माया / भाग – 3
अहंकारविनाशेन
कर्मराशिश्च दह्यते।
न कर्ता न च भोक्ता च
परज्ञानं हि बुध्यते॥
– गीताव्रत
खरे आणि परिपूर्ण ज्ञान माणसाच्या जीवनात नक्की काय करते, हा आपल्यासाठी आणि अध्यात्मामधला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर देताना आद्य शंकराचार्य सांगतात की, सत्यज्ञान माणसाच्या अहंकाराचे समूळ उच्चाटन करते. आपण आयुष्यभर जे काही करत असतो, त्यामागे ‘मी करतो’ हा एक अत्यंत प्रबळ भाव लपलेला असतो. या ‘मी करतो’ या भावनेलाच वेदांतामध्ये ‘अहंकार’ असे म्हटले आहे. जोपर्यंत हा अहंकार जिवंत आहे, तोपर्यंत माणसाने कितीही चांगली किंवा वाईट कर्मे केली तरी त्या कर्मांचे फळ त्याला भोगावेच लागते आणि हेच जन्ममृत्यूच्या फेऱ्याचे मुख्य कारण बनते. पण जेव्हा खऱ्या ज्ञानाचा उदय होतो, तेव्हा तो ‘मी करतो’ हा भावच पूर्णपणे जळून जातो. कर्तेपणाचा अहंकार एकदा का नष्ट झाला की मग अनेक जन्मजन्मांतरापासून साचलेल्या संचित कर्मांच्या प्रचंड राशी एका क्षणात जळून खाक होतात.
जसे एखाद्या गोदामात वर्षानुवर्षे साठवलेल्या कापसाच्या मोठ्या ढिगाऱ्याला आगीची छोटीशी ठिणगी लागली की, तो संपूर्ण ढिगारा भस्मसात होतो, अगदी तसेच ज्ञानाग्नी कर्मांच्या राशींना जाळून टाकतो. मग तिथे कर्म करणारा असा कोणी कर्ता उरत नाही आणि त्या कर्मांच्या फळांचा उपभोग घेणारा असा कोणी भोक्ताही उरत नाही. असा ज्ञानी मनुष्य बाह्य जगासाठी सर्व कर्मे करत असलेला दिसतो, पण तो आतून पूर्णपणे अलिप्त असतो. जसे कमळाचे पान चिखलात आणि पाण्यात राहूनही कधीच ओले होत नाही, तसा तो संसारात राहूनही पूर्णपणे मुक्त असतो. हेच ते परमज्ञान ज्याची आस प्रत्येक साधकाला असते.
तीर्थाटनादिभिर्दानैः
व्रतैर्वापि न शुध्यति।
विना ज्ञानं कुतो मुक्ति:
अज्ञानान्नैव बुध्यति॥
– गीताव्रत
सामान्य माणूस मुक्ती मिळवण्यासाठी किंवा पुण्य, मोक्ष मिळवण्यासाठी आयुष्यभर अनेक प्रकारचे बाह्य उपाय करत असतो. तो गंगासागरसारख्या पवित्र ठिकाणांची अत्यंत खडतर यात्रा करतो. शरीराला कष्ट देणारी कडक व्रते पाळतो किंवा आपल्या संपत्तीतील मोठा वाटा दानधर्म म्हणून अर्पण करतो. या सर्व गोष्टी नक्कीच चांगल्या आणि पवित्र आहेत, यात शंका नाही; पण शंकराचार्यांनी इथे अगदी स्पष्ट शब्दांत बजावले आहे की, “बाह्य उपायांनी कायमस्वरूपी मुक्ती मिळण्याची कोणतीही शाश्वती नाही. कारण माणसाचे मूळ बंधन हे बाहेर नसून त्याच्या आत असलेल्या अज्ञानात आहे.”
हेही वाचा – मृत्यूच्या भयापासून कायमचे मुक्त करणारे सत्यज्ञान!
जर एखाद्या व्यक्तीला अंधारात दिसणाऱ्या आकाराला भूत मानून प्रचंड भीती वाटत असेल आणि ती व्यक्ती त्या भीतीपोटी पळत सुटली तर, ती जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी तिची ती भीती कधीच संपणार नाही. ती व्यक्ती तीर्थक्षेत्री गेली तरी, तिथेही तिला ते काल्पनिक भूत सतावेलच. ही भीती तेव्हाच कायमची संपेल, जेव्हा ती व्यक्ती सत्यापासून दूर पळणे थांबवेल, जिथे भास होतो, तिथे थोडा वेळ थांबून लख्ख प्रकाश आणेल आणि स्वतःच्या डोळ्यांनी पाहेल की, ते भूत नसून केवळ एक भास आहे. हे सत्य स्वतः जाणणे, वास्तव समजणे म्हणजेच ज्ञान होय. अध्यात्म सांगते, ज्ञानाशिवाय मुक्ती कधीच आणि कोणत्याही उपायाने मिळू शकणार नाही. जोपर्यंत अज्ञानाचा अंधार आहे, तोपर्यंत जन्ममरणाचे फेरे चुकत नाहीत हे त्रिकालबाधित सत्य आहे.
ज्ञानोदयक्षणे मुक्तिः
इहैव न हि संशयः।
उपनिषदां महाघोषो
ह्यज्ञानस्य हि संक्षयः॥
– गीताव्रत
सत्य आणि ज्ञानाचे सर्वात मोठे आणि विलोभनीय वैशिष्ट्य कोणते असेल तर ते हे आहे की, त्याचे फळ मिळण्यासाठी माणसाला मृत्यूची किंवा पुढच्या जन्माची वाट पाहावी लागत नाही.
मुक्ती म्हणजे मरणोत्तर मिळणारी कोणती अवस्था नाही. आद्य शंकराचार्य अतिशय ठामपणे सांगतात की, “ज्या अत्यंत पवित्र क्षणी माणसाच्या अंतःकरणात आत्मज्ञानाचा उदय पावतो, अगदी त्याच क्षणी त्याला मुक्ती प्राप्त होते.” मुक्ती कुठलीही वाट पाहायला लावत नाही. मुक्तीसाठी भटकावे लागत नाही. आपण आता जिथे आहोत, तिथेच आणि लगेचच मुक्तीचा अनुभव प्राप्त होतो, यात कोणताही संशय ठेवू नये. वेदांतात याला ‘जीवन्मुक्ती’ असे अत्यंत सुंदर नाव दिले आहे.
जसे एखादा मनुष्य गाढ झोपेतून अचानक जागा होतो. त्याला जागे होण्यासाठी काही तास प्रयत्न करावे लागत नाहीत, तो क्षणात जागा होतो आणि सुरू असलेल्या स्वप्नातून बाहेर येतो. त्याचप्रमाणे अज्ञानाची झोप उडाल्यावर साधक याच देहात राहून सर्व प्रकारच्या दुःखांतून आणि बंधनांतून एका क्षणात मुक्त होतो.
उपनिषदांसारख्या महान ग्रंथांनी एका सुरात अतिशय गर्जून महाघोष केला आहे की, “केवळ ज्ञानानेच अज्ञानाचा संक्षय होतो, संक्षय म्हणजे समूळ नाश होतो आणि मुक्ती मिळते.”
ज्ञान म्हणजे मेंदूत साठवलेली माहिती नव्हे. ज्ञान ही अत्यंत सखोल आणि प्रखर आंतरिक अनुभूती आहे, जी आपले संपूर्ण जीवन पारदर्शी आणि आनंदमय करून टाकते.
वेदान्तसारं सत्यं हि
जीवात्मब्रह्मणोर्मतम्।
तत्प्राप्तौ भवबन्धात्तु
ज्ञानं भवति शाश्वतम्॥
– गीताव्रत
संपूर्ण वेदान्त तत्त्वज्ञानाचा मुख्य विषय म्हणजे हे सत्यज्ञान! वेदान्ताचा मूळ गाभाच हा आहे की, ज्याला आपण आपला छोटासा आणि मर्यादित जीवात्मा मानत आलो आहोत, तो जीवात्मा हा साक्षात ते अनंत आणि अथांग ब्रह्मच आहे. मी आणि परब्रह्म एकच आहोत, ही अत्यंत ठाम खात्री पटणे आणि तसा प्रत्यक्ष अनुभव येणे म्हणजेच खऱ्या अर्थाने वेदान्तज्ञान मिळवणे होय.
हे ज्ञान एकदा प्राप्त झाले की, मग जन्म आणि मृत्यूच्या या अखंड चालणाऱ्या भवचक्रातून माणूस कायमचा मुक्त होतो. त्याच्याभोवती असलेले अज्ञानाचे आणि कर्मांचे जाळे कायमचे तुटून पडते. ज्याप्रमाणे दोरीचे खरे ज्ञान झाले की, सापाचा भास कायमचा आणि समूळ संपतो आणि प्रकाशात आपण दोरीला दोरीच समजू. दोरी पाहून सापाची भीती वाटणार नाही, तसेच स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान झाले की, या मिथ्या संसाराचे बंधन कायमचे तुटते. तो ज्ञानी पुरुष जगातील सर्व व्यवहारात भाग घेतो, हसतो, बोलतो; पण आतून त्याला पक्के माहीत असते की, हे सर्व केवळ एक नाटक आहे आणि तो त्या नाटकाचा केवळ एक साक्षीदार आहे. हे शाश्वत ज्ञान मिळवणे, हेच मानवी जीवनाचे एकमेव आणि अंतिम ध्येय आहे.
आत्मानुभूतये ज्ञानं
श्रेष्ठं नास्ति हि साधनम्।
शिष्यलक्षणसंपन्नः
प्राप्नोति पदमव्ययम्॥
– गीताव्रत
जीवनात स्वतःची खरी ओळख करून घेण्यासाठी म्हणजेच आत्मानुभूतीसाठी ज्ञानासारखे दुसरे कोणतेही श्रेष्ठ साधन आजवर निर्माण झालेले नाही आणि पुढेही होणार नाही. म्हणूनच ज्या साधकाला हे ज्ञान मिळवायचे आहे, त्याने प्रथम स्वतःच्या अंतःकरणात एका खऱ्या आणि उत्तम शिष्याची सर्व लक्षणे अत्यंत जाणीवपूर्वक बाणवून घेतली पाहिजेत. ही लक्षणे कोणती? तर, सर्वप्रथम अत्यंत टोकाची विनम्रता, त्यानंतर इंद्रियांवर आणि मनावर असलेला पूर्ण संयम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुमुक्षुत्व. मुमुक्षुत्व म्हणजे या भवबंधनातून मुक्त होण्याची अत्यंत तीव्र आणि उत्कट इच्छा. जसे एखाद्या बुडणाऱ्या माणसाला जगण्यासाठी आणि पुन्हा शक्तीनिशी प्रयत्न करण्यासाठी केवळ एक श्वास हवा असतो, तशीच मुक्तीची ओढ साधकाला हवी. ज्याच्या अंगी ही सर्व सद्गुणरूपी लक्षणे आहेत, तोच साधक खऱ्या ज्ञानाचा अधिकारी ठरतो. असे शुद्ध ज्ञान एकदा का प्राप्त झाले की, हा अनंत वाटणारा भवसागर अगदी सहजपणे आणि हसत खेळत पार करणे कठीण राहत नाही.
जो स्वतःच्या अंतर्यामी दडलेल्या आत्मा आणि परमात्म्याला ओळखतो तोच काळ आणि वेळ यांच्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन त्या अव्यय म्हणजेच कधीही नष्ट न होणाऱ्या परम पदाला प्राप्त करतो.
नमामि सद्गुरुं पूज्यं
सर्वज्ञं ज्ञानभास्करम्।
अज्ञानसागरे मग्नं
येनाहं तारितः परम्॥
– गीताव्रत
हे सगळे अथांग ज्ञान शिष्याला कोणामुळे प्राप्त होते तर ते कृपाळू सद्गुरूंमुळेच प्राप्त होते. जे स्वतः सर्वज्ञ आहेत आणि जे ज्ञानाचे प्रत्यक्ष सूर्यच आहेत, अशा परमपूज्य गुरुवर्यांच्या चरणी आचार्यांनी अत्यंत विनम्र भावाने प्रणाम केला आहे.
हेही वाचा – स्वयंपूर्ण आत्मानंदाची प्राप्ती
गुरू हा असा एक अलौकिक प्रकाश आहे, जो अज्ञानाच्या गडद अंधारात आणि मोहाच्या सागरात पूर्णपणे बुडत चाललेल्या शिष्याला ज्ञानाचा भक्कम हात देऊन सुरक्षितपणे बाहेर काढतो. जसा सूर्य उगवल्यावर अंधाराला निघून जाण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरत नाही, तसे सद्गुरूंच्या केवळ एका कृपाकटाक्षाने शिष्याच्या जन्मांतरीच्या अज्ञानाचा नाश होतो. सूर्यप्रकाशात जसे काहीही लपून राहत नाही, तसे ज्ञानसूर्याचा उदय झाल्यावर हा सर्व मिथ्या आणि फसवणारा संसार पूर्णपणे निस्तेज आणि अर्थहीन होतो. त्यानंतर मागे उरते ते केवळ अद्वैत! तोच तो निखळ आनंद आणि कधीही न भंग पावणारी परम शांती.
आद्य शंकराचार्यांनी भारतभ्रमण करून मानव जातीला दिलेला ज्ञानाचा अमूल्य वारसा प्रखर आणि मार्गदर्शक आहे. तो आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला आत्मिक प्रगतीकडे घेऊन जाणारा आहे. आपणही आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात या ज्ञानाचा छोटासा दिवा आपल्या मनात तेवत ठेवूया… ज्ञान आणि मुक्तीच्या त्या प्रकाशमान वाटेवरून अत्यंत आनंदाने आणि निर्भयपणे वाटचाल करूया!


