अध्याय तेरावा
जे उत्पत्ति प्रलयो होत । ते इयेचे सायंप्रात ।हें असो अद्भुत । मोहन हे ॥995॥ हे अद्वयाचें दुसरें । हे निःसंगाचें सोयरे । निराळेंसि घरें । नांदत असे ॥996॥ इयेतें येतुलावरी । सौभाग्यव्याप्तीची थोरी । म्हणोनि तया आवरी । अनावरातें ॥997॥ तयाच्या तंव ठायीं । निपटूनि कांहींचि नाहीं । कीं तया आघवेहीं । आपणचि होय ॥998॥ तया स्वयंभाची संभूती । तया अमूर्ताची मूर्ती । आपण होय स्थिती । ठावो तया ॥999॥ तया अनार्ताची आर्ती । तया पूर्णाची तृप्ती । तया अकुळाची जाती। गोत होय ॥1000॥ निराकाराचा आकारु । तया निर्व्यापाराचा व्यापारु । निरहंकाराचा अहंकारु । होऊनि ठाके ॥1001॥ तया अचर्चाचें चिन्ह । तया अपाराचें मान । तया अमनस्काचें मन । बुद्धीही होय ॥1002॥ तया अनामाचें नाम । तया अजाचें जन्म । आपण होय कर्म । क्रिया तया ॥1003॥ तया निर्गुणाचे गुण । तया अचरणाचे चरण । तया अश्रवणाचे श्रवण । अचक्षूचे चक्षु ॥1004॥ तया भावातीताचे भाव । तया निरवयवाचे अवयव । किंबहुना होय सर्व । पुरुषाचें हे ॥1005॥ ऐसेनि इया प्रकृती । आपुलिया सर्व व्याप्ती । तया अविकारातें विकृती- । माजीं कीजे ॥1006॥ तेथ पुरुषत्व जें असे । तें ये इये प्रकृतिदशे । चंद्रमा अंवसे । पडिला जैसा ॥1007॥ विदळ बहु चोखा । मीनलिया वाला एका । कसु होय पांचिका । जयापरी ॥1008॥ कां साधूतें गोंदळी । संचारोनि सुये मैळी । नाना सुदिनाचा आभाळीं । दुर्दिनु कीजे ॥1009॥ तेथ पय पशूचां पोटीं । वन्हि जैसा काष्ठीं । गुंडूनि घेतला पटीं । रत्नदीपु ॥1010॥ राजा पराधीनु जाहला । कां सिंहु रोगें रुंधला । तैसा पुरुष प्रकृती आला । स्वतेजा मुके ॥1011॥ जागता नरु सहसा । निद्रा पाडूनि जैसा । स्वप्नींचिया सोसा । वश्यु कीजे ॥1012॥ तैसें प्रकृतिजालेपणें । पुरुषा गुण भोगणें । उदास अंतुरीगुणें । आतुडे जेवीं ॥1013॥ तैसें अजा नित्या होये । आंगीं जन्ममृत्यूचे घाये । वाजती जैं लाहे । गुणसंगातें ॥1014॥ परि तें ऐसें पंडुसुता । तातलें लोह पिटितां । जेवीं वन्हीसीचि घाता । बोलती तया ॥1015॥ कां आंदोळलिया उदक । प्रतिमा होय अनेक । तें नानात्व म्हणती लोक । चंद्रीं जेवीं ॥1016॥ दर्पणाचिया जवळिका । दुजेपण जैसें ये मुखा । कां कुंकुमें स्फटिका । लोहित्व ये ॥1017॥ तैसा गुणसंगमें । अजन्मा हा जन्मे । पावतु ऐसा गमे । एऱ्हवीं नाहीं ॥1018॥ अधमोत्तमा योनी । यासि ऐसिया मानी । जैसा संन्यासी होय स्वप्नीं । अंत्यादि जाती ॥1019॥ म्हणोनि केवळा पुरुषा । नाहीं होणें भोगणें देखा । येथ गुणसंगुचि अशेखा- । लागीं मूळ ॥1020॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : तेंचि कारण ठाकावया, जें सूत्र धरणें उपाया
अर्थ
जे उत्पत्ति व प्रलय आहेत, ते हिचेच सकाळ, संध्याकाळ आहेत. हे असो, ही प्रकृति अद्भुत भुरळ आहे. ॥995॥ ही प्रकृति एकाकी असणार्या पुरुषची जोडीदारीण आहे व संग नसणार्या पुरुषाची संबंधी आहे व ही प्रकृति निराकारी पुरुषासह संसार करून कालक्रमणा करीत आहे. ॥996॥ हिच्या सौभाग्याच्या विस्ताराचा मोठेपणा एवढा आहे, म्हणून ही त्या अनावराला (पुरुषाला) आपल्या आटोक्यात आणते. ॥997॥ त्याच्या ठिकाणी तर मुळीच काही नाही असे जरी आहे, तरी ती आपणच त्या पुरुषाचे सर्व काही होते. ॥998॥ त्या स्वत:सिद्ध असणार्या पुरुषाची उत्पत्ति आपण होते व त्या निराकाराचा आकार आपण बनते. त्याचे राहणे व राहाण्याचे ठिकाण आपणच होते. ॥999॥ ही त्या इच्छारहिताची इच्छा, त्या पूर्णाची तृप्ती व त्या कुलरहिताची जाती व गोतदेखील ही प्रकृति होते. ॥1000॥ ही त्या निराकार पुरुषाचा ही आकार होते, त्या व्यापाररहिताचा व्यापार आपण होते व त्या अहंकाररहित पुरुषाचा अहंकार ही होऊन राहते. ॥1001॥ ज्याच्याविषयी काही चर्चा करता येत नाही, अशा पुरुषाचे ही प्रकृती लक्षण होते, त्या अमर्याद पुरुषाचे ही माप होते व त्या मनरहित पुरुषाचे मन व बुद्धि, ही प्रकृति होते. ॥1002॥ त्या नामरहिताचे ही नाम होते व त्या जन्मरहित पुरुषाचा जन्म ही होते आणि त्याची क्रिया, कर्म ही आपणच होते. ॥1003॥ त्या निर्गुणाचे गुण, त्या पायरहिताचे पाय, त्या कानरहिताचे कान व त्या नेत्ररहिताचे नेत्र ही ही होते. ॥1004॥ त्या भावातीताचे (जन्मादि सहा) भाव (विकार) ही होते व त्या अवयवरहित पुरुषाचे ही अवयव होते. फार काय सांगावे! ही प्रकृति त्या पुरुषाचे सर्व काही होते. ॥1005॥ याप्रमाणे प्रकृति ही आपल्या सर्वव्यापकपणाने, अविकार जो पुरुष, त्याला विकारी करते. ॥1006॥ तेथे (त्या पुरुषाचे ठिकाणी) जे पुरुषपण आलेले आहे, ते या प्रकृतीच्या अवस्थेमुळे आलेले आहे. (प्रकृतीशी संबंध केल्यामुळे पुरुष हा आपल्या तेजाला कसा मुकतो, ते पुढे अनेक दृष्टांतांनी अकराव्या ओवीपर्यंत सांगतात). ज्याप्रमाणे चंद्र अवसेस पडतो म्हणजे तेजोहीन होतो ॥1007॥ अतिशय शुद्ध असलेल्या वालभर सोन्यात अन्य हिणकस धातु मिसळला तर, ज्याप्रमाणे त्याचा कस पांचावर येऊन बसतो, ॥1008॥ अथवा पिशाच्च हे चांगल्या मनुष्याच्या अंगात संचार करून, ज्याप्रमाणे त्यास पापकर्मात घालते, अथवा ढग हे चांगल्या दिवसाचा उदासीन (उत्साहभंग करणारा) दिवस करतात, ॥1009॥ गायीच्या पोटात दूध असतांना जसे ते पांढरे स्वच्छ असे दिसत नाही, अथवा लाकडात अग्नि असतांना जसा तो चकचकीत दिसत नाही, अथवा वस्त्रात तेजस्वी रत्न गुंडाळले असता त्याचे तेज जसे दिसत नाही. ॥1010॥ राजा शत्रूच्या आधीन झाला असता, जसा निस्तेज होतो, अथवा सिंह रोगाने व्यापला म्हणजे जसा निस्तेज होता, तसा पुरुष हा प्रकृतीच्या आधीन झाला की स्वत:च्या तेजाला मुकतो. ॥1011॥ जागृत पुरुष जसा (झोपेच्या आधीन झाला असता) स्वप्नातील हावेच्या भरीस पडून, सुखदु:खभोगास पात्र केला जातो. ॥1012॥ त्याप्रमाणे पुरुष प्रकृतीच्या स्वाधीन झाल्याकारणाने, त्याला गुण भोगणे भाग पडते. ज्याप्रमाने विरक्त पुरुष स्त्रीच्या योगाने (सुखदु:खाच्या फेर्यात) सापडला जातो ॥1013॥ जेव्हा पुरुषास गुणांची संगति घडते, तेव्हा तो स्वभावत: जन्मशून्य व नित्य असूनही, त्याच्या अंगावर जन्ममृत्यूचे तडाखे बसतात. ॥1014॥ परंतु अर्जुना, ते असे आहे की, जसे तापलेल्या लोखंडावर घण मारले असता, ते घणाचे तडाखे अग्नीलाच बसतात असे जसे म्हणतात, ॥1015॥ अथवा पाणी हलले असता चंद्राची अनेक प्रतिबिंबे होतात, त्या वेळी (अज्ञानी) लोक चंद्राच्या ठिकाणी जसे अनेकत्व आहे असे म्हणतात, ॥1016॥ आरशाच्या जवळपणामुळे पाहाणार्या मुखाला दुसरेपण येते, अथवा केशराच्या सान्निध्यामुळे स्फटिकाला तांबडेपणा येतो ॥1017॥ त्याप्रमाणे हा पुरुष स्वत: अजन्मा नसून गुणसंबंधाने जन्म पावतो, असे वाटते. एरवी (गुणांचा संबंध टाकून पाहिले तर) तो जन्म पावत नाही. ॥1018॥ ज्याप्रमाणे संन्यासी स्वप्नामधे अंत्यजादि होतो त्याप्रमाणे या पुरुषास नीच व उच्च योनी आहेत असे समज. ॥1019॥ म्हणून केवळ पुरुषाला जन्मणे व भोगणे ही नाहीत, असे समज. त्याचे जन्मणे व भोगणे वगैरे सर्व गोष्टींशी जो संबंध दिसतो, त्याला कारण पुरुषाला असलेली गुणांची संगति ही होय. ॥1020॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : हे प्रकृती क्षणीं नीच नवी, रूपाचीच आघवी


