भाग – 12
वंदूची झालेली भेट आणि तिची चाललेली परवड ऐकून उमा हतबुद्ध होऊन बसली होती. पूर्णपणे विचारमग्न होती… आई वंदूच्या घरी जाऊन ‘तिला जेवायला पाठवा,’ असे सांगून आली तरी, उमा तिथेच विचारात गढून बसलेली होती. मामीने आत जाऊन चहा बनवला होता व त्या चहाची कपबशी घेऊन उमाच्या समोर उभ्या राहिल्या.
“उमा, चहा घे, बरं वाटेल तुला.” उमा सोबत असल्याने मामींना उमाच्या उद्विग्न मनःस्थितीची जाणीव झाली होती.
उमाने चहाची कपबशी हातात घेतली आणि ती कपाने चहा पिऊ लागली. अजूनही तिची नजर कुठेतरी अज्ञातातच होती. मामी आता आत स्वयंपाकात मदत करण्यासाठी निघून गेली. चहाचा घोट घेतल्यावर उमाला जरा बरे वाटले. तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज आला म्हणून बाबा उठून कोण आले ते पाहण्यासाठी दाराकडे गेले आणि आश्चर्याने म्हणाले,
“पाव्हणं तुम्ही? या या.”
कोण आले आहे, याचे प्रश्नचिन्ह उमाच्या नजरेवर उमटेपर्यंत बाहेरची व्यक्ती दारातून आत आली. महेशरावांना दारात उभे राहिलेले पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला.
हेही वाचा – उमानं ऐकली वंदनाची व्यथा
“तुम्ही? अचानक?” तिने विचारले.
“अगं, पाहुण्यास्नी आत तरी येऊ दे की… मग विचार तुला काय विचारायचेय ते.”
यावर ती खुदकन हसली. मगाशी तिच्या मनावर साठलेले मळभ विरून गेले. ती कपबशी घेऊन आत गेली आणि तिने आईला जावईबापू आल्याचे सांगितले. आईच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. आईने पटकन पाण्याचा तांब्या भरून त्यावर फुलपात्र पालथे घातले आणि डोक्यावर पदर घेऊन ती बाहेर आली.
जावई बापूंच्या हातात पाण्याचा तांब्या देऊन ती म्हणाली,
“कसं काय? बरं हाय ना?”
“हो, छान!” असे महेशरावांनी उत्तर दिले आणि ते तांब्यातील पाणी फुलपात्रात ओतून पिऊ लागले. आई आत आली आणि तिने त्यांच्यासाठी दुधाचा चहा ठेवला. ते पाहून उमा म्हणाली,
“वा गं वा! माझ्यासाठी पाण्यातला चहा अन् जावईबापूंसाठी दुधात चहा!”
“मग? जावई बापू हायत ते. सासुरवाडीला आलेत.”
“तर तर… अन् मी माझ्या माहेरी आलेय त्याचे काय?” असे म्हणत तिने गाल फुगवले. तिचा गालगुच्चा घेत आई म्हणाली,
“अगं, जावईबापू कधीतरीच येतेती, तुला पण ठेवती थांब…” असे म्हणत आई चहा वाढवू लागली तसे उमा म्हणाली,
“मला नको आता जा. दे तुझ्याच लाडक्या जावयाला.”
ती जरी रागावून आईला असे म्हणाली असली तरी आईची चाललेली लगबग बघून तिला आनंदच होता होता. मामी तिला डोळ्यानेच खुणावून तिची चेष्टा करत होत्या. ती नजरेची चेष्टा तिला हवीहवीशी वाटत होती.
आईने स्पेशल चहा बनवून तिच्या हातात कपबशी दिली आणि तिला बाहेर पिटाळले. तिने महेशरावांना चहा दिला आणि ती तिथेच शेजारी बसली.
“कशी आहे आता तब्येत?” महेशरावांनी विचारले.
“बरी आहे.”
“आई म्हणाली, जा तिला बघून ये. तब्येत बरी नसली तर राहू दे अजून चार दिवस. शाळा बुडू दे बुडली तर.”
हेही वाचा – सर्वकाही बाळासाठी!
आत्या म्हणाल्या म्हणून महेशराव आले आहेत, आपल्या ओढीने आले नाहीत, असे वाटून तिचे मन खट्टू झाले.
“नको… मी येते उद्या. बरी आहे आता माझी तब्येत,” असे ती म्हणाली. तेवढ्यात बाहेरून आवाज आला,
“उमे ऐ उमे! काय करतेयस गं?” आणि त्याबरोबरच वंदना दारात उभी राहिली.
गडबडीने उठून उमा दाराजवळ गेली आणि वंदूच्या हाताला धरून तिला आत घेऊन आली.
“ही माझी मैत्रीण वंदना…” वंदनाला अवघडल्यासारखे झाले. तिने हात जोडून नमस्कार केला आणि ती आत निघून गेली. तिच्या पाठोपाठ उमा पण आत निघून गेली. बाहेर महेशराव एकटेच बसले होते.


