नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला…
आज भेटुयात आपल्या मुंबईला! मुंबई मेरी जान… मी मुंबईकर… खरंतर, मुंबई खरंच महान आहे. अठरा पगड जातीच्या आणि धर्माच्या लोकांना एकत्र जगवते, ती माझी मुंबई. अडल्या-पडल्याला मदत करते, स्वतःमध्ये सामावून घेते… ती आमची मुंबई. अव्याहत धावत असते, माणसांनी ओतप्रोत भरलेली, कधीही न थांबणारी, न थकणारी माझी मुंबई. मुंबई माझी जन्मभूमी आणि कर्म भूमी!
बाहेरगावाहून कोणीही यावं… शिक्षणासाठी, पोटापाण्यासाठी… मुंबई त्यांना आपलंसं करतेच. हाताला काम, भुकेल्याला दाणा देते, डोक्यावर छप्पर सुद्धा देते. अशी ही माझी मुंबई. अगदी घातपातानंतर सुद्धा ताठ उभी राहते.
एकदा एक हिंदी सीरियलच्या सेटवर एक मुलगा म्हणाला की, “आपकी जो ये मुंबई हैं…” मी म्हटलं “सिर्फ मेरी? तूही तिलाच शरण आलाहेस. तुझी नाही?”
हेही वाचा – तो आला, तो बोलला… पण…
“नाही” म्हणाला. माझं तोंड कडू झालं. गुपचूप उठून निघून गेले. काही काळानंतर मी त्याला फोनवर बोलताना ऐकलं, “हमारी मुंबई में ना…” मी हलकं हसून बघितलं त्याच्याकडे. त्याने मला “सॉरी” म्हटलं.
“माई मी तेव्हा नवीन होतो. घरापासून कुटुंबापासून लांब आलेलो. कसलीही जाणीव नव्हती. फुकटचा माज होता. हळूहळू अनुभव घेत पुढे सरकलो. हीच मुंबई माझी कधी झाली कळलंच नाही. या माझ्या मुंबईने मला खूप काही दिलं. काम, नाव, पैसे, घर, गाड्या, बायको…”
मी खूश… थोडी माजातही!
मुंबईत बॉम्ब फुटले, हल्ले झाले. थोडा वेळ थांबून, माझी मुंबई पुन्हा उठून उभी राहिली धावत सुटली. मधे मात्र काही काळ माझ्या मुंबईचा श्वास थांबला होता. COVID नावाच्या राक्षसाने मुंबईला संपवण्याचा घाट घातला होता. पण माझी मुंबई काही लेचीपेची नाहीये. मुंबईकर सुद्धा मागे नाहीयेत. कितीही बिझी असला, धावत-पळत असला तरी गरजवंताला मदत करणं हा मूळ स्वभाव मात्र सोडत नाही. रस्त्यात खड्ड्यात अडकून बाइक पडली तरी, चार जण पळत जातातच. बाइक उचलून त्या लोकांना काही मदत हवीय का, ते आवर्जून पाहतात. मदतीसाठी तत्पर असतात.
हेही वाचा – ‘त्या’ राजस्थानी महिलांची ‘पॉवर बँक’!
मला अगदीच वेगळा आणि गोड अनुभव आला, माझ्या मुंबईकरांचा. एका हिंदी सीरियलचं शूट करत होतो आम्ही. रात्रीचे 2.30 – 3 वाजले होते. रस्त्यावरचं शूटिंग होतं. आम्हाला कोणाचा आणि आमच्यापासून कोणाला त्रास नको, असा विचार होता. आम्ही तीन बायका – मी, माझी सून आणि नात झालेल्या दोघी जणी. नातीचा अपघात झालाय आणि डॉक्टर किंवा ॲम्ब्युलन्स काहीच मिळत नाहीये. भर मध्यरात्री आम्ही दोघीच तिला हॉस्पिटलमध्ये नेतोय… असा सीन होता. मुंबई पूर्ण कधीच झोपत नाही. तुरळक का होईना, रहदारी सुरूच होती. शूटिंग बघायला थांबणारे होतेच, पण गाडी थांबवून धावत आमच्याकडे येऊन काही मदत हवीय का? हॉस्पिटलला जायचं का विचारणारे पण बरेच होते! त्यामुळे आमच्या सीनची वाट लागत होती. पण अभिमान वाटत होता, मी मुंबईकर असल्याचा आणि माझ्या मुंबईचा!


