अध्याय तेरावा
ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना । अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे ॥24॥
कोणी एकु सुभटा । विचाराचा आगिटां । आत्मानात्मकिटा । पुटें देउनी ॥1036॥ छत्तीसही वानीभेद । तोडोनियां निर्विवाद । निवडिती शुद्ध । आपणपें ॥1037॥ तया आपणपयाचां पोटीं । आत्मध्यानाचिया दिठी । देखती गा किरीटी । आपणपेंचि ॥1038॥ आणिक पैं दैवबगें । चित्त देती सांख्ययोगें । एक ते अंगलगें । कर्माचेनी ॥1039॥
अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वाऽन्येभ्य उपासते । तेऽपि चातितरंत्येव मृत्युं श्रुतिपरायणा: ॥25॥
येणें येणें प्रकारें । निस्तरती साचोकारें । हें भवाभेउरें । आघवेंचि ॥1040॥ परि ते करिती ऐसें । अभिमानु दवडुनि देशें । एकाचिया विश्वासें । टेंकती बोला ॥1041॥ जे हिताहित देखती । हानि कणवा घेपती । पुसोनि शिणु हरिती । देती सुख ॥1042॥ तयांचेनि मुखें जें निघे । तेतुलें आदरें चांगें । ऐकोनियां आंगें । मनें होती ॥1043॥ तया ऐकणेयाचि नांवें । ठेविती गा आघवें । तया अक्षरांसीं जीवें । लोण करिती ॥1044॥ तेही अंतीं कपिध्वजा । इया मरणार्णवसमाजा- । पासूनि निघती वोजा । गोमटिया ॥1045॥ ऐसेसे हे उपाये । बहुवस एथें पाहें । जाणावया होये । एकी वस्तु ॥1046॥ आतां पुरे हे बहुत । पैं सर्वार्थाचें मथित । सिद्धांतनवनीत । देऊं तुज ॥1047॥ येतुलेनि पंडुसुता । अनुभव लाहाणा आयिता । येर तंव तुज होतां । सायास नाहीं ॥1048॥ म्हणोनि बुद्धि रचूं । मतवाद हे खांचूं । सोलीव निर्वचूं । फलितार्थची ॥1049॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : विदळ बहु चोखा, मीनलिया वाला एका
अर्थ
कित्येक आपल्या ठिकाणी (आत्मानात्म्यांच्या सरभेसळीत) आपणास आपल्या शुद्ध (आत्मस्वरूपास) आत्मध्यानाच्या योगाने (आत्मानात्मविचाराने निवडून) पाहतात, दुसरे कोणी सांख्ययोगाने आणि काही कर्मयोगाने जाणतात. ॥24॥
हे चांगल्या योद्ध्या अर्जुना, कित्येक पुरुष विचाररूप अग्नीत आत्मानात्ममिश्रणरूपी हिणकस सोन्यास पुटे देऊन ॥1036॥ छत्तीसही अनात्मरूप प्रकारचे भेद नि:संशय जाळून (म्हणजे विचाराने त्यांचे निरसन करून) आपला शुद्ध आत्मभाव निवडतात. ॥1037॥ त्या आत्मभावाच्या पोटात (स्वरूपात) आत्मध्यानरूपी दृष्टीने अर्जुना, ते आपण आपल्यालाच पाहतात. ॥1038॥ आणि कित्येक लोक दैववशात् सांख्ययोगाच्या द्वारे (आत्म्याकडे) चित्त देतात, आणखी कित्येक कर्मयोगाचा आश्रय करून (आत्म्यास) पाहतात. ॥1039॥
दुसरे कोणी याप्रमाणे (आत्म्याला) न जाणणारे दुसर्यांपासून (म्हणजे आचार्यादिकांपासून) श्रवण करून उपासना करतात. श्रवण केलेल्या गोष्टी प्रमाण मानणारे असे ते देखील मृत्यु (सागरातून) तरून जातात. ॥25॥
(याहून कित्येक दुसरे – स्वत: आत्म्याला न जाणणारे – या प्रकारांनीच सर्व संसारभय खरोखर निस्तरतात. (चांगल्या तर्हेने तरून जातात). ॥1040॥ परंतु ते असे करतात की, अभिमान देशोधडी करून एकाच्या (गुरूच्या) उपदेशावर विश्वासाने अवलंबून राहतात. ॥1041॥ जे (गुरु) हिताहित पाहतात, जे शिष्याच्या हानीच्या बाबतीत दयेने व्यापले जातात व शिष्याला दु:ख कशाने होते, हे विचारून त्याचे दु:ख हरण करतात आणि सुख देतात, ॥1042॥ त्यांच्या मुखातून जेवढे निघेल, तेवढे चांगल्या आदराने ऐकून, अंगाने व मनाने ते तसेच होतात. ॥1043॥ आपल्या सर्व कर्तव्यास, ऐकण्याचेच नाव ठेवतात. (ऐकणे हेच एक आपले जन्मास येऊन कर्तव्य आहे असे समजतात). आणि त्या गुरुमुखातल्या अक्षरांवरून आपला जीव ओवाळून टाकतात. ॥1044॥ हे कपिध्वजा, ते देखील या मरणरूपी समुद्राच्या समुदायापासून (जन्ममरणपरंपरेपासून) चांगल्या रीतीने बाहेर पडतात. ॥1045॥ एक परमात्मा जाणावयाला येथे असे हे पुष्कळ उपाय आहेत, पाहा! ॥1046॥ आता याविषयी फार बोलणे पुरे. (आतापर्यंत सांगितलेले) सर्व अभिप्राय घुसळून काढलेले सिद्धांतरूप लोणी तुला देतो. ॥1047॥ अर्जुना, एवढ्याने तुला आयता अनुभव मिळणार आहे. मग इतर (म्हणजे ब्रह्मानुभवानंतर होणारा विलक्षण आनंद, शांति वगैरे) होण्याला तर तुला श्रम पडणार नाहीत. ॥1048॥ म्हणून त्या सिद्धांताची व्यवस्थित मांडणी बुद्धीने करू व इतर मतांच्या दुराग्रहाचे खंडन करू व स्वच्छ गर्भित अर्थच विस्ताराने सांगू ॥1049॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : प्रकृति येणें जिये, याचिया सत्ता जग विये


