं या भूताकृती भिन्ना । दिसती एकी ॥1083॥ लहरी जैसिया जळीं । परमाणुकणिका स्थळीं । रश्मीकर मंडळीं । सूर्याचां ॥1084॥ नातरी देहीं अवेव । मनीं आघवेचि भाव । विस्फुलिंग सावेव । वन्हीं एकीं ॥1085॥ तैसे भूताकार एकाचे । हें दिठी रिगे जैं साचें । तैंचि ब्रह्मसंपत्तीचें । तारूं लागे ॥1086॥ मग जयातयाकडे । ब्रह्मेचि दिठी उघडे । किंबहुना जोडे । अपार सुख ॥1087॥ येतुलेनि तुज पार्था । प्रकृतिपुरुषव्यवस्था । ठायेंठावो प्रतीतिपथा- । माजीं जाहली ॥1088॥ अमृत जैसें ये चुळा । कां निधान देखिजे डोळां । तेतुला जिव्हाळा । मानावा गा ॥1089॥ हा जी जाहलिये प्रतीती । घर बांधणें जें चित्तीं । तें आतां ना सुभद्रापती । इयावरी ॥1090॥ तरी एकदोन्ही ते बोल । बोलिजती सखोल । देईं मनातें वोल । मग ते घेईं ॥1091॥ ऐसें देवें म्हणितलें । मग बोलों आदरिलें । तेथें अवधानाचेचि केलें । सर्वांग येरें ॥1092॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : पैं नानाप्रयोजनशीळें, दीर्घें वक्रें वर्तुळें
अर्थ
आणि जो, सर्व प्रकारे कर्मे प्रकृतीकडूनच केली जातात आणि आत्मा हा अकर्ता आहे, असे जाणतो, तोच खरा ज्ञानी होय. ॥29॥
आणि मन व बुद्धी ज्यात प्रमुख आहेत, अशी ज्ञानेंद्रिये व सर्व कर्मेंद्रिये यांच्यापासून होणारी जी कर्मे ती प्रकृतीच करते, असे जो खरोखरच जाणतो ॥1079॥ घरातील माणसे घरात वागतात, घर काही एक करीत नाही, आकाशात ढग धावतात, पण आकाश स्थिर असते. ॥1080॥ त्याप्रमाणे प्रकृति ही आत्म्याच्या प्रकाशाने नाना प्रकारच्या कर्मांचा आरंभ करून त्रिगुणांनी खेळत असते व येथे (सर्व कर्मात) आत्मा हा खांबासारखा (केवल आधारभूत) असतो व कोण कर्मे करतो, हे तो जाणत नाही. ॥1081॥ अशा या निर्णयाने ज्याच्या अंत:करणात प्रकाश पडला, त्याने खरोखर अकर्त्या आत्म्याला जाणले. ॥1082॥
जेव्हा भूतांचा पृथग्भाव (निरनिराळेपणा) एका (आत्म्याच्या) ठिकाणी स्थित आहे आणि त्याचाच (आत्म्याचाच) हा विस्तार आहे, असे पुरुष नीट जाणतो, तेव्हा त्याला ब्रह्माची प्राप्ती होते. ॥30॥
सहज विचार करून पाहिले तर अर्जुना, ज्या वेळी या भिन्न आकारांची भूते एक आहेत, असा बोध होईल, त्याच वेळी ब्रह्मसंपन्न होता येईल. ॥1083॥ लाटा जशा पाण्यावर, परमाणूचे कण जसे पृथ्वीवर, (अथवा) किरणे जशी सूर्यमंडलावर ॥1084॥ अथवा देहाच्या ठिकाणी जसे अवयव, अथवा मनाच्या ठिकाणी जशा सर्व कल्पना, अथवा एका अग्नीच्या ठिकाणी जशा सर्व ठिणग्या ॥1085॥ त्याप्रमाणे एका ब्रह्माचे सर्व भूताकार आहेत, हे ज्या वेळेला खरोखर दृष्टीत प्रवेश करील (खरोखर अनुभवाला येईल) त्याच वेळी ब्रह्मरूप संपत्तीचे जहाज मिळेल. ॥1086॥ मग जिकडेतिकडे डोळ्याला ब्रह्मच दिसेल. फार काय सांगावे! त्यास अमर्याद सुख प्राप्त होईल. ॥1087॥ अर्जुना, अशा रीतीने प्रकृतिपुरुषाचा विचार जसा पाहिजे तसा तुझ्या अनुभावाला आणून दिला. ॥1088॥ अरे, चूळ भरावयास जसे अमृत मिळावे, अथवा ठेवा जसा डोळ्यांनीच पाहावा, त्याप्रमाणे हा प्रकृतिपुरुषविचाराचा तुला मिळालेला लाभ तितक्याच योग्यतेचा समजावा. ॥1089॥ बा अर्जुना, जो अनुभव प्राप्त झाला असतांना, त्या अनुभवाचे चित्तात घर बांधावयाचे (म्हणजे तो अनुभव चित्तात कायम ठेवावयाचा) ते आताच नाही, तर यानंतर ॥1090॥ आता त्या एक-दोन गूढ गोष्टी तुला सांगितल्या जातील, तर तू मनाला जामीन दे आणि मग त्या घे. (म्हणजे ऐक). ॥1091॥ असे देवाने म्हटले व मग बोलावयास आरंभ केला. तेव्हा अर्जुनाने आपले सर्व अंग अवधानरूप केले. ॥1092॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : मोक्षासकट गती, जेथें येती विश्रांती


